सातारा जिल्ह्यात पाहण्यासारखे अनेक गड किल्ले व पठारं आहेत, त्यातच महाबळेश्वर कोयना, डोंगर रांगेत वसलेल्या वासोट्याला जाणं म्हणजे “दुर्गप्रेमी व ट्रेकर्स” साठी एक पर्वणीच आहे.
वासोट्याला जाण्यासाठी प्रमुख्याने दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे बस ने बामणोली या गावात पोहोचायचं, हे अंतर सातार्यापासून ३५ कि.मी. इतकं आहे. येथून वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं मेटइंदवली गावात जाण्यासाठी लॉंच ची सोय आहे, इथे उतरल्यावर साधारणत: अडीच तासात गडावर पोहोचता येतं; तसंच दुसरा मार्ग म्हणजे चिपळुणहून बसने चोखण या गावातून ही पाच-सहा तासात गडावर पोहोचता येईल. पण पहिला मार्ग हा अदिक सोयिस्कर ठरतो.
मेटइंदवलीहून गडावर पोहोचल्यावर माथ्यावर जाण्यासाठी दोन मार्ग लागतात. उजवीकडील वाट ही नागेश्वर गुंफांकडे जाते तर डावीकडील मार्ग हा वासोट्याच्या माथ्यावर घेऊन जातो. वासोटा गडाची उंची ही ४२६७ फूट इतकी असून, येथे प्रवेश करताना मारुतीच्या मंदिराचं दर्शन होतं. या मंदिराची डावीकडे जाणारी वाट जोडटाक्याकडे जाते, तर मारुती मंदिराच्या उजवीकडे जाणारी वाट माचीकडे जाणारी असून, तीची ओळख ठाणे म्हणूनही आहे. माचीवरुन घनदाट जंगल, कासचं पठार, कोयनेचा विस्तीर्ण जलाशय, महिपतगड, महिमंडनगड, पालगड व सुमारगडाचं विहंगम दृश्य नजरेस पडतं, त्याचप्रमाणे मारुती मंदिरावरुन सरळ जाणारा मार्ग गडावरील वास्तूंच्या अवशेषांकडे घेऊन जातो. माथ्यावर पोहोचण्यासाठी लागलेल्या दोन वाटांपैकी उजवीकडे जाणारी वाट नागेश्वर गुंफांकडे जाते; पण गड सर करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे झाडांच्या प्रचंड वाढीमुळे इथल्या अनेक वास्तू लुप्त होत चालल्या आहेत.
नागेश्वर सुळक्याच्या एका गुहेत शंकराचं मंदिर आहे. या शिवलिंगावर बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक होत असतो; तसंच वासोटा गडावर देवीचं एक मंदिर ही आहे. ही दोन्ही मंदिरं ऐसपैस असल्यामुळे काहि काळ येथे विसावता ही येतं.
नागेश्वर कडून सरळ मार्गाने वर चढल्यानंतर, पुढे करवीरचे रान लागते, अन् काही अंतरावर किल्ल्याच्या पायर्यांना सुरुवात होते, आणि भगन झालेल्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडच्या तटबंदीच्या कडेने गेल्यावर पूर्वेकडील बाजूस पोहोचतो, या बाजूने दिसणारा शिवसागर जलाशयाचा देखावा म्हणजे फोटोग्राफीसाठी एक “गुड स्नॅप” ठरतो.
ऐतिहासिक दृष्ट्या ह्या किल्ल्याला खूप महत्व होते व आहे. कारण शिवाजी महाराजांनी १६५६ साली जावळी प्रांताबरोबरच वासोटा किल्ल्याचा समावेश स्वराज्यात केला होता. तसंच घनदाट अभयारण्यामुळे या किल्ल्याचा वापर “तुरुंग” म्हणून होत असे. जैवविविधतेने आणि वनस्पतींच्या आढळणार्या अनेक प्रजातींमुळे हा किल्ला संशोधकांसाठी महत्वपूर्ण ठिकाण आहे.
आपण जर का वासोटा किल्ल्याला भेट देणार असाल तर एकट्याने न जाता सात-आठ जणांच्या समूहासोबत जा; कारण वन्यप्रदेशामुळे चुकामुक होण्याची शक्यता अधिक असते; त्याचबरोबर खाण्या-पिण्याची सोय गडावर नसल्यामुळे ती तुम्हालाच करावी लागेल.
एकूणच वासोटा गड म्हणजे गर्द रानात लपलेला अनोखा वनदुर्गच आहे.
— सागर मालाडकर
Leave a Reply