लीलालब्धस्थापितलुप्ताखिललोकां
लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् ।
बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां
गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १॥
आई जगदंबेच्या शुद्ध सात्विक स्वरूपाला गौरी असे म्हणतात. तिचा गौरवर्ण तिच्या सात्विकतेचे ,शुद्धतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे.
या आई जगदंबेचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
लीलालब्धस्थापित
लुप्ताखिललोकां- भगवान ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी म्हणजे कल्पांती ही चवदा भुवनात्मक सृष्टी विलोप पावते. पुन्हा नवीन कल्पात अर्थात श्री ब्रह्मदेवांच्या नवीन दिवसाच्या आरंभी जिच्या सहज लीलेने हे सर्व लोक हे लुप्त झालेले लोक जणू पुन्हा सापडल्यासारखे आपापल्या जागी स्थिर होतात अशी.
लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् – लोकातीत अर्थात सामान्यजनांच्या पेक्षा अधिक श्रेष्ठ असलेले योगी लोक अंतकरणात सतत जिचा शोध घेतात, अर्थात सतत जिचे चिंतन करीत असतात अशी.
बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां- बाल आदित्य अर्थात नुकताच उगवलेला सूर्य, त्याची श्रेणी अर्थात समूह. म्हणजे जणू काही अनंत सूर्यांचे एकत्रित स्वरूप. त्या एकत्रित तेजाप्रमाणे दैदिप्यमान अशी.
अर्थात जिचे तेज कोट्यावधी सूर्याप्रमाणे लखलखते आहे मात्र बालरवी म्हणताना त्यात अपेक्षित आहे, की जरी असे कोट्यावधी सूर्याचे तेज असले तरी ते दाहक नाही. भीषण नाही. उलट प्रभातीच्या सूर्याप्रमाणे ते आल्हाददायक आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याला प्रेरणादायी आहे. जसा सूर्य उगवला की माणूस कामाला लागतो तसे आई जगदंबेचे दर्शन त्याला कर्तव्यरत करते.
गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे – गौरी अर्थात गौरवर्णाची असलेली, अंबा म्हणजे जगदंबा, अंबुरुहाक्षी म्हणजे कमळाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबेचे स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply