चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् ।
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ३॥
आई जगदंबेच्या या जगन्मोहन स्वरूपाचे अधिक वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां- चंद्रापीड अर्थात ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे, म्हणजे भगवान शंकर. त्यांना आनंद देणारे मंद स्मितहास्य जिचा वदनावर विलसत आहे अशी.
वास्तविक भगवान शंकर म्हणजे योगीराज शिरोमणी. कोणाच्याही व्यावहारिक सुखात, आकर्षणात ते अडकणारच नाहीत. पण त्यांनाही आनंद देणारे , आकर्षित करणारे असे आईचे हास्य आहे. किती सहज शब्दात आचार्यश्री आई जगदंबेचे लोकोत्तर स्वरूप वर्णन करीत आहेत. सामान्य माणूस आकर्षित झाला तर आश्चर्य काय? वैराग्य शिरोमणी असणारे भगवान शंकर आपली सहजसमाधी अवस्था सोडून आईच्या हास्याचा आनंद घेतात. वेगळ्या शब्दात आईचे हास्य समाधीच्या आनंदाच्या समतुल्य आहे.
चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् – आईने देखील आपल्या, मस्तकावर चंद्र धारण केला आहे. त्या चंद्राने जिने आपल्या नीलवर्णीय अलकभार म्हणजे केश संभाराला अलंकृत केले आहे केले आहे अशी.
स्निग्ध अर्थात तेल लावलेल्या, काळ्याशार केसांवर अत्यंत तेजस्वी असा पांढरा शुभ्र प्रकाश पडला तर त्या काळ्या रंगाच्या ऐवजी तेथे किंचित निळी छटा पसरते. आचार्य श्रींचे हे सूक्ष्म निरीक्षण किती मनोहारी आहे.
इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां- इंद्र म्हणजे देवराज इंद्र. उपेंद्र म्हणजे भगवान विष्णू. आदी म्हणजे अन्य सर्व देवतांच्या द्वारे जिच्या चरणकमलांची अर्चना केली जाते अशी.
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे – अशा कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply