मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् ।
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां सुखरूपां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ५॥
आई जगदंबेचे मानवी शरीरातील सूक्ष्मतम अस्तित्व म्हणजे कुंडलिनी शक्ती. नाभीजवळ साडेतीन वेटोळ्यात, वर्तुळाकारात ती सुप्तावस्थेत असते.
तिचा रंग अत्यंत आकर्षक लालबुंद वर्णिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, नागिनचे पोर कुंकुमे अर्चिले , अशा सुंदर उपमेने तो लाल रंग दाखवितात.
योगमार्गाने या आदिशक्तीला जागृत केल्यानंतर तिच्या होणाऱ्या प्रवासाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं- मूलाधारा पासून वर सरकत वीथी म्हणजे मार्गाने विधिरंध्र म्हणजे मस्तकातील सहस्त्रार कमल, ब्रह्मरंध्रात पोहोचणारी.
ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर पाठीच्या दांड्याच्या खाली असणाऱ्या मूलाधार चक्रातून ऊर्ध्वगामी होत स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा अशा चक्रांचा मार्ग पार करीत , ब्रह्मरंध्रात स्थिर होते.
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् – सूर्यनाडी चंद्रनाडी स्वरूपात वर्णन केलेल्या इडा आणि पिंगला या नाड्यांना व्यापून, अत्यंत दिव्य तेजस्वी स्वरूपात असणारी.
सूप्तावस्थेत लालबुंद असणारी ही कुंडलिनी मार्गक्रमणा करताना अत्यंत तेजस्वी सुवर्णमयी स्वरूपात चकाकते. ‘ सुवर्ण नागिन लचकत मुरडत आकाशी चालली ‘ अशा स्वरूपात संत तिचे वर्णन करतात.
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां- ह्या अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म शरीर असणाऱ्या तिला. आई जगदंबे ला इथे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हटले आहे . जी गोष्ट जितकी सूक्ष्म तितकी अधिक शक्तिशाली, असा शास्त्र सिद्धांत आहे. आई जगदंबा परमशक्ती असल्याने सूक्ष्मातिसूक्ष्म.
सुखरूपां- तिचे हे ब्रह्मरंध्रात स्थिर होणे हेच परमसुख आहे. ते जिचे मूलभूत स्वरूप आहे अशा,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे – कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply