यस्याः कुक्षौ लीनमखण्डं जगदण्डं
भूयो भूयः प्रादुरभूदुत्थितमेव ।
पत्या सार्धं तां रजताद्रौ विहरन्तीं
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ७॥
आई जगदंबा गौरीच्या विश्वजननी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्रींनी या श्लोकाची रचना केली आहे.
कोणत्याही मानवी जीवाची रचना मातृगर्भात असणाऱ्या बीजांडा पासून होत असते. या बीजांडा पासून अनंत कोटी ब्रह्मांडांपर्यंत सर्वत्र विद्यमान चैतन्य शेवटी आई जगदंबेचे आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्रींनी अशी रचना केलेली आहे.
आईचे हे जगज्जननी स्वरूप सांगताना ते म्हणतात,
यस्याः कुक्षौ लीनमखण्डं जगदण्डं- जिच्या कुशीमध्ये हे संपूर्ण जगत् रूपी अंड अखंड लीन असते.
यातील लीन शब्द मोठा सुंदर आहे. हे विश्व आईच्या उदरातून जन्माला येते. विलय होते तेव्हा देखील तेथेच असते. त्यातच विलीन होते. अर्थात ज्या वेळा ते दिसत नाही त्यावेळी देखील ते आईच्याच उदरात असते. विश्व दृश्य असो की नसो, ती विश्वजननी आहेच.
असा सुंदरतम अर्थ त्यातून प्रगट होतो.
भूयो भूयः प्रादुरभूदुत्थितमेव – त्या उदरातून हे विश्व भूयो भूय: अर्थात वारंवार, जागृत झाल्या प्रमाणे निर्माण होते. जसा एखादा माणूस झोपेत असताना त्याच्या संपूर्ण बाह्य विश्वाचा विलय होतो. मात्र उठल्या क्षणी पुन्हा जशाला तसे दिसते. तसे हे विश्व आईच्या उदरातून वारंवार प्रगट होते.
पत्या सार्धं तां रजताद्रौ विहरन्तीं- पतीचा सह रजत म्हणजे चांदीच्या पर्वतावर निवास करणाऱ्या त्या, येथील चांदीचा पांढरा रंग आणि चमक धारण करण्याच्या समानतेवरून कैलास पर्वताला चांदीचा पर्वत म्हटले आहे. त्यावर निवास करणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई गौरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply