“बराय तर मंडळी, निघतो ” इतक्या शांतपणे ईहलोकाचा निरोप घेणाऱ्या दिनकर धोंडो कर्व्यांची ही कन्या !
ही आधी कानावर आली वालचंदला असताना दोन मैत्रिणींच्या तोंडून ! ” जी ए /पुशि /गौरी ” वाचले नाही म्हणजे काय? तुमचा जगण्याचा अधिकार तात्काळ काढून घ्यायला हवा” असं त्यांनी फर्मावले. आम्ही घाबरून (आणि जिणं अबाधित राहावं म्हणून या तिघांच्या शोधाला लागलो) कारण तोपर्यंत आमची धाव वपु /शन्ना / मतकरी एवढीच होती.
आणि हे आडनांव ज्येष्ठ भगिनीचे वादळ मला गिरकावून गेलं. तिची यच्चयावत पुस्तके (अगदी शेवटचे “विंचुर्णीचे धडे”) मिळवून/विकत घेऊन वाचली आणि संग्रही ठेवली. “एकेक पान गळावया” हरवलं तर नवं घेतलं.
जगातल्या कित्येक देशांची चव तिने घेतली आणि अनेक विदेशी पात्रे मराठीत आणली. पात्रांची भन्नाट नांवे, स्त्री-पुरुषांविषयी बेधडक लेखन पण सगळं ताजं /वैचारिक. भाषा न खटकणारं. मराठीत कोणाला न “गावणारे ” हे शब्द तिला कोठून सापडत मला आजवर कळलं नाही. ठाशीव, तिच्या मुशीत चपखल तयार झालेले शब्द ! त्यांना स्वतःची एक लय असायची. आमचे सांगलीकर श्री.दा. पानवलकर असेच ! त्यांच्याही हातच्या लेखणी सोबत हातोडा असायचा. त्याआधी “कळ्यांचे निःश्वास “वाल्या मालतीबाई बेडेकरांच्या (विभावरी शिरूरकरांच्या) लेखणीचे असेच कुतुहूल वाटले होते.
बारा गावांसारखं बारा देशांचं पाणी प्यालेली तिची लेखणी मराठीला नवी होती. ती मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये सारखीच तळपली. तिच्या खुल्या व्यक्तित्वाची भुरळ समकालीन लेखिकांना पडली आणि त्यांनी गौरीवर लेखन केलं, तिच्या मुलाखती घेतल्या. अगदी अलीकडे तिच्या एका कथेवर “आम्ही दोघी ” हा मराठी चित्रपटही निघाला.
आजोबा आणि वडील यांच्या बंडखोरीचा वारसा तिने ” हातात ” घेतला आणि तिच्यापरीने काकणभर पुढे नेला.
निर्विवादपणे आज ती मराठीतील सर्वोत्कृष्ट लेखिका आहे.
” ज्याच्यावर आपले पोटातून प्रेम आहे, त्या मायदेशाची जगात चार माणसांपुढे लाज वाटावी याचे दुःख किती खोल आणि हताश करणारे असते ते अनुभवल्यावाचून समजायचे नाही कुणाला ” असं “मुक्काम “शेवटाला आल्यावर तिला जाणवलं होतं.
स्वतःच्या अटीशर्तींवर जीवन जगण्याचे सगळे बरे-वाईट परिणाम तिला सहन करावे लागले पण तेच तर भागधेय असतं अशा परिघाबाहेरील माणसांचं ! वाढत्या वयाबरोबर तिच्या लिखाणात एक शांतपणा आला होता , बंडखोरी संपली नाही पण थोडा थकवा आणि समंजसपणा जाणवत होता.
सवय नसल्याने मलाच चुकल्यासारखे वाटत होते.
माझं आणि माझ्या पत्नीचं अशी दोन पुस्तके एकाचवेळी प्रकाशित होणार होती- दोन नामवंत लेखकांच्या हस्ते ती व्हावीत या प्रयत्नात मी असताना त्यातील एक नांव साहजिकच गौरीचं होतं. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न २-३ परिचित मार्गांनी केला पण त्यावेळी ती भारतात नव्हती. आणि त्यानंतर काही महिन्यात तिच्या जाण्याचे वृत्त वाचनात आले.
तेव्हापासून प्रत्येक जात्या,आवडत्या लेखकाचे वर्णन करणारा हा एकच शब्द
” WAS !”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply