आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच हार्मोनियम वाजवण्याची कला सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असोत मा.जयवंत कुलकर्णी यांच्या “हिल पोरी हिला” किंवा “ही चाल तुरू तुरू” या दोन गाण्यांना हमखास “वन्स मोअर” मिळत असे. विशेष म्हणजे “सावध हरिणी सावध” या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि संगीतविश्वात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
कारण या गाण्याला उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा अनुभवायला मिळाला आणि मराठी चित्रपट व भावगीतांसाठी हा प्रयोग तसा नविनच होता. खरं पाहिलं तर मा.जयवंत कुलकर्णी यांनी त्यांचा सांगितीक कारकीर्दीत जी कोणती चित्रपट गीत गायली त्या बहुतांश गाण्यां मध्ये “गावरानबाज” पहायला मिळत असे. पण विशिष्ठ कोणत्याही एकाच ढंगातील गायन प्रकारात व अडकता मा.जयवंतजींनी “अष्टविनायका तुझा महिमा कसा”, “अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरि नाम त्याचे श्रीहरि”, “ विठुमाऊली तु माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठठ्लाची ” आणि “राम कुष्ण नारायण हरि, केशवा मुरारी पांडुरंगा” यासारखी अध्यात्मिक गीत आणि अभंग तल्लीन होऊन गायले! तसंच “अजिंक्य भारत अजिंक्य जनता” , “मंगल देशा पवित्र देशा” या दोन्ही गीतील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रगट झाला नसता तर नवलच !
“शाब्बास बिरबल शाब्बास बिरबल” हे मराठी संगीत संगभूमीवर गाजलेले नाटक आणि त्यातील “विश्वानाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा ” ही नांदी आजही ऐकल्यावर ताजी वाटावी अशीच आहे, या नांदीला जयवंत कुलकर्णींसह पंडित-राम मराठे आणि रामदास कामत या गायकाने स्वरबध्द केले होते. या नांदीमुळे मा.जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीच्या शिरपेचात नाट्यपद गाण्याचा तुरा देखील रोवला गेला. मराठी चित्रपटांतील द्वंद्व गीतांमध्ये काही गायक-गायिकांच्या जोड्या गाजल्या, त्यापैकी मा.जयवंत कुलकर्णीं सोबत उषा मंगेशकर ही गायनातील जोडी स्वरांच्या तालावर अक्षरश: ठेका धरायला लावत. या दोन्ही गायकांनी एकत्रित गायलेली सोंगाड्या चित्रपटातील “काय गं सखु”, आणि “माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी” तर “सख्या साजणा” मधील “चल चल जाऊ शिणुमाला”, किंवा गारंबीचा बापू चित्रपटातील “चांदणं टिपूर हलतो वारा” तसंच “लागे ना, लागे ना रे थांग तुझ्या ह्रदयाचा ” आजही आपल्या ओठांवर रुंजी घालताहेत. यासह नवरा माझा ब्रम्हचारी मधील “आई तुझं लेकरु येडं गच कोकरु”, पडछाया चित्रपटातील “नाच लाडके नाच, जगापासुनी दूर राहुया नको जनांचा त्रास”, तर “अनोळखी”तलं “ जीवन गगन मी पाखरू ” आणि “अंधाराची खंत तू कशाला करिसी रे”, “नाते जुळले मनाचे मनाशी” या भावगीतातून मानवी मनाचा वेध त्यांच्या स्वरातनं अगदी प्रभावीपणे उमटला.
“आमचा राजू का रुसला” , “माझ्या मामाची रंगीत गाडी हो,तिला खिल्लारी बैलांची जोडी हो” , “ गाव असा नि माणसं अशी, नातीगोती जडतंत कशी” अशी मिश्कील स्वरुपाची व बालगीते रसिकांनी उचलून धरली. “आयलय तूफ़ान बंदराला” या चित्रपटासाठी, लता मंगेशकर यांच्यासोबत, “आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज” , हे क्वचित प्रसंगी ऐकायला मिळणारे अगदी वेगळ्या प्रकारचे कोळीगीत गायले होते.मा.जयवंत कुलकर्णीं यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. यामध्ये भावगीतं, भक्तीगीतं व असंख्य चित्रपटगीतांचा देखील समावेश आहे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी मा.जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान मा.जयवंत कुलकर्णींचा आहे. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी मा.जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते. मा.जयवंत कुलकर्णी यांचे १० जुलै २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. सागर मालाडकर/ मराठी सृष्टी
Leave a Reply