नवीन लेखन...

वक्त ने किया क्या हँसी सितम : गीता दत्त

जॉर्ज वॉशिग्टंन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होऊन गेले. हा माणूस अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा होता. मीना गवाणकर यांनी या शास्त्रज्ञाचे “एक होता कार्व्हर” नावाचे एक छोटेखानी सुंदर असे आत्मचरित्र लिहीले आहे. त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की हा शास्त्रज्ञ एकदा चर्च बाहेर बसला असतानां त्याच्या तोंडून अत्यंत गोड आवाजात उस्फूर्त असे गीत बाहेर पडले ज्याचा समावेश जगातील उत्कृष्ट गाण्यात होतो. हे कसे घडले असावे? मला असं वाटतं की त्यांच्या आतली अतीउत्कट अशी मानवीय संवेदना गाण्याच्या रूपाने अशी बाहेर आली असावी. अनेक मान्यवर गायक वा गायिका असे मानतात की गाणे दोन प्रकारचे असते एक जे गळ्यातुन येते आणि दुसरे जे हृदयातुन येते. यात जर आवाजाची नैसर्गिक देणगी असेल तर हृदयातुन गळ्याद्वारे बाहेर पडणारे गाणे नि:संशयपणे अप्रतिम होते. गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता दत्तचे असेच काहीसे होते.

वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता रॉयला गायनाची पहिली संधी मिळाली ती कोरस मधील दोन ओळीच्या रूपात. खूप मोठ्या जमिनदाराच्या १० अपत्यापैकी गीता एक होती. त्यात मुलगी असून गाणे शिकते व गाणे गाते हा तसा विरोधाभासच होता. तिचे वडील आपली ईदीलपूरची जिल्हा फरीदपूर (आताचा बांगला देश) मधील सर्व जमिन व इस्टेट मागे ठेवून कलकत्ता व आसामला आले. पूढे मग त्यांनी मुंबईला येऊन दादरला एक फ्लॅट खरेदी केला व तेथेच राहू लागले. त्यावेळी गीता रॉय १२ वर्षांची होती. लहानपणा पासूनच संगीताची ओढ गीताला होती. हनुमान प्रसाद नावाच्या एका संगीतकाराने गीताचा आवाज ऐकला आणि तिला गाणे शिकवण्याची जबाबदारी घेतली. पूढे त्यानीच मग “भक्त प्रल्हाद” नावाच्या चित्रपटात कोरस मधील दोन ओळी गाण्याची संधी दिली. पूढेही काही गाणी मिळाली पण फारसा प्रभाव नाही पडला. मात्र १९४७ मधील ‘दो भाई’या चित्रपटातील “मेरा सुंदर सपना बित गया’’ या गाण्यातुन तिच्या प्रतिभेची चुणूक मिळाली आणि पार्श्वगायीका म्हणून तिच्या नावावर शिक्का मोर्तब झाले. या नंतर दोनच वर्षांनी ‘महल’ मधल्या “आयेगा आयेगा …आयेगा आनेवाला” म्हणत लता दिदीचे नाव दुमदुमू लागले. याच काळात सचिन देव बर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांच्यातल्या चाणाक्ष संगीतकाराने गीता रॉयच्या नैसर्गिक आवाजातली जादू ओळखली. काय योगायोग बघा याच काळात बंगलोर मधील वसंतकुमार पडूकोण नावाचा एक तरूण कोलकत्ता, पूणे प्रवास करत मुंबईत आला होता. लवकरच या तरूणाशी गीता रॉयची भेट होणार होती आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळणार होते.

१९५१ मध्ये देवानंद बंधूच्या नवकेतन या संस्थेचा चित्रपट “बाजी”चे काम सुरू झाले. चित्रपटाचे सगीतकार एस. डी. बर्मन यांनी गीता रॉय कडून सहा गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचा दिग्दर्शक होता वसंतकुमार पडूकोण उर्फ गुरू दत्त. गाणी रेकॉर्ड होत असतानां गुरूदत्त गीताच्या आवाजाच्या आणि नंतर हळूहळू तिच्याच प्रेमात पडला. हा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि यातील ‘तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले’ या गीता रॉयच्या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवली. तिच्या पार्श्वगायनाचे सर्वच दरवाजे उघडे झाले आणि खरेखरच तिची तकदीर बन गयी. दरम्यान गीता रॉय देखिल गुरूदत्तच्या प्रेमात पडली आणि २६ मे १९५३ रोजी दोघांनी विवाह केला. गीता रॉय गीता दत्त झाली. त्यानां तरूण व अरूण ही दोन मुलं आणि निना ही मुलगी झाली. नंतरची चार वर्षे तिचा गळा बहरत गेला. अनेकजण असे मानतात की तिच्यावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता. पण मला ते फारसे पटत नाही. तिने पाश्चात्य सुरावटीची व तशी बाज असलेली गाणी सुंदरच गायली यात दुमत नाही. पण मग खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते (बावरे नैन), सुनो गजर क्या गाए (बाज़ी)]न ये चाँद होगा, न ये तारे रहेंगे (शर्त),कैसे कोई जिए, जहर है जिन्दगी (बादबान), जाने कहाँ मेरा जिगर गया जी (मिस्टर एंड मिसेस 55), ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है (भाई-भाई), आज सजन मोहे अंग लगा ले (प्यासा), वक्त ने किया क्या हँसीं सितम (कागज के फूल), आन मिलो आन मिलो (देवदास), हम आपकी आंखो मे..रफी सोबत (प्यासा), बाबूजी धीरे चलना (आरपार), ना जाओ संया छुडा के बयाँ (साहब बिबी और गुलाम),मुझे जा न कहो मेरी जान (अनुभव), घुंगट के पट खोल (जोगन) अशी एकापेक्ष एक सरस गाणी गीता दत्तने गायली. यात अस्सल भारतीय मातीची लोक संगीतावर आधारीत अशीही गाणी होती. नंतर गुरूदत्तच्या बहुतेक सर्व चित्रपटाची गाणी ती गात राहिली. मात्र नंतर अचानक या सर्वाला ग्रहण लागले. जीए कुलकुर्णी यांच्या कथेत प्रकर्षाने आढळणारी नियती किंवा प्राक्तन या दोघांच्या आयुष्यात आडवे आले.

१९५७ च्या सुमारास गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्यात अस्पष्टशी भेग पडली आणि हळूहळू यातील अतंर वाढत गेले. गुरूदत्त यानां वाटायचे की गीताने आपल्याच चित्रपटासाठी गाणी गावीत. पण गीता प्रतिष्ठीत झालेली पार्श्व गायिका होती. बाहेरच्या चित्रपटाच्या ऑफर्स येणे साहजिक होते. गीता दत्तला स्वत:ची अशी एक वेगळी ओळख होती, एक स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. मग स्वत: एक संवेदनशील मन असणाऱ्या गुरूदत्तने हा हट्ट का धरला असेल? संगती लागत नाही. १९७३ मधील हृषिकेश मुखर्जीच्या ‘अभिमान’ मध्ये असेच काहीसे कथानक होते. ज्यात अमिताभ आणि जया भादूरी यांचा उत्कृष्ट अभिनय होता. तर सुरूवातीला या गोष्टीला नकार देणाऱ्या गीताने मग त्याच्या प्रेमापोटी हळूहळू माघार घेतली. पण यामुळे संगीतकारही हळूहळू बाजूला होत गेले. यात भर म्हणून की काय वहिदा रेहमानचा गुरूदत्तच्या आयुष्यात झालेला प्रवेश. या सर्वाचा परिपाक म्हणजे गीता वेगळी राहू लागली. हृदया पासून गाणारी गीता आतल्या आत कोसळू लागली. खरं तर सचिनदा यानां तिच्या आवाजावर खूप विश्वास होता. पूर्वी गाण्याच्या भरपूर रिहर्सल होत असत त्यात गीता दत्त म्हणावी तशी मेहनत घेतानां दिसेना. जर खरोखरच तशी मेहनत घेतली असती तर तिच्या गायकीचे अनेक रंग दिसू शकले असते. याच काळात मग आशाताई आपल्या प्रचंड मेहनतीने वर येत गेल्या. गुरूदत्तवर गीता दत्तने मनापासून प्रेम केले. कदाचित त्यामुळे तिच्या प्रत्येक गाण्यात अंतरिक तळमळ होती, उर्मी होती……. पूढे जेव्हा वहिदा रेहमान गुरूदत्तच्या आयुष्यातुन निघून गेली तेव्हा गुरूदत्त पूरता दारूच्या आहारी गेला. परीणाम १९६४ ला अतीमद्य आणि झोपेच्या गोळ्या सेवनाने गुरूदत्तचे निधन झाले. या दुसऱ्या धक्कयाने मात्र गीता दत्त पार कोलमडून गेली. ती नर्व्हस ब्रेकडाऊनची शिकार झाली. आर्थिक कटकटीचा गुंता अधिक वाढत गेला. त्यासाठी मग काही स्टेज शो पण करावे लागले. १९६७ मध्ये “बधू बारन” नावाच्या एका बंगाली चित्रपटात मूख्य भूमिका केली. पण मन आणि शरीर यांचा मेळ काही केल्या बसत नव्हता. १९७१ मध्ये कनू रॉय या संगीतकारासाठी गीता दत्तने शेवटचे गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट होता बासू भट्टाचार्य यांचा ‘अनुभव’. पूढे गीता दत्तचा आजार वाढतच गेला. गीता दत्त याचं “वक्त ने किया क्या हंसी सितम…” हे गाणे जेव्हा आज कानावर पडते तेव्हा नकळत मनात विचार येतो की खरंच काळाने गुरूदत्त आणि गीता दत्त दोघांवरही अत्याचरच केला. गुरूदत्त गेला तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर गीता दत्तने अखेरचा श्वास वयाच्या ४१ व्या वर्षी घेतला…..

-दासू भगत (२० जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..