ने हमीसारखीच मी यवतमाळला गेले. मधून मधून चक्कर होते, कारण यवतमाळ माझं माहेर. पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी हे नवीन घर बांधलंय. पण आता ठरवलं, की या वेळी आपण जुन्या घरी जाऊ या, ज्या घरात माझा जन्म झाला. उमलत्या वयाची 17 वर्ष घालवली. त्या घराकडे या 35-40 वर्षांत आपण फिरकलोच नाही.
पस्तीस-चाळीस वर्ष. आयुष्याचा केवढा मोठा लांबलचक पल्ला. वाटलं तिथं जाऊन ते घर कॅमेऱयात बंदिस्त करू या. यांना सांगताच तेही `हो’ म्हणाले आणि मग आम्ही निघालो संकटमोचन रोडला, पोहेकरांच्या चाळीकडे.
गाडीतून आम्ही उतरलो. मी आनंदात होते; पण अवतीभवती बघितलं. ज्या चाळीत राहत होतो, तिकडेही पुनपुन्हा बघितलं. वाटलं, आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही आलो! मागे वळून बघितलं, देशमुखांचं घर होतं त्या स्थितीत कायम होतं. पण, जिथं आम्ही राहत असू तिथं मात्र मोठी इमारत उभी होती. चाळ गायब होती. एखादी वस्तू उचलून तिथं दुसरी ठेवावी. आणि आपण खूप काही तरी हरवून बसलोय, असं वाटलं. मला ते घर नको होतं. ते घर फकत बघायचं होतं. त्या घराचा फोटो काढायचा होता. बस इतकंच.
ते माझं घर इथंच होतं. ही इमारत उं हूं – माझं घर कौलारू होतं. इंग्रजी कौलांचं. पावसाळ्यात जागोजागी गळणारं. पातेले ठेवायचे मग. टपटप पडणाऱया थेंबांचे शिंतोडे उडायचे. भोवतीची जागा ओली व्हायची.
सारवलेलं घर. चुलीवरचा स्वयंपाक. बाजूला विहीर. रहाटाचा नि खिराडीचा सतत आवाज. पावसाळ्यात विहीर तुडुंब भरायची. घर थोडं उंच. तीन पायऱया; पण आम्ही तिघी बहिणी पायऱया उतरतच नसू. धावत निघायचं, की उडी घरातून अंगणात.
अंगण शेणाचा सडा टाकून पिवळंधमक झालेलं. अंगणात कधी मी, कधी सिंधू, तर कधी कमल रांगोळी घालायचो. मला 15 ते सात टिंबांची रांगोळी आवडायची. कासवाची रांगोळी वर तोंड खाली शेपूट, छोटंस. आताही ते अंगण, ती रांगोळी डोळ्यांसमोर उभी राहिली. अंगणाच्या बाजूला सीताफळाचं झाड- रस्त्याच्या पलीकडे चंद्रज्योतीची झाडं.
याच घरात मी मॅट्रिकपर्यंत शिकले. लाईट नव्हते. बाहेर अंधारच असायचा. घरात कंदील. दिवालगिऱया दाराच्या खिळ्यात अडकविलेल्या. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास चालायचा. उन्हाळ्याच्या परीक्षा. कंदिलाची धग कमी वाटावी म्हणून कार्ड कंदिलाच्या काचेत अडकवत असू. मग धग कमी व्हायची. मोठ्याने वाचून अभ्यास चालायचा. मग बहिणींशी `तू तू – मी मी’ चालायची.
उन्हाळ्याच्या अंगणात खाटा पडायच्या. खाटेला खाट लागून असायची. आई, बाबा, आजी अंथरुणावर पडल्या पडल्या गोष्टी सांगायचे. आभाळभर चांदण्या निरखीत आम्ही गोष्टी ऐकत असू. आभाळात बुढीचं खाटलं शोधत असू. वाटायचं बुढीचं खाटलं रोज याच ठिकाणी का असतं?
याच गल्लीत आम्हा मैत्रिणींचा लगोऱयांचा डाव रंगायचा. किती तरी मैत्रिणी.
`अरे! इथं तर चिंचेचं झाड होतं.’ चाळीच्या टोकाकडे बघत मनात विचार आला. आता तिथं ते इंग्रजी चिंचेचं झाड नव्हतं. चिंचेच्या आठवणींनी तोंडाला पाणी सुटलं. चिंचा लागल्या, की आम्ही मैत्रिणी सकाटा घेऊन चिंचा पाडीत असू. कुणी तरी एक जण आपल्या प्रॉकच्या ओच्यात त्या गोळा करीत असे. मग चिंचांची वाटणी व्हायची. कच्च्या-पिकल्या एकेक बुटूक सगळ्यांच्या समोर ठेवलं जायचं. चिंचा खाताना मजा यायची. अगदी अवतार असायचे. प्रॉक, कानावर दोन वेण्या, लांब वेण्यांचे दुमडून वर पाडलेले फूल. कधी ते फूल सुटलेलं असायचं; मग एक वेणी वर, एक खाली. प्रॉकचे सुटलेले बंद. एक दुसरीचे बांधून द्यायची.
अंधार पडेपर्यंत खेळत असू. कधी लगोऱया, कधी लंगडी, कधी टिक्कर बिल्ला, अण्टका खडे- आरडाओरडा करीत खेळ चालायचे. सारी गल्ली दुमदुमून जायची. पडत झडत सायकली याच गल्लीत शिकलो. खेळताना हरलो-जिंकलो. यश-अपयश पचविण्यास लहानपणी याच ठिकाणी शिकलो.
शकू, कुंदा, पुष्पा, सुमन, मालू किती तरी मैत्रिणी. वाटलं, आताही अवतीभवती उभ्या आहेत की काय आणि म्हणताहेत, `इरींग मिरींग लवंगा तिरींग, तिस्वा तिस्वा डूब डूब बाज्या- गाईगोपी उतरला राजा- `चल रे राज्य दे- डाव तुझा आला- चला ग पळा पळा, लपा लपा.”
आणि रात्ररात्रपर्यंत भाद्रपदातली बाहुल्यांची (भोंडल्यांची) म्हटली जाणारी गाणी आठवली. `बाणाबाई बाणा खारकेचा बाणा- गाणे संपले खिरापत आणा.”
`अगं आटपा लवकर माझे बाबा येतील ऑफिससातून-‘
गल्लीच्या कोपऱयावरून गोल टोपी (साहेबी हॅट) घातलेले सायकलवरून येणारे बाबा दिसले, की आम्ही पोरी खेळ अर्धवट सोडून पसार होत असू.
वडीलधाऱयांचा धाक अजूनही मनात कायम आहे. लहानपणच्या संस्काराच्या चौकटी आजही शाबूत आहेत. मला वाटतं, बोचणारी नसावी; पण जीवनाला चौकट असावीच. त्यानं आयुष्याचं देखणेपण अधिक वाढतं.
आणि लहानपणच्या आठवणींचे तुकडे तुकडे गोळा करीत मी ह्यांच्यासह मागे फिरले…
– विजया ब्राह्मणकर-भेंडारकर, नागपूर.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply