“खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला.
कान देऊन ऐकले तरच जिचे बोलणे कानी पडते अन्यथा जी आपल्याच स्वरात प्रवास करीत असते अशी आई आणि तिच्यावर अकारण रुसलेले लेकरू यांच्यातील ही कहाणी.
आईवर रुसण्याची मुलांची खोड प्राचीन आणि घरोघरची, पण नीना कुळकर्णी जेव्हा प्रवाहाच्या मध्यात नेऊन जितेंद्रला खडसावते तेव्हा नदीएवढाच आवंढा माझ्या गळ्यात रुतला.
उगाच नाही दोन तीन पिढ्यांपूर्वी आपल्या घरातील स्त्रियांची नांवे -गंगा, भागीरथी,यमुना,कृष्णा, नर्मदा, गोदावरी अशी असायची. त्या नद्या घरोघरी घुसमट घेऊन वाहायच्या आणि परंपरांचे वाण प्रवाहित ठेवायच्या. त्या वारंवार तोंडाला पदर कां लावायच्या, हे काल गोदावरीमधील स्त्री पात्रांनी सांगितले.
जितेंद्रची आई,पत्नी,आणि कन्या- तिघींनी बराच पट धीटपणे मांडला. वडील (संजय मोने) स्वतःच्या अबोल्यावरील थर फक्त एकाच प्रसंगात खरवडून काढतात पण तो अभिनयाचा वस्तुपाठ ठरतो. तसंच काठा काठाने चालणारा सोबती-प्रियदर्शन ! या दोघांनी पहिल्यांदाच स्वतःची उत्तुंग अशी ओळख मला दिली. असे प्रसंग,अशा भूमिका वाट्याला याव्यात अशी तपश्चर्या जन्मभर सर्वच कलावंत करीत असतात. इथे मोने आणि प्रियदर्शन भारावून टाकतात.
नाशिक या प्राचीन शहराइतकाच विक्रम गोखले नामक कलावंत- ज्याचं असणंच पडद्याला पुरेसं सुखावून जातं तो नारोशंकर नांवाने येथे भेटतो. एकेकाळच्या स्वतःच्या “बॅरिस्टर ” मधील ” दत्त,दत्त,दत्ताची गाय ” म्हणणाऱ्या मोठ्या भावासारखा, इथे फक्त ” पाणी आलं कां रे,दुतोंड्या मारुतीपर्यंत ” एवढंच बोलत खिडकीतून बाहेर गोदावरीचे पात्र न्याहाळत असतो. पण त्याच्यात भिनलेली नदी, चित्रपटात नंतर एका प्रसंगातून भेटते.
गेली अनेक वर्षे जाऊन परिचयाचे झालेले नाशिक आणि तेथील गोदावरी काल घट्ट मिठी मारून भेटले. “देवबाभळी” मध्ये ” इंद्रायणी” घेऊन आलेला नाशिककर प्राजक्त देशमुख इथे “गोदावरी “घेऊन आलाय. तितकेच इंटेन्स अनुभव- एक पडद्यावरचा आणि दुसरा चित्रपट गृहातील. माध्यमं वश असलेल्या या माणसांचे कौतुक प्रत्यक्ष भेटून करण्यातच औचित्य !
जितेंद्र जोशींचा उल्लेख आणि प्रगल्भतेचा आलेख अपरिहार्य !
सलग तीन अप्रतिम चित्रपट ( ” एकदा काय झालं “, ” सहेला रे” आणि आता “गोदावरी”) त्यामुळे माझी दिवाळी अजून संपलीच नाहीए.
आस इतकीच -जितेंद्र जोशीला मोकळीक मिळाली,तशीच गोदावरीला मिळो आणि भविष्यातील एखाद्या भेटीत तिची मनसोक्त खळखळ कानी पडो.
मला कायम दोन प्रकारच्या घरात राहणाऱ्यांची असूया वाटते- मंदिराच्या ओसरीत,पडवीत राहणाऱ्या पुजारी/सेवक मंडळींची घरे आणि दुसरी नदीच्या काठावर राहणाऱ्या मंडळींची ! अशांच्या जगण्याला आपसूक श्रीमंत पार्श्वभूमी लाभते.
पुन्हा एकदा भुसावळला जाऊन तापी नदीच्या काठी छोटीशी होडी घेऊन जाऊन राहण्याची आस बळावलीय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply