नवीन लेखन...

गिरीश कर्नाड !

पुण्याच्या प्रभात चित्रपट गृहात (आताचे किबे थिएटर) मी पत्नीसह “उंबरठा ” पाहायला गेलो होतो ,प्रामुख्याने स्मिता पाटीलसाठी ! जब्बारचा चित्रपट, संगीत हृदयनाथांचे आणि एका स्त्रीवादी कथानकाचा वृत्तपत्रांनी गाजावाजा केला म्हणून! तिकिटांच्या रांगेत असताना आधीच्या शोमधील “सुन्या सुन्या मैफिलीत ” कानांवर पडत होते. इतक्या सुंदर गाण्याबाबत वर्तमानपत्रात काहीसा विरोधी सूर कां अशा विचारात मी पडलो.

तिथे दिसला -गिरीश कर्नाड! स्मिताच्या पतीच्या दुय्यम भूमिकेत! अवघा चित्रपट स्मिताने अक्षरशः व्यापला असल्याने इतर पात्रांची (श्रीकांत मोघे ,आशालता वगैरे) फारशी दखल घ्यावीशी वाटली नाही. गिरीश काहिसा धिप्पाड (स्मिताच्या तुलनेत -ती बिचारी लहानखुरी ), बलदंड आणि अभिनयातही डावा !

थोडीशी नोंद घेतली आणि मी पुढे सरकलो. काही वर्षांनी ” सुरसंगम ” आला! पंडित शिवशंकर शास्त्रींच्या भूमिकेत पुन्हा गिरीश – तोच धिप्पाड /बलदंड वगैरे! साक्षात पुलंनी कौतुक केलेल्या ” संकराभरणम ” चा हिंदी अवतार! मूळ चित्रपट (पुलंच्या शिफारशीमुळे) दुपारी दूरदर्शनच्या रविवारच्या प्रादेशिक शृंखलेत मुद्दाम पाहिला होता. सोमयाजुलू या कलावंताने गाठलेल्या अभिनयाच्या उंचीसमोर गिरीश फारच तोकडा पडला. खूप पूर्वी वालचंदला असताना उस्मान शेखच्या आग्रहाखातर पाहिलेल्या ” स्वामी “मध्येही तो शबानासमोर टिकाव धरू शकला नव्हता. थोडक्यात “अभिनय ” हा त्याचा प्रांत नाही असे मत मी करून घेतले.

त्याची नाटके बघायचा योग आला नाही की भाषणे ऐकण्याचा ! मात्र त्याला “ज्ञानपीठ “जाहीर झाले त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी काहिसा निषेध नोंदविला आणि मग मी कुतूहलाने त्याची पूर्वपीठिका चाळली. ज्ञानपीठ मिळाले म्हणजे हा नक्कीच बाप माणूस असणार ही बांधलेली खूणगाठ तेंव्हा घट्ट झाली. कन्नड रंगभूमीवरील त्याचे कार्य कुसुमाग्रजांच्या तोडीचे आहे. त्याचे लेख (बहुदा भाषांतरीत ) वाचनात यायचे आणि त्याची “खोली ” कळायची. क्वचित controversy व्हायची पण “अभिव्यक्ती स्वातंत्र्य !”(!)

असा हा फारसा न आवडलेला (नट म्हणून), पण उच्च कोटीचा नाटककार/प्रयोगशील कलावंत आणि लेखनातून “काळावर ” दर्जेदार भाष्य करणारा पारिजात “अबोल ” झाला – अंगण “सुने सुने “झाले. सुरेश भट, स्मिता आणि आता गिरीश सगळी फुले उंबरठयाबाहेर गेली- न परतीसाठी !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..