बुकिंग केले तेव्हा मोबाईल वर 16000 दाखवले होते पण त्याच्या हातात एक वीस हजाराची नोट दिली, त्यावर त्याने सुट्टे देण्यासाठी पाऊच मध्ये शोधाशोध सुरु केली. त्याला सुट्टे नको उरलेले तुलाच ठेव असं म्हणून हाताने इशारा केला. हसत हसत थँक यू म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सोळा हजार दाखवले आणि वीस हजाराची एक नोट दिली, चार हजार परत न घेता त्यालाच ठेवायला सांगितले हे वाचल्यावर तुम्हाला वाटेल हे सगळं असं काय लिहिलं आहे. मोबाईल वर दाखवलेली 16 हजारची ट्रिप ही एक बाईक राईड होती आणि ती सुद्धा साडे पाच किलोमीटर करिता.
ही बाईक राईड आणि त्यासाठी वापरले जाणारे चलन हे इंडोनेशियातील असल्याने वीस हजाराची एक नोट आणि चार हजार टीप असा सगळा मामला आहे.
इंडोनेशियन चलनात एक, दोन, पाच, दहा, वीस आणि पन्नास हजारासह एक लाखाची सुद्धा नोट असते.
आपल्या भारतीय रुपयात कन्व्हर्ट केल्यास पाच रुपयात एक हजार इंडोनेशियन रुपीयाह येतात. म्हणजे दहा हजारात आपले पन्नास रुपये आणि एक लाखात आपले पाचशे रुपये. अमेरिकन डॉलर्स, रशियन रुबल्स, दुबईचे दिरहम, तुर्कीचे लिरा, आपला रुपया आणि इंडोनेशियाचा रुपीयाह.
साडे पाच किलोमीटर साठी 16 हजार रुपियाह म्हणजे जवळपास ऐंशी रुपये होतात आणि चार हजारांचे साधारण वीस रुपये. जहाजावरून घरी येण्यापूर्वी जकार्ता मध्ये एक रात्र हॉटेल स्टे दिला जातो. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता बोट जकार्ता मध्ये पोचली होती. एजंट ने हॉटेल मध्ये चेक इन करून दिले. कोरोना मुळे दुसऱ्या दिवशी आर टी पी सी आर टेस्ट करून मगच फ्लाईट मध्ये एन्ट्री मिळणार होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी रात्रीची फ्लाईट होती.
जकार्ता शहरात गोजेक नावाचे एक ऑनलाईन अँप आहे. आपल्या भारतात ओला किंवा उबर आहे त्याचप्रमाणे.
या अँप वर कार, फूड डिलिव्हरी याप्रमाणेच बाईक राईड म्हणजेच मोटारसायकल वर मागे बसून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाता येता येते.
टॅक्सी किंवा कार ऐवजी बाईकस्वार पॅसेंजर ची ने आणि त्यांच्या बाईकवरून करतात. प्रत्येक गोजेक बाईकस्वार हेल्मेट आणि गोजेक चा जॅकेट घालून असतो. पॅसेंजर साठी सुद्धा एक हेल्मेट प्रत्येक गोजेक वाल्याकडे असते. जकार्ता मध्ये ट्रॅफिक ही मुंबई पेक्षा भयंकर असते. कार आणि बाईक राईड मध्ये तसं पाहिले पैशांच्या दृष्टीने तर फारसा फरक नसतो. स्वस्त असण्यापेक्षा बाईक स्वार हे कार पेक्षा लवकर पिक अप करतात आणि ट्रॅफिक टाळून, शॉर्ट कट आणि लहान रस्त्यांवरून पटापट इच्छित स्थळी पोचवतात.
जहाजावर जवळपास साडेचार महिने होऊन गेले होते. इंडोनेशियन कुक कडून बनविले जाणारे इंडियन फूड खाऊन नकोसं झाले होते, त्यामुळे जकार्ता मध्ये पोचल्यावर हॉटेल मध्ये येऊन शॉवर वगैरे घेतला आणि सात वाजता बाहेर पडलो. हॉटेल लॉबीमधून जकार्ता मधील इंडियन रेस्टॉरंट साठी गोजेक बाईक राईड बुक केली. हॉटेल च्या एग्झिट गेट वर पिक अप लोकेशन टाकले होते.
मोबाईल मध्ये 16 हजार फेअर दाखवले गेले होते. बाईक वाला दोन मिनिटाच्या अंतरावर दाखवत होता, अँप मध्ये चॅट ऑप्शन असते, बाईक स्वार चॅट करून लोकेशन कन्फर्म करतो. पूर्वी इंडोनेशियन भाषेत चॅट करायला अडचण यायची पण आता इंग्लिश मध्ये टाईप केले की इंडोनेशियन भाषेत ऑटो ट्रान्सलेट होऊन संपर्क करता येतो. पण दोन मिनिटाचे लोकेशन दाखवणारा बाईक स्वार पाच मिनिटं झाले तरी एकाच जागेवर स्थिर असल्याचे मोबाईल वर दाखवत होते. गेट वरच्या सिक्युरिटी गार्ड कडे बाईक स्वाराला फोन लावून दिला. त्याने त्याला त्यांच्या भाषेत काहीतरी सांगितले आणि बरोबर दोन मिनिटात गोजेक बाईक माझ्या पुढ्यात येऊन थांबली.
जहाजावर रोज संध्याकाळी सहा वाजता जेवायची सवय असल्याने साडे सात वाजल्याने जोराची भूक लागली होती. दहा बारा मिनिटात इंडियन रेस्टॉरंट जवळ गोजेक वाल्याने सोडले. त्याला 20 हजार इंडोनेशियन रुपीयाहची नोट देऊन उरलेले पैसे ठेवायला सांगितले.
कंपनी आम्हाला ज्या हॉटेल मध्ये पाठवते तिथे इंडोनेशियन किंवा काँटिनेंटल फूड असल्याने जहाजावरुन उतरल्या उतरल्या इंडियन रेस्टॉरंटचा रस्ता पकडावा लागतो.
जहाजावर रविवारी इंडोनेशियन कुक बिर्याणी तर बनवायचे पण एकदम बेचव आणि मुळमुळीत. जकार्ता मध्ये भारतीय लोकं खूप असल्याने तिथे बहुतेक ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट आहेत.
इंडियन रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर हैद्राबादी बिर्याणी मागवली आणि चार दिवसांचा उपाशी असल्यासारखी फस्त केली आणि पुन्हा एकदा हॉटेल वर परतण्यासाठी गोजेक बाईक राईड बुक केली.
जकार्ता मध्ये गोजेक बाईक राईड ची सेवा देणारे बाईक स्वार हे अत्यंत गरीब किंवा खालच्या स्तरातील लोकं असतील असं त्यांच्याकडे बघून कोणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. दिवसभरात जास्तीत जास्त सहा ते आठ ट्रिप ज्यातून त्यांना दिवसभरात एक लाख रुपियाह किंवा आपल्याकडील पाचशे रुपये तरी सुटत असतील की नाही हे सांगणे मुश्किल आहे शिवाय त्याच्यातच पेट्रोल आणि बाईक चा मेंटेनन्स.
जकार्ता मध्ये जागोजागी, नाक्यानाक्यावर हे गोजेक बाईकस्वार घोळक्या घोळक्याने मोबाईलवर ट्रिपची वाट बघत बसलेले दिसून येतात.
इंडोनेशियात स्मोकर्स चे प्रमाण खूप असल्याने, बहुतेक गोजेक स्वार हे एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कोल्ड टी चा ग्लास घेऊन तास तास भर बसून असतात. काहीजण तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथ वर किंवा लॉन वर आडवे पडून लोळताना सुद्धा दिसतात. मॉल,हॉटेल, ऑफिसेस च्या बाहेर रस्त्यावर घोळक्याने तासनं तास ताटकळत असतात.
सगळ्यांचे चेहरे उदास आणि भकास दिसतात. बेरोजगारी किंवा इतर कुठलेही कामं किंवा व्यवसाय नसल्याने नाईलाजास्तव गोजेक अँप वर बाईक चालवत असावेत असं एकसारखे जाणवत राहत.
एक हजार रुपियाह किंवा आपले पाच रुपयेच त्यांना जास्तीचे दिले तरी ते मनापासून धन्यवाद देत असतात.
ट्रॅफिकचे नियम तोडून, रॉंग साईडने वगैरे ते खुशाल बाईक चालवतात, त्यांच्या मागे बसल्यावर मौत का कुआ मधील बाईक वर बसल्या सारखे वाटावे असे पण काही जण ट्रॅफिक. मध्ये चालवतात.
जकार्ता मध्ये गोजेक बाईक राईड म्हणजे जहाजावरील नोकरी प्रमाणेच एक थ्रिलिंग एक्सपेरियन्स असतो.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply