नवीन लेखन...

गडसम्राट ‘गोनिदां’च्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण

Golden Moments with Go Ni Dandekar

गडसम्राट गोपाळ नीलकंठ दाण्डेकर ह्यांच्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण : वंदनीय आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज ८ जुलै २०१६ सांगता दिन

मला लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची, इतिहासाची आवड ! त्याला कारणही तसेच आहे. वंदनीय श्रीशिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्यावर झाला, त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नर गावचा माझा जन्म ! त्यामुळे पूज्य गो. नी. दाण्डेकर ह्यांच्या पुस्तकांची गोडी मला अगदी शाळकरी वयापासूनच लागली !

पडघवली, शितू, पवनाकाठचा धोंडी, मोगरा फुलला, शिवकालावर आधारित पाच कादंब-या, मृण्मयी, जैत रे जैत, कुणा एकाची भ्रमण गाथा, अश्या सर्वांग सुंदर साहित्यकृती वाचून आमच्या पिढीची मने समृद्ध झाली, हे आमचे सौभाग्य !

गोनीदा माझे श्रद्धास्थान झाले ! आप्पांची पुस्तके वाचल्यावर मी त्यांना भरभरून पत्रं पाठवू लागलो. उमद्या मनाचे आप्पा, माझ्या प्रत्येक पत्राला पत्रोत्तर देत असत. प्रत्येक पत्राच्या शिरोभागी आप्पा न चुकता, “श्रीशंवंदे” असे लिहावयाचे.

हो, आप्पांचा जन्मदिवस आठ जुलै १९१६ मी त्याही निमित्ताने आप्पांना दरवर्षी पत्रं पाठवायचो. एकदा एका पत्रात, मी त्यांना समक्ष भेटीसाठी वेळ विचारली आणि आप्पांचे लगोलग मला पत्र आले, “येत्या रविवारी दुपारी तीन वाजता तळेगावास अवश्य ये” !

ते पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर धुव्वाधार पाउस सुरु होता, अन् मी तळेगावला जाण्यासाठी लोकल पकडली. त्याकाळी, आत्तासारखी पुणे- तळेगाव पी.एम.टी. बस नव्हती. शिवाजीनगर स्टेशनवरून लोकलने मी घोरावाडीला गेलो. स्टेशनवर उतरून मी थेट गावाच्या रस्त्याला लागलो. मनामध्ये आप्पांना भेटायची प्रबळ इच्छाशक्ती होती. भिजत भिजत, विठोबाच्या देवळाजवळ आलो आणि शेजारीच असलेल्या आप्पांच्या दुस-या मजल्यावरील घरी गेलो !

“आप्पा, मी उपेंद्र चिंचोरे”, दरवाजा उघडताच मी म्हणालो “अग नीरु, लेकरू भिजलंय पावसानं”, आप्पांच्या ह्या उबदार बोलण्यानी मी आणखीन चिंब भिजलो. नीराकाकूंनी मला टॉवेल दिला. आप्पा म्हणाले, “हे बघ गड्या, आधी तुझं डोकं कोरडं कर, अंमळसा बैस, कढत चहा घे अन् मग आपण बोलू” !

मग आप्पांनी माझ्याबद्दल, माझ्या छंदाबद्दल सविस्तर जाणून घेतलं. बोलता बोलता, संध्याकाळ झाली, मला पुन्हा पुण्याला यायचं होतं . पाउस जरासा उघडला होता. आप्पांनी घराच्या गॅलरीत उभे राहून, डावीकडे डोंगर दिशेला वर पाहिले आणि म्हणाले, “गड्या, हे पहा, आत्ता तासभर तरी पावसाची विश्रांती आहे, चल मी येतो तुझ्यासोबत स्टेशनवर”. माझी चाल कमी पडली, अशी आप्पांची झपझप चाल सुरु झाली. आम्ही स्टेशनवर पोहोचलो, गाडीला दहा-पंधरा मिनिटांचा अवधी होता. आप्पांनी मला पुन्हा येण्याचे तेव्हांच आमंत्रण दिलं. मी पुण्यास आलो खरा, पण डोळ्यासमोर सतत आप्पाच होते !
गड-कोट फिरणा-या आप्पांचा मला प्रदीर्घ सहवास मिळत होता. मी त्यांना “आप्पा” ह्याच नावाने हाकारत असे.

आप्पांच्या घरी गेल्यावर, खूप आनंदात वेळ जायचा. गड-किल्ल्यांवरून भ्रमंती करतांना, वेगवेगळे दगड आप्पांनी गोळा केले होते. त्या दगडांचे वैशिष्ठ्य आप्पा सांगायचे. आप्पा दर्जेदार छायाचित्रकार होते, प्रत्येक भेटीत आप्पा मला, त्यांनी टिपलेली विविध छायाचित्रे दाखवत !

मला आप्पांची लेखन शैली आवडायची कारण, त्यांची भाषा बोली असायची, भारतीय संस्कृतीमधील उदात्त मूल्यांचा आदर करणा-या व्यक्तिरेखा आणि कथानकांचा आधार घेऊन, आप्पांनी कलात्मक कादंबरी लेखन केले होते. आप्पांना जीवनातील विविधांगी अनुभवांची श्रीमंती लाभली होती. त्यामुळे आप्पांनी, सर्वसामान्यातील आत्मिक शक्तीचे सामर्थ्य व्यक्तिरेखांमधून व्यक्त केले होते. अर्थातच त्या व्यक्तिरेखा वैशिष्ठ्यपूर्ण ठरल्या.
आप्पांना संत श्रेठ गाडगे महाराजांचा सहवास लाभला होता. आप्पा लोकजीवनाशी एकरूप झालेले होते. संत साहित्य, कहाण्या ह्यांचेही आप्पांनी मुबलक लेखन केले होते. समकालीन लेखकांमध्ये स्वतःच्या लेखन कर्तृत्वामुळे आप्पांचे स्वतंत्र असे स्थान होते. “गो. नी. दाण्डेकर” ह्या नावाची मुद्रा मराठी साहित्यावर चिरकाल कोरली गेली, ती त्यांच्या अत्युच्च दर्जेदार लेखन शैलीमुळेच होय !

मला आठवतंय १९८१ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आप्पा अध्यक्ष झाले होते. जैत रे जैत आणि देवकी नंदन गोपाला, ह्या चित्रपटांच्या कथा आप्पांनी लिहिल्या होत्या. त्यांना पारितोषिके मिळाली होती. शितू, पडघवली, पवनाकाठचा धोंडी, कुणा एकाची भ्रमणगाथा ह्यांना तर महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले होते.

गो. नि. दांनी राधामाई ह्या नाटकासाठी लिहिलेली तीनही गाणी आजही लोकप्रिय आहेत. मी राधा, मी कृष्ण, राधामाई खेळेल का देव, उठ मुकुंदा, हे गोविंदा ! स्नेहल भाटकर ह्यांच्या चाली, ज्योत्स्ना भोळे ह्यांनी गायल्या होत्या. मला आठवतंय, २४ एप्रिल १९९५ रोजी, मोठ्या मानाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा “वाग्विलासिनी पुरस्कार” इचलकरंजी येथे झालेल्या, भव्य समारंभात, आप्पांना प्रदान करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित होतो !

आप्पांच्या किती किती आठवणी सांगू ? माझी लेखणी थिटी आहे, ह्याची मला जाणीव आहे.

पुण्यातील शनिवार पेठेतील फुटक्याबुरूजाजवळ झालेल्या आणीबाणी नंतरच्या एका सभेमध्ये आप्पा बोलत होते, बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, “जुन्नरचे नदी काठचे ते कोणते ऐतिहासिक मंदिर”? श्रोत्यांमध्ये मी होतो, मी पटकन उभे राहून, हात उंचावून म्हणालो, “कुकडेश्वराचे मंदिर” ! “बरोब्बर, माझ्या गड्याने ओळखले” इति आप्पा !

एक अगदी घरगुती पण हृद्य आठवण सांगितल्याशिवाय राहावत नाही : माझ्या धाकट्या बहिणीचे अंजूचे लग्न ठरलं होतं. स्थळ तळेगावचे. आधी बहिणीला मी आप्पांकडे नेले. आप्पांची आणि नीरु काकूंची ओळख करून दिली . पुढे माझ्या बहिणीचे लग्न झाले. आप्पांनी आणि निराकाकुंनी माझ्या धाकट्या बहिणीला आणि श्रीमान सुरेश मालशे ह्या माझ्या मेहुण्यांना घरी जेवायला बोलावले. आप्पा माझ्या बहिणीला म्हणाले, “हे बघ, उपेंद्राने आजवर तुझ्यासाठी खूप केलंय . आत्ता तू माझी मुलगी आहेस, तेव्हां माझ्याकडे यायचेस”. आप्पांनी त्यांचे बोलणे खरे केले. आप्पांनी माझ्या बहिणीचे सारे वर्षसण केले, अन् मी भरून पावलो !

माझी बहिण आणि मेहुणे,पहिल्या दिवाळसणाला, पुण्याला माझ्या घरी आले होते. दोन दिवसांनी ते उभयता तळेगावास गेले, तेव्हां घराचे दार उघडे दिसले, आधल्या रात्री त्यांचे घरी चोरी झाली होती. ब-याचश्या वस्तू चोरट्यांनी लांबवल्या होत्या. रडत-रडत बहिणीचा मला फोन आला, मी त्वरेने तळेगावाला गेलो, बहिण आणि मेहुणे विमनस्क अवस्थेत होते, पण माझ्या आधी, माझ्या बहिणीच्या घरी पोहोचले होते, ते वंदनीय आप्पा आणि निराकाकू ! “काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत”, असा आश्वासक आधार आप्पांनी आणि नीराकाकूंनी दिला ! एक घर म्हणले, की काय लागत नाही ? पण त्याही परिस्थितीमध्ये आप्पा आणि काकू माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्या दोघांनी अनेक संसारोपयोगी वस्तू माझ्या बहिणीला आणून दिल्या. आप्पा अधूनमधून बहिणीच्या घरी जाऊ लागले. ख्याली-खुशाली जाणून घेऊ लागले. असे हे आप्पा आणि निराकाकू !

नंतर आप्पा पुण्याला तुळशीबागवाले कॉलनीमध्ये वीणाताईच्या घराजवळ राहावयास आले. त्याही घरी माझे जाणे सुरु झाले. आणि अचानक एके दिवशी नीरा काकुंचा मला सांगावा आला. सारसबागेजवळील शहाडे हॉस्पिटलमध्ये मी गेलो. आप्पांची तब्येत बिघडली होती. वीणाताई, निराकाकू तिथे होत्या. मी म्हणालो, “काकू तुम्ही रात्री घरी जा, मी रोज रात्री आप्पांच्या सोबतीला येत जाईन”. परमेश्वराने मला आप्पांच्या सेवेची सुसंधी दिली. आप्पांना बोलता येत नव्हते. त्यांना काही हवे असेल तर, त्यांच्या हाताशी ठेवलेली शिट्टी वाजवायचे. सकाळी, निराकाकू दवाखान्यात आल्या की, मी घरी जायला निघायचो. आप्पांना सांगायचो, ते रडू लागायचे. काकू म्हणाल्या, “उपेंद्र, अरे तू निघालास, म्हणून त्यांना वाईट वाटत आहे”. मी म्हणायचो, “आप्पा, मी पुन्हा येतो रात्री”……

आमचा हा सहवासही परमेश्वराला फार काळ पाहवला नाही की काय, एक जून १९९८ रोजी परमेश्वराने स्वतःच्या सहवासाकरिता, आप्पांना बोलावून घेतले……

आज आठ जुलै २०१६, विख्यात गडसम्राट गो नी दाण्डेकर अर्थात आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगातादिन ! वीणाताई आणि विजय देव ह्यांचे आजच्या कार्यक्रमाचे आमंत्रण आलंय. आप्पांच्या पवित्र स्मृतीला माझे
मनोभावे वंदन.

— उपेंद्र चिंचोरे

ऊपेंद्र चिंचोरे
About ऊपेंद्र चिंचोरे 14 Articles
श्री उपेंद्र चिंचोरे हे विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. त्यांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..