पन्नास साठ वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेच्या बाहेर, फाटकाजवळ गोळीवाले, पेरुवाले, खाऊवाले बसलेले दिसायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर मुलांची त्यांच्यावर झुंबड उडायची. तोच त्यांचा दिवसभराचा धंदा. शाळेला असलेल्या सुट्टीच्या रविवारी व वार्षिक परीक्षेनंतरची उन्हाळ्याची सुट्टीमध्ये हे खाऊ विक्रेते नसल्याने शाळा ओकीबोकी दिसायची.
मी पहिली ते चौथी भावे प्राथमिक (आताची रेणुका स्वरुप) शाळेत होतो. त्या शाळेच्या फाटका जवळच पेरुवाली आजी बसलेली असायची. शेजारीच एक चिंचा, बोरं, चण्यामण्या टोपल्यांमधून विकणारी शेडगे आळीतील बाई असायची. गॅसचे रंगेबेरंगी फुगेवाला त्याच्या काळ्या उभ्या सिलेंडरसह कधीतरी दिसायचा. एका हातगाडीवर काही सिझनल गोष्टी मिळायच्या, जसं कैरीच्या मोसमात तिखट मीठ लावलेल्या कैरीच्या फोडी, कधी छोटे पोपटी रंगाचे आवळे, कधी गाभुळलेल्या चिंचा. महिन्यातून एखादे दिवशी विजय टाॅकीजला रविवारी सकाळी ‘देवबाप्पा’ किंवा ऐतिहासिक चित्रपट असेल तर त्याची जाहिरात करणारा, सायकलवर मोठं कापडी बॅनर लावून उभा असायचा. तो प्रत्येकाला चित्रपटाच्या नावाचं शिक्का मारलेलं चिठ्ठीवजा हॅण्डबिल वाटायचा. चार वर्ष हा हा म्हणता निघून गेली. माझं घर जवळच असल्यामुळे व बाहेरचं काही खायचं नाही, या आईच्या नियमाला घाबरुन मी शाळेबाहेरचं काहीही घेतलं किंवा खाल्लं नाही.
पाचवीला टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळा दुपारची असायची. रहायला जवळच असल्याने मी दहा मिनिटात शाळा गाठायचो. शनिवारी शाळा सकाळची असे. या शाळेबाहेर एक गोळीवाला खूप वर्षांपासून त्याच्या हातगाडीसह व्यवसाय करायचा. मी त्याला पाचवी ते दहावी सहा वर्षे रोजच पहात होतो.
हा गोळीवाला तब्येतीने फारच काटकुळा होता. पन्नाशीच्या आसपासचा, रंगाने गोरा, मोठे डोळे, चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, अंगात आकाशी रंगाचा सदरा, खाली खाकी हाफ पँट, पायात चपला. मी अशाच वेषात त्याला वर्षानुवर्षे पाहिलं आहे. त्याच्या हातगाडीला वरती पत्र्याचे शेड होते. हातगाडीवर वरती काचेचं झाकण असलेल्या चार लाकडी पेट्या असायच्या. उरलेल्या जागेत गोळ्यांच्या काचेच्या बरण्या. त्या पाच बाय चार फुटांच्या जागेत शालेय साहित्यापासून मनोरंजनापर्यंतचं सारं काही मिळायचं. पेन्सिल्स, खोडरबर, कंपास बाॅक्स, कंपास मधील सुट्या वस्तू, वह्या, ब्राऊन पेपर, ट्रेसिंग पेपर, पेन, निब्ज, बाॅलपेन, रिफील, शाई, ड्राॅपर्स, परीक्षेचे कोरे पेपर, फुटपट्टी, खडू, इ. साहित्य एकाचवेळी पुरविणारा मला तो जादूच्या दिव्यातून प्रकट होणारा ‘जीन’च वाटायचा.
त्याला पावसाळ्यात छत्री असूनही भिजताना, हिवाळ्यात हाफ स्वेटर घालूनही कुडकुडताना व एप्रिलच्या उन्हाळ्यात घामाच्या धारा मध्ये भिजताना मी पाहिलेले आहे. कधी मफलर गुंडाळलेला दिसला की, समजायचं आज स्वारी आजारी आहे.
मी दहावीला असताना त्याला पेरुगेट जवळील भावे हायस्कूलच्या बाहेरही पाहिलं होतं. तो दोन्ही शाळांसाठी दिवसभर गाडीसह उभा रहायचा. मी त्याच्याकडून गोष्टीची छोटी पुस्तकं खरेदी करीत असे. त्याकाळी पंचवीस पैशाला ती पुस्तकं मिळत असत. रोजच्या पाहण्यात असल्यामुळे तो मला ओळखत असे.
दहावीत असताना एके दिवशी मला गोळीवाला शाळेजवळ दिसला नाही, मी मित्राला बरोबर घेऊन आताच्या ज्ञान प्रबोधिनी इमारतीच्या जागेवर वाडा होता, त्या वाड्यात गेलो. तिथे जिन्याखालच्या अरुंद जागेत तो रहात असे. तो दरवाजा बंद होता. दारावर मा. का. देशपांडे असं खडूनं नाव लिहिलेलं होतं. मी कडी वाजवल्यावर त्याने दार उघडलं. गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला पाहून तो आजारी असल्याचं जाणवत होतं. त्या एवढ्याशा जागेत त्याने ब्रम्हचाऱ्याचा संसार मांडला होता. दोरीवर कपडे, मागे अंथरुण, पांघरुणाच्या घड्या. खाली स्टोव्ह, पातेली. त्याने आमचे हसून स्वागत केले. मित्राला जे काही पाहिजे होतं ते त्यानं घेतलं. आम्ही दोघेही त्याचा निरोप घेऊन निघालो.
अकरावीला मी रमणबागेत गेलो. त्यामुळे गोळीवाला देशपांडे पुन्हा दिसला नाही. कधी त्या रस्त्याने जाताना तो दिसला तर हसून ओळख दाखवत असे.
आज या गोष्टीला पंचेचाळीस वर्षे झाली. पुढे त्यानं किती वर्ष व्यवसाय केला, याची कल्पना नाही. या शाळेत शिकून बाहेर पडलेल्या आणि आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या प्रत्येकाच्या स्मरणात हा गोळीवाला नक्कीच असेल.
आजही शाळेसमोरुन जाताना मला त्याची प्रकर्षाने आठवण होते. आता त्या जागेवर कोणतीही गाडी नसते. तरी मला भास होतो, शाळेची मधली सुट्टी झाली आहे आणि वीस पंचवीस मुलांची त्याच्या गाडीभोवती गर्दी आहे. तो प्रत्येकाला हवी ती वस्तू देतो आहे आणि मी लांबून त्याची होणारी धांदल पाहतो आहे…
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-१०-२०.
Leave a Reply