अकरावी प्रवेश सुरु झाले. त्यावेळी नवीनच ओनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू होती म्हणून शाळेतून अर्ज भरून दिले जात होते. अर्ज भरायचा आहे, ठीक आहे पण कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे काही राणीला कळत नव्हते. तिला काय बनायचं आहॆ याचा तिने कधी गहन विचार केलाच नव्हता.शाळेत जेव्हा शिक्षक विचारायचे, कोणाला पुढे जाऊन वैज्ञानिक बनायचे आहे तेव्हा राणीचा हात पहिला वर असायचा,कधी शिक्षकांनी विचारल पत्रकार बनायला कोणाला आवडेल पुढे जाऊन.. तरी पहिला हात राणीचाच वर. तात्पर्य काय तर राणीने विचार केलाच नव्हता तिला पुढे जाऊन काय करायच आहे त्याचा.
तिने एकदा शांतपणे विचार केला की तिला काय आवडत तर तिला उत्तर मिळालं साहित्य.तिला वाचायला खूप आवडायच आणि एखाद्याला छान समजावून सांगायची कला तिच्यात होती.मग पुढे जाऊन भाषेची प्राध्यापिका किंवा लेखिका बनेन,त्यासाठी कला शाखा निवडेन अस तिने ठरवलं.तिने विचार केला की एकदा आई बाबांना पण त्यांचे विचार विचारायला हवे.म्हणून मग तिने आई बाबांना विचारले कि काय घेतल पाहिजे मी, तर एका सुरात दोघांनी उत्तर दिल,” विज्ञान शाखा”.तिने तिचा विचार जेव्हा सांगितला तेव्हा आई बाबांना तो विचार आवडला अस काही तिला वाटलं नाही.आई बाबांनी तिला समजावलं कि एवढे चांगले गुण मिळवले आहेस,तू विज्ञानाचा अभ्यास खूप सहजपणे करू शकतेस,एवढी क्षमता आहे तुझ्यात.विज्ञान घेऊन पुढे अभियांत्रीकी किंवा डॉक्टर बनू शकतेस.या त्यांच्या विचाराने परत तिला गोंधळात टाकले आणि तिने आई बाबांच ऐकून विज्ञान शाखा निवडायचं ठरवलं.
सई ने पण विज्ञान शाखेची निवड केली होती.दोघींना एकाच महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता.पण ओनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे ते साध्य नाही झाले.अकरावी म्हणजे नवीन विषय विज्ञानाबद्दलचे.शाळा मराठी माध्यमातून केली होती आणि आता एकाएकी सगळे विषय इंग्रजीमध्ये शिकणं कठीण जाणार होत.कोचिंग क्लास ची गरज होती सगळ्यांनाच.राणीच्या आधीच सईने एका कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेऊन अभ्यास सुरूही केला होता पण राणीच अजून कशातच काही नव्हत.राणीला जाणवत होत, दहावी काहीच नव्हती खऱ्या परीक्षा तर आतापासून सुरु होणार आहेत…
राणीने सईच्या क्लास मध्ये प्रवेश घेतला.सईला आपल्या प्रवेशाने तिने आश्चर्यचकित केले.दोघी खूप खुश झाल्या.राणी यायच्या आधी सईला त्या क्लासमध्ये एक नवीन मैत्रीण मिळाली होती.सईने तिची राणीसोबत ओळख करून दिली.आता त्या तिघी एकाच बाकावर बसू लागल्या.तिघींची छान गट्टी जमली.
राणीला अभ्यास बराच कठीण वाटायला लागला होता आता.एकजरी इंग्रजी शब्द अडला तर ती जीवाचं रान करून तो शब्द शोधून लिहून काढत होती.समजून घेत होती.कधी कधी तीला रडू यायचे कोणता विषय समजला नाही तर. पण ती हार मानणारी नव्हती.अभ्यासावर तिने बरेच कष्ट घेतले.आता ती क्लासच्या शिक्षकांची शाबासकी मिळवू लागली होती.त्यांमुळे तिला आता स्वतःबद्दल आत्मविश्वास जाणवू लागला होता.
सईच मोबाइल वापरायच प्रमाण वाढलेलं राणीला जाणवू लागल.राणी तिला ओरडायची पण सईमध्ये काही फरक नव्हता.मग सईने तिला ओरडायचं बंद केलं.असेच सगळे दिवस चालू असताना राणीला तिच्या मोबाइल वर एका वेगळ्या नंबरने मेसेज आला,”हेल्लो,मला ओळखलस का?” ते वाचून राणी बुचकळ्यात पडली कारण तिचा हा नंबर खुप कमी लोकांकडे होता.
कोणाचा होता तो मेसेज?.. बारावीच्या बोर्डामध्ये कोण बाजी मारणार?.. पुढे डॉक्टर कि इंजिनीअर बनणार राणी?
यासाठी वाचा पुढचं सदर..
धन्यवाद!!
Leave a Reply