|| हरी ॐ ||
श्रावण महिन्यापासून सणासुदीला सुरवात होते आणि थेट अश्विन-कार्तिकापर्यंत आपण सण आणि उत्सव साजरे करतो. पण श्रावण महिन्यात येणारा उत्सव हा खरं तर श्रीकृषणाचा जन्मोत्सव. त्याच्या बाललीला, आईच्या नकळत टांगून ठेवलेल्या मटक्यातील लोणी चोरणे, गोपांबरोबर रानावनात मनसोक्त खेळ खेळणे. याच लोणी चोरण्याच्या प्रथा परंपरांचे
रुपांतर नंतर दहीहंडीत झाले असावे असे वाटते. परंतु त्याला आता काहीसे वेगळे, असुरक्षीत, स्पर्धात्मक आणि व्यवसायिक रूप येऊ पाहात आहे. असो.
दरवर्षी वाढणारे दहिहंडीचे थर, गोविंदांची सुरक्षा, त्यांचे किमान वय, वेगवेगळ्या थरावरून पडून विकलांग झालेले शरीरी किंवा एखादा शरीराचा भाग, मृत्यू आणि कुटुंबावर आलेले आर्थिक आणि मानसिक संकट व त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड, आर्थिक ओढाताण अशा अनेक मुद्द्यावर सध्या समाजात चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी सानपाडा परिसरात दहीहंडीचा सराव सुरू होता. त्यावेळी अचानक थर सरकले आणि पाचव्या थरावरून १४ वर्षाचा गोविंदा खाली कोसळला. त्याच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्याला तातडीने वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. असाच एक करी रोडचा गोविंदा अद्याप रुग्णालयातच आहे. मंगळवारी दुपारी केईएम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले. त्याच्या मानेच्या चार व पाच क्रमांकाच्या मणक्याला अत्यंत गंभीर स्वरुपाची इजा झाल्याने अर्धांगवायू झाला आहे. त्याची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
गोविंदा मंडळामध्ये १२ वर्षाखालील मुलांना सहभागी करून घेण्यास यंदा बालहक्क संरक्षण आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे बालगोविंदांचा प्रश्न चिघळलेला आहे. तसेच आचारसंहितेच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकप्रतिनिधींकडून न मिळालेली स्पॉन्सरशिप, डीजेच्या आवाजावर डेसिबल मर्यादा, थरांच्या संख्येवरून कोर्टात चाललेला खटला, मंडळातील पैशावरून निर्माण झालेले वाद, विमा कंपन्यांनी १२ वर्षाखालील मुलांना संरक्षण देण्यास दिलेला नकार, महिला गोविंदाचे प्रश्न अशा विविध कारणामुळे यावर्षी गोविंदा उत्सवा आधीच चर्चेत रंगला आहे. अशा कारणांमुळे यंदा मुंबईतील ४० हून अधिक लहान गोविंदा मंडळे बंद झाली आहेत. एकीकडे अशा समस्या भेडसावत असताना, नवी मुंबईतील या घटनेने गोविंदा मंडळांच्या अडचणीत भर घातली आहे. दरवर्षी वाढणारे दहिहंडीचे थर, गोविंदांची सुरक्षा, त्यांचे किमान वय अशा मुद्द्यावर कोर्टात लढाई सुरू असतानाच, नवी मुंबईत सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
ज्या सण व उत्सवाने आनंद, प्रेम, समाधान, तृप्ती, समाजामध्ये एकोपा निर्माण करणारे वातावरण निमार्ण होते. तसेच त्यातून समाज प्रभोधन पण होते म्हणून सण व उत्सव मोठया प्रमाणत झालेच पाहिजेत. परंतू सण व उत्सवाच्या जोशात काहीतर विपरीत घडतं असेल, ज्यामुळे शेजारच्या घरात दु:ख निर्माण होतं असेल, आर्थिक प्रसंग ओढवत असेल तर आपल्याला त्या सण आणि उत्सवात मन रमणार नाही आणि मजाही येणार नाही. नजीकच्या वर्षात दहीहंडी फोडतांना अपघातांचे वाढणारे प्रमाण चिंता वाढविणारे आहे, दु:ख आणि क्लेशकारक आहे. गोविंदाला गंभीर अपघात होऊ नयेत म्हणून काही कायदे किंवा नियमावली संबंधीत शासन, मंडळ किंवा आयोजकांकडून आणले जात नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते.
रसराज श्रीकृष्णाच्या आठवणीचे प्रतिक, त्याच्यावरील प्रेम व आनंदाप्रीत्यर्थ गोपाळकाला आणि दहीहंडीला सुरवात झाली. परंतू आता दहीहंडीला स्पर्धात्मक आणि व्यावसायिक रूप येऊ लागल्याने त्यातील भाव आणि रस कमी कमी होत जाऊन तो वेगळ्या वळणावर तर जाणार नाहीना अशी काळजी वाटू लागली आहे. एकेकाळी गिरगावात होणारा गोपाळकाला आणि दहीहंडीमधील शिस्त, गोविंदा पथकातील एकजूट, थोरामोठ्यांचा आदर, समाज प्रबोधनाचे ट्रक आणि बैलगाडीतून रत्यावरून निघणारे देखावे, धार्मिक बंधन आणि थोडी गंमत यांच्या विचारेने मन नॉस्टलजीक होते आणि वाटते हे सगळे आपण कुठेतरी हरवतो आहोत. रूढी, परंपरा आणि वास्तवापासून खूप लांब लांब जात चाललो आहोत. असे सगळीकडचे वातावरण आहे अश्यातील गोष्ट नाही. काही तरुण मंडळी आजही पारंपारिक दहीहंडी खेळतांना आढळतात. पण याला दोन-तीन वर्षापासून राजकारणी आणि व्यवसाईकांनी स्पर्धात्मक आणि चढाओढीचे स्वरूप आणण्याचा प्रयत्न चालवला आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply