जून महिना. शाळा सुरू झाली. नवा वर्ग.नवा मित्र. नवा संवाद. नवा खेळ. नवा अभ्यास. पावसाळी ढगाळ वातावरण. हिरवे झालेले डोंगर. झाडांनी रंग बदलला. तसा पाखरांनी किलबिलाट केला. मुलं शाळेत येवू लागली. उन्हाळ्यात कडक गेला. लगीनसराई, जत्रा, उन्हाळी खेळ संपले होते. नविन मुलांचे प्रवेश सुरू होते. एक अंधुकशी आकृती शाळेकडे येताना दिसत होती. कोण असेल बरं? उत्सुकता होती. ती व्यक्ती सरळ कार्यालयात गेली. वर्गातही आली. मुलांची ओळख करून घेतली. नाचतच पहिला तास घेतला. मुलं हसली. कुतुहलाने पाहत-ऐकत होती. नविनकाही सांगत होते. ते आमचे नवे गुरूजी होते.
एकेक दिवस मागे पडत होता. शाळा म्हणजे हसणे, खेळणे, उड्या मारणे, मजाच मजा असं वाटायला लागलं. मुलांना शिस्त लागली. दुपारी वर्ग सुटला की रांगेत मुल भात खायला जायची. मधल्या सुट्टीत सामान्य ज्ञान असायचे. भुमिती असो कि इंग्रजी त्यांच्या हातात एकतरी साहित्य असायच. तालुक्यावरून येणारे गुरूजी मुलांसाठी रोज काहीतरी घेऊन यायचे. मुलांसाठी पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्यक्रम होत होता. नाटक, नृत्य,नकला करताना मजा यायची. गावकरी बक्षीस द्यायचे. त्या जमलेल्या रकमेतून मुलांना खाऊ मिळायचा. शाळेची निसर्ग सहल निघायची. घरून नेलेले डबे तलावाकाठी बसून खायचे. एकमेकांना द्यायचे. मुलांनी कविता केल्या होत्या. कथा रचल्या होत्या. त्या गाताना मजा यायची. निसर्ग रमणीय दृश्य अजुनही डोळ्यासमोर रेंगाळते. सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीसाची रक्कम उरली होती. गुरूजींनी गावात वर्गणी मागितली. लोकं पुढे आली. शाळा रंगवून झाली. छान चित्र काढली. वारली चित्रकला, कथा, कादंबरी लेखकांचे , पुस्तकांचे छायाचित्रे भिंतीवर आली. नेत्यांचे फोटो आले. अभ्यास सोपा झाला. भिंती मुलांशी आणि गावकऱ्यांशी बोलू लागल्या. नविन मोठा टीव्ही शाळेत आला. अवघड अभ्यास सोपा झाला. शाळेत मैदान आखले गेले. खेळातही मुलं पुढे आली . संघ तालुक्याला खेळायला गेला. जिंकला तेव्हा सर्वांनी उड्या मारल्या. चित्रकलेत सर्वच मुलांच्या कल्पनेला पंख फुटले. रंगांची उधळण झाली. शासनाची परीक्षा अनेक मुलं पास झाली. धुलीवंदन शाळेतच होई. नाचत रंग शिंपडला जाई. हळुहळू मुलांची संख्या वाढली. खरेतर शिक्षण , शाळेतच रंग भरला होता. मुलांसाठी कविसंमेलन भरले. साहित्य संमेलन झाले. मुलं उत्साहाने सहभागी झाली. ग्रंथदिंडी निघाली. घोषणा दिल्या. लेझिम खेळायचे झाले. फुगडी झाली. गावकरी कुतूहलाने पहायचे सामील व्हायचे. पाहुण्यांची व्यवस्था पहायचे. सामुहिक भोजनाला आनंद असायचा. नवी प्रयोगशाळा आली. मुलं नविन प्रयोग करू लागली. आसपासच्या गावात शाळेची चर्चा होऊ लागली. अधिकारी वाहवा म्हणायचे. गावाच नाव निघू लागले. शाळा हे मंदिर झालं. मुलं ही देव झाली. गुरूजी हे पुजारी झाले.
एक बातमी धडकली. गरूजींची बदली झाली. आता ते दुसऱ्या गावी जाणार होते. मनाला वेदना होऊ लागल्या. सरकारी आदेश आला होता. नाईलाज झाला होता. गुरुजींनी बदली मागितली नव्हती. तरीही बदली झाली. मुलं पोरकी झाली. मुलं रडत होती. गाव डोळे पुसत होते. पाठमोरी आकृती धुसर होत होती.
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
(दै.सूर्योदय)
Leave a Reply