आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरूजनांबद्दल वाटणारा आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. भारतीय संस्कृती उच्च मानवीय मूल्यांवर आधारित, विश्वास ठेवणारी अशी थोर संस्कृती आहे. मातापित्यांच्या बरोबरच गुरूजनांचं ऋण मान्य करण्याची आपली परंपरा आहे. त्या आपल्या प्राचीन परंपरेची आठवण ठेवण्यासाठी या कृतज्ञता दिवसाची योजना आपल्या पूर्वजांनी केली असावी.
गुरूपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असं अगदी सार्थपणे म्हंटलं जातं. श्रीव्यासांची थोरवी वर्णन करणारा हा श्लोक असा आहे —
अचतुर्वदनो ब्रम्हा द्विबाहुरपरो हरि: ।
अभाललोचन: शंभुर्भगवान् बादरायण: ।।
त्याचा अर्थ असा — श्रीव्यासांना चार मुखे नसली तरीही ते ब्रम्हदेवाच्या योग्यतेचे आहेत. त्यांना दोनच हात असले तरी ते जणू दुसरे विष्णुच आहेत. त्यांच्या कपाळावर डोळा नसला तरी त्यांचा अधिकार, महत्त्व भगवान् श्रीशंकराप्रमाणेच आहे. ते बदरिकाश्रमात जन्मले म्हणून त्यांना बादरायण असे म्हणतात.
भगवान व्यास म्हणजे महाभारतकार इतकंच म्हणण्याने त्यांच्या अलौकिक बुद्धीसामर्थ्याची, विलक्षण विद्वत्तेची पुरेशी ओळख होणार नाही. प्रकांड पंडित, असामान्य विद्वान, लोकोत्तर साहित्यकार, परिणतप्रज्ञ इत्यादी विशेषणंही अपुरी पडावी असं त्यांचं साहित्यिक कर्तृत्व खरोखरच विस्मयकारी आहे.
आदियुगामधे वेद हा एक प्रचंड राशी होता. त्याचा अभ्यास करून तो टिकवणं अधिकाधिक अवघड होत चालल्याचं लक्षात आल्यामुळे श्रीव्यासांनी त्यातील सर्व ऋचा वेगळ्या काढून त्या संग्रहाला ऋग्वेद नाव दिले. त्यातील गाण्यायोग्य ऋचा वेगळ्या काढून त्या संग्रहाला सामवेद नाव दिले. यज्ञप्रक्रियेबद्दल माहिती देणार्या भागाला यजुर्वेद नावाने स्वतंत्र केले. आणि यातुविद्येचे लौकिक व्यवहारात वापरले जाणारे मंत्र वेगळे करून तो अथर्ववेद म्हणून बाजूला केला. अशा प्रकारे ४ वेदांच्या ४ संहितां करून आपल्या ४ शिष्यांकडे सुपूर्त केल्या. त्यांच्या पुढे अनेक शाखा उपशाखा झाल्या. वेदांचं असं विभाजन त्यांनी केलं यावरूनच त्यांच्या नावाची उपपत्ती ‘विव्यास वेदान्’ म्हणजे वेदांची विभागणी करणारे अशी झाली.
वेदांमधे ईश्वराच्या निर्विशेष रूपाचं प्रतिपादन आहे. त्याच्या अभिव्यक्तिचे एखादे दर्शन तोवर नव्हते. उपासना किंवा आत्मसाधना यांची उभारणी एखाद्या दर्शनावर असावी लागते म्हणून श्रीव्यासांनी ब्रम्हसूत्रे लिहिली ज्यात अध्यात्माचे सिद्धांत सूत्ररूपाने मांडले आहेत.
पुराणांचे एकत्रीकरण हे ही त्यांचे महान कार्यच म्हटले पाहिजे. जातीजमातींमधे पसरलेल्या वाड्.मयाला यथोचित संस्करण करून सुंदर, नेटके रूप दिले. यातूनच पुढे १८ पुराणांची निर्मिती झाली.
भारतीय लोकमानसाला अत्यंत भावलेलं श्रीव्यासरचित महाकाव्य म्हणजे महाभारत. मानवीजीवनाच्या भावभावना, धर्मनीती, कुलधर्म, राजनीती, युद्धनीती अशा सर्वांगांना स्पर्श करणारे अलौकिक काव्य म्हणजे महाभारत. ‘यद् इह अस्ति तद् अन्यत्र, यद् इह नास्ति न तद् क्वचित् ।’ हे निर्विवादपणे ज्याच्या बाबतीत सार्थ ठरते ते महाभारत. जे इथे आहे ते अन्यत्र सापडू शकेल पण इथे जे नाही ते कुठेच सापडणार नाही इतकं ते जीवनव्यापी आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।’ हे शब्दश: खरं आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचं जिवंत, रसपूर्ण चित्रण हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पुरातनकालापासून भारतीय जनमानसावर पडलेली त्याची मोहिनी आजही टिकून आहे.
अशाप्रकारे इतका अलौकिक बुद्धीमत्ता, विद्वत्ता असलेली व्यक्ती जागतिक वाड्.मयातही सापडणं दुर्मिळच आहे. अशा ह्या श्रीव्यासांचे पुण्यस्मरण या गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं करणं औचित्यपूर्ण आहेच, ते भारतीय समाजाचं कर्तव्य आहे.
— उषा शशिकांत जोशी
Leave a Reply