हा लेख `मराठीसृष्टी’च्या २०११ दीपावली विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे.
फाटकसरांचं आणि माझ्या आईचं लांबचं नातं होतं. त्यामुळे काही घरगुती कार्यात किंवा समारंभात मी त्यांना अनेकदा पण दुरूनच पाहिलं होतं. याखेरीज, जिथे जिथे विद्येची उपासना चाले, तिथे तिथे सर दिसत. ते ग्रंथसंग्रहालयात असोत की साहित्य संघात, भारतेतिहास संशोधन मंडळात किंवा प्राज्ञ पाठशाळेत ते कुठेही असले तरी आजूबाजूला माणसांचा गराडा आणि सरांचं अव्याहत बोलणं असा त्या बैठकीचा बाज असे. त्यात सरांचं निरनिराळ्या विषयांची माहिती देणं, एखाद्या वादग्रस्त प्रकरणाची चर्चा करणं किंवा कुणाचाही मुलाहिजा न ठेवता खास सरांच्या पध्दतीनं एखाद्या समाजमान्य व्यक्तीच्या मुखवट्यावरील शेंदूर खरवडणं चालू असे. सरांच्या निर्भीड पत्रकारितेची ओळख या वेळेपर्यंत मौज, नवा काळ, विविधवृत्त अशांसारख्या वृत्तपत्रांतील त्यांच्या लिखाणावरून झाली होती, एक वादग्रस्त व्यक्तित्व म्हणूनही ते प्रसिध्द झाले होते पण बावन्नसाली जेव्हा ते आम्हांला शिकवायला आले, तेव्हा त्यांना जवळून बघण्याचा योग आला.
पायांत कोल्हापुरी वहाणा, काहीसं लांडं वाटणारं धोतर, वर अंगासरसा बसणारा गडद निळा कोट, त्याच्या खिशातून डोकावणारा मळकट रुमाल आणि डोक्यावर काळी टोपी, या पोशाखात लांब लांब पावलं टाकत, एका हातातील दोन पुस्तकं छातीजवळ धरून सर वर्गात आले. टेबलाजवळ उभे राहिले. त्यांच्या उंच, सडपातळ शरीरयष्टीतून काटकपणा स्पष्ट होत होता. चष्म्याआडची भेदक नजर, धारदार नाक आणि चेहर्यावरचे मिश्कील भाव. सरांनी आपली पुस्तकं टेबलावर ठेवली, टोपी काढली, रुमालानं चेहरा पुसला आणि बोलायला सुरुवात केली. आम्ही सर्वजणं सावरून बसलो. नाटकाचा तास असल्यानं मी भाबडेपणानं नाटकाचं पुस्तक समोर घेतलं.
”हे नाटक म्हणजे नाटकाचं पुस्तक सर्वजणं घरी वाचून आला आहात का?” सरांनी गंभीरपणे प्रश्न केला. ”हो।।”एकमुखी उत्तर आलं. ”आता ते शेगडीत नेऊन घाला आणि त्यावर चहा करून प्या. अशा प्रकारची पुस्तकं बी.ए. च्या अभ्यासक्रमात नेमणारी ही युनिव्हर्सिटीही कौतुकास्पद आणि ते शिकवण्यासाह्णी माझ्यासारख्या आणि द.के. केळकरांसारख्या विद्वानांना नेमणारं आमचं कॉलेजही धन्य! हे पुस्तक मी तुम्हांला शिकवीन असा भ्रम तुम्ही कदापि मनात ठेऊं नका.” मी त्यांच्या बोलण्यानं स्तंभितच झाले. वर्गात जे काय शिकविलं जाईल, तीच पोपटपंची करून परीक्षेत पास होणाऱ्या माझं काय होणार या विचारानं बेचैन झाले.
”तुम्ही मात्र परीक्षेत या पुस्तकावर पूर्ण विचार करून उत्तरं लिहा. या नाटकावरच नाही तर प्रत्येक गोष्टीवर स्वत:चं काही मत तयार करण्याची शिस्त अंगात बाणवून घ्या. निरनिराळे प्रश्न स्वत:च उपस्थित करुन ते मत पडताळून पाहा, म्हणजे त्यानुसार वाचन आणि विचार करण्याची सवय जडेल. तुमचं मत कुणाला एकांगी वाटल, चुकीचं वाटलं तरी चालेल; पण उथळ वाटलेलं चालणार नाही.”
”आपल्या अभ्यासाच्या विषयावर इतरांची मतं जाणून घ्यावीत, पण आधी आपल्या लेखनाचा गाभा, विचार हे पक्के ठेवावेत. त्यांच्या पुष्ट्यर्थ किंवा दुसरी बाजू दाखविण्यासाठी त्यातल्या काही मतांचे उतारेही द्यावेत, पण केवळ इतरांची मतं मांडून दुढ्ढाचार्यासारखी बेफाम मतं ठेकत राहू नये. ”तुका म्हणे पेक्षा तू काय म्हणे’ ते सांगत जा. ”तो हे म्हणतो आणि हा ते म्हणतो यापेक्षा तुम्ही स्वत: काय म्हणता ते स्पष्ट करा आणि काहीच म्हणण्याजोगं नसेल तर गप्प बसण्यानं किंवा न लिहिल्यानंही काही बिघडत नाही.”
तासाला बसलेली आम्ही सर्वजणं लक्ष देऊन ऐकत होतो. सहज जाता जाता सर अमोल उपदेश करीत होते. पुढे आयुष्यभर मार्गदर्शक आणि उपयोगी ठरणारी ही शिदोरी होती हे आज अनुभवानं पटलंय. हे काही वेगळंच काम आहे, हा विचार मनात ठसत असतानाच तास कसा संपला हे कळलंच नाही. नाटकाचं उघडलेलं पुस्तक बंद करत असतानाच आज सरांनी त्या पुस्तकाला हातही लावला नव्हता हे जाणवलं होतं.
त्यानंतरही सरांनी हातात पुस्तक धरून कधी शिकवलंच नाही. त्यांच्या तासाला ते अनेक विषयांवर माहितीपूर्ण गप्पा मारत असत. त्यांच्या या गप्पा म्हणजे ज्ञानगंगेचा धबधबाच असे. त्यात इतस्तत: अनेक विषयोपविषय निघत. त्यांच्या बोलण्यात आम्हा विद्यार्थ्यना त्या वयात आवडणारा बिनधास्तपणा आणि कोणाची तरी मनमुराद चेष्टा असे. सरांच्या आश्चर्यकारक बहुगामी विद्याव्यासंगाचा त्यात सहजासहजी प्रत्यय येत असे. त्यातून बोलण्याची पध्दत खास सरांचीच! जसजसे दिवस गेले तसतशी सरांच्या बोलण्यातून मिळणार्या चौफेर माहितीमुळे आपल्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावत असल्याची जाणीव व्हायला लागली. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा आम्हांला आयता लाभ मिळत होता. त्यांच्या बोलण्यातून अनेक विषयांची माहिती तर मिळायचीच, पण त्याहीपेक्षा त्या त्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी मिळायची. त्यांचं परखड धारदार आणि क्वचित औपरोधिक विवेचन कुठलातरी मार्ग आपल्याला दाखवतंय असं वाटायचं.ललित वाङमय हा फाटक सरांच्या विचाराचा किंवा चिंतनाचा विषय नव्हता. साहाजिकच ललित वाङमयातील अस्तित्ववाद, वास्तववाद, अतिवास्तववाद अशा वाङमयीन विचारप्रवाहांचं त्यांना आकर्षण नव्हतं. कलेसाठी कला वगैरे वाङमय विचार त्यांनीं मुळातच भोंगळ म्हणून वाटेला लावले होते. त्यांना आकर्षण वाटे वाङमयातल्या सामाजिक , ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भांचं. इतिहास, समाजशास्त्र, दोन संस्कृतींच्या संकराने होणारे समाजातील वैचारिक संघर्ष , त्यातून उत्पन्न झालेल्या वादग्रस्त घटना या त्यांना अभ्यासाचा विषय वाटत. ललित वाङमय त्यांना हलकं फुलकं वाटे आणि ते शिकवायला तर त्यांना मुळीच आवडत नसे. ”त्यात शिकवायचं ते काय, तुम्हीच वाचा ”ते म्हणत .
बी. ए . च्या परीक्षेपूर्वी वर्गाचा निरोप समारंभ होता. सर निरोप देताना म्हणाले, ”आता यापुढे तुमची वाट तुम्हांला शोधायला लागणार. ती शोधण्याची पात्रता या अभ्यासामुळं तुम्हांला आली असावी अशी अपेक्षा आहे . तुम्हांला स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची शिस्त लावण्याचा प्रयत्न आम्ही केला . आता त्याला अनुसरून जेव्हा तुम्हांला स्वत:च्या अभ्यासानं काही ज्ञानाचा प्रकाश दिसेल त्या वेळेच्या आनंदाची बरोबरी कशानंही होणार नाही. तो आनंद तुम्हांला मिळत राहो, याकरता कोणता आशीर्वाद तुम्हांला या प्रसंगी देऊ?”
बी.ए .ची परीक्षा झाली. एम.ए. चे वर्ग सुरु झाले ज्या त्या कॉलेजमधील प्राध्यापकांच्या सोयीनुसार निरनिराळ्या कॉलेजमध्ये आम्हांला लेक्चर्सना जावं लागे. फाटकसर आम्हाला बखरींचा पेपर शिकवणार होते. विल्सन कॉलेजच्या प्रा. चारुशीलाबाई गुप्ते आम्हांला नल-दमयंती स्वयंवराख्यान शिकवणार होत्या . त्यांची आणि सरांची व्याख्यानं विल्सन कॉलेजमध्ये व्हायची असं वेळापत्रकात लिहिलेलं होतं. पहिले कित्येक आठवडे सर आलेच नाहीत. त्यांना पावसाळ्यात दम्याचा त्रास होत असे, त्यामुळे वाटलं, पावसाळा झाल्यावर ते येतील. एकदा काळजी वाटून मी त्यांच्या घरी गेले. त्यांची प्रकृती नेहमीप्रमाणेच दिसली. ”सर, तुम्ही आमचे एम.ए. चे वर्ग घ्यायला का येत नाही? आम्ही वाट पाहतो तुमची” मी विचारलं.
सर म्हणाले, ” तुला कुणी तरी मला विचारायला पाठवलं असेल तर त्यांना जाऊन सांग की मी विल्सन कॉलेजमध्ये कदापि ही एम.ए. चे वर्ग घेणार नाही. मला काय माझं कॉलेज नाही? मी बेवारशासारखा इतर कोणत्याही कॉलेजात जाऊन वर्ग घेणार नाही. पदव्युत्तर वर्ग चालू असणं हे त्या त्या वास्तूचं वैभव असतं. ते मी माझ्या कॉलेजला मिळवून देईन. विल्सनशी माझा काय संबंध?”
सर, ”तुम्हाला तुमच्या घरापासून यायला जायला जवळ पडेल म्हणून तसे वर्ग ठरवले ”मी बोलण्याचा प्रयत्न केला, मला काय जवळ पडेल हा विचार त्यांनी करण्याची त्यांना काही गरज नाही. आपल्या कॉलेजचा मान असाही सांभाळायचा असतो हे त्यांना काय कळणार हे दिसतंच आहे. रुइया कॉलेज हे माझं घर आहे. मी तिकडच्या पायर्यांवर पडलो तर माझे विद्यार्थी मला उचलायला येतील. विल्सनमध्ये माझं काय आहे?”
लवकरच त्यांची व्याख्यानं रुइयात सुरू झाली. परीक्षेसाठी नेमलेल्या विषयांखेरीजही कोणताही विषय शिकण्यासाठी त्यांच्याकडे जाण्याची मला पूर्ण मुभा होती. तिचा मीही पुरेपूर उपयोग करून घेत होते.
सरांची खोली म्हणजे पुस्तक-महाल ! सतत चालणार्या एका ज्ञानयज्ञाची ही खोली साक्षीदार !. सरांना अखंडपणे वाचताना, लिहिताना, मनन करताना आणि शिकवताना या खोलीनं पाहिलं आहे . फार मोठ्या मोलाची ग्रंथसंपत्ती सरांनी याच खोलीत निर्माण करून महाराष्ट्राच्या बौध्दिक संपत्तीत अमोल भर घातली. कितीतरी थोरामोठ्यांचे पाय या वास्तूला लागले. त्यातही स्वत: सरांचं कधीच कुणाकडे काम नसायचं. लोकांचंच त्यांच्याकडे काम असायचं. विद्यार्थी, प्राध्यापक, तत्त्वज्ञ , धर्ममार्तंड , कलावंत , संस्थाचालक, राजकारणी अशा अनेक प्रकारच्या आणि सर्व थरातल्या लोकांचा त्यांच्याकडे राबता असायचा . लक्ष्मणशास्त्री जोशी, विनायकराव पटवर्धन, दत्तो वामन पोतदार, सोनोपंत दांडेकर , दुर्गाबाई भागवत, सोपानदेव चौधरी, श्री. पु. भागवत, स.का. पाटील , वसंतराव नाईक, पृथ्वीराज कपूर, कमाल अमरोही, दिलीफमार , भालजी पेंढारकर , लता मंगेशकर, आशा भोसले, आर. डी . बर्मन, सुधीर फडके आणि कितीतरी..एकदा मी आणि सरांची सून देवयानी सरांमुळे त्या वास्तूत येऊन गेलेल्या नामवंतांची जंत्री करत होतो. तेव्हा मामी,सरांची भावजय म्हणाल्या, ”अग, मुख्य म्हणजे स्वत: काकाच या वास्तूत राहिले हे त्या वास्तूचं सर्वात मोठं भाग्य आहे हे लक्षात घ्या.या लहानशा गल्लीमध्ये ते राहतात, पण ते गल्ली-बोळातले नाहीत, फार फार मोठे आहेत.”
मी एम.ए. पास झाले . एका कॉलेजमधून मला लेक्चररची जागा देऊ केली होती. मी सरांजवळ तो विषय काढला . सर म्हणाले ”तू एम.ए. ची परीक्षा पास झालीस यात तुझं सगळं शिक्षण झालं, संपलं असं वाटतंय का तुला? आत्ता तू कुठे एम.ए. झालीस या वेळी दुसर्याला शिकवण्याइतकी पात्रता आणि परिपक्वता आलेली नसते. दुसर्याला शिकवण्याइतकं हे ज्ञान पुरेसं नसतं. कॉलेजच्या परीक्षा आता संपल्या. आता तुझा खरा अभ्यास सुरू होईल ” दुसर्याला शिकवताना आपल्याला खूप यावं लागतं” या त्यांच्या उपदेशाचा मी मनोमन स्वीकार केला.एका सकाळी त्यांच्याकडे गेले असताना सर काहीतरी गुणगुणत पुस्तक बघत होते . नीट ऐकलं तर चक्क ‘ललत ‘ राग होता . मला फारच आश्चर्य वाटलं. ”सर, तुम्हांला गाता येतं ? ”मी विचारलं . ”खरं तर कधी आपल्यात विषयच निघाला नाही. मी फार पूर्वी विष्णु दिगंबर पलुस्करांकडे अनेक वर्ष गाणं शिकलो आहे. नंतर तर काही काळ त्यांच्या मैफलीत त्यांच्या मागं बसून मी त्यांना गाण्याची साथ करत असे.” मी थक्क झाले.भोर संस्थानातल्या जांभळी गावी15 एप्रिल 1893 या दिवशी सरांचा जन्म झाला .सरांचं बरचसं बालपण जांभळीला गेलं . त्यांचे वडील त्या वेळच्या ब्रिटिश सरकारच्या इंजिनियरिग खात्यात हिशेबनीस आणि पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते . वडिलांच्या वारंवार बदल्या होत असल्यानं राजस्थान ,अजमेर, अलाहाबाद , लाहोर अशा अनेक ठिकाणी सरांचं वास्तव्य झालं .
सरांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रारंभ होताना , किंबहुना माध्यमिक शिक्षण संपतानाच्याच काळात पुण्याला नुकत्याच स्थापन झालेल्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळाशी’ व त्यातील संशोधक व व्यासंगी व्यक्तींशी त्यांचा संबंध आला आणि त्यांना संशोधनाची गोडी लागली. इतक्या लहान वयातच त्यांचे तात्यासाहेब मेहेंदळे . सरदार आबासाहेब मुजुमदार, वा. सी . बेंद्रे, म.म.दत्तो वामन पोतदार यांच्याशी स्नेह जुळले. पुढे भारताचा अद्ययावत् इतिहास आणि प्राचीन व अर्वाचीन मराठी साहित्य या विषयांत असाधारण स्थान मिळविलेल्या सरांच्या अभ्यासाची प्राथमिक तयारी इतक्या लवकरच्या वयातच म्हणजे वयाची वीस वर्षं होण्यापूर्वीच झाली होती.कॉलेजचं शिक्षण झाल्यावर सरांनी मुंबईत पत्रकारितेचा व्यवसाय केला. बंड आणि त्याची स्फूर्तिदेवता झाशीची राणी या विषयावर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या कर्तृत्वाबद्दल तसंच लोकमान्य टिळक यांच्या चरित्रावर प्रबंधात्मक लिखाण प्रसिध्द केलं. सरांच्या विद्वत्तेबद्दल लोकांची खात्री झाली तरी त्यातनं व्यक्त झालेल्या विचारांमुळे वाद निर्माण झाले.सरांच्या विचार पध्दतीलाच वस्तुनिष्ठता आणि शास्त्रकाट्याची कसोटी लागलेली असे, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या गेल्या चारशे वर्षांतील इतिहासातील, इतिहास म्हणून सांगितल्या गेलेल्या अनेक अद्भुतरम्य, पौराणिक, कल्पनारचित कथांची काल्पनिकता परखडपणे. आणि आत्मविश्वासानं उघडकीस आणली. त्यांच्या या निष्ठेचं स्पष्ट दर्शन त्यांनी लिहिलेल्या ‘भारतातील इतिहास संशोधनाचा आढावा ‘या तेरा’ लेखांच्या लेखमालेत होतं.
गोलमेज परिषदेच्या निमित्तानं 1930. साली सरांनी राज्यघटनेसंबसधी लेखमाला लिहिली होती. त्यानं प्रभावित होऊन खुद्द राजाजी सरांना भेटायला आले होते .मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सरांची महाभारतावर व्याख्यानमाला होती . सभेचा एक उपचार म्हणून सरांचा परिचय मला करून द्यायचा होता. तो करून देतांना साहजिकच मी त्यांच्या इतिहास संशोधनातील निष्ठेबद्दल बोलले. आपल्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी माझ्या या बोलण्याला संदर्भ देऊन सर म्हणाले, ”अचला जोशी माझ्या विद्यार्थिनी त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दलच्या आपलेपणाने माझ्याबद्दल असली नसलेली बरीच माहिती दिली. ते त्यांना शोभलं तरी मला ती चिकटवून घेणं प्रशस्त वाटत नाही. मी खूपच मराठी जुनं वाङमय इतिहासाकरिताच वाचलं आणि वाचतो. तथापि हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की मी संशोधक नाही. लोकांच्या घरगुती संग्रहातून अप्रकाशित हस्तलिखिते काबीज करण्याच्या उद्योगाला संशोधन म्हणतात. ते मी कधी केलेलं नाही. इतिहासाचे अध्ययन ही माझी जीवननिष्ठा समजणारांनी तिच्यातली संशोधनाचा अभाव ही उणीव दृष्टीआड करू नये.” सरांच्या बोलण्यात सडेतोडपणा आणि लेखणीत अभिनिवेश असला तरी त्यांच्या अभ्यासविषयक जाणीवात प्रांजळपणा होता. नसलेलं श्रेय त्यांनी स्वत:लाही घेतलं नाही आणि दुसर्यालाही दिलं नाही .आदरणीय लक्ष्मणशास्त्री जोशी यांना सरांच्या ज्ञानसाधनेची योग्य जाणीव होती. ”भारताच्या राष्ट्रीयतेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सम्यक स्वरुप निदर्शनास आणणारे जे थोडे इतिहासचिंतक आहेत त्यात फाटक यांची गणना केली पाहिजे …भारताच्या प्राचीन व अर्वाचीन अशा समग्र इतिहासाचा दीर्घ व्यासंग त्यांनी केला आहे … आधुनिक महाराष्ट्राची व मुंबईची जडण घडण कशी झाली याचं तपशीलवार विवेचन व यथार्थ वर्णन करण्यास समर्थ विद्यमान व्यक्तींत फाटकांइतका कोणी असेल असं वाटत नाही ” असे नि:संदिग्ध उद्गार शास्त्रीबुवांनी सरांबद्दल काढले होते. इंदुप्रकाश, नवाकाळ यात नोकरी केली तरी विवधज्ञान विस्तार, विविधवृत्त, प्रभात या त्या काळातल्या वृत्तपत्रांतही नैमित्रिक लिखाण केलं . इतिहास वाचताना मूळ साधनांकडे बारकाईने लक्ष देऊन कोणत्याही घटनेचा बुध्दिवादी दृष्टीनं विचार करणाऱ्या सरांच्या शिस्तीत भोंगळपणाला वाव नव्हता, कुठल्याही थातुरमातुर कल्पनाविलासाला जागा नव्हती आणि तसे लिहिणाऱ्या कोणालाही क्षमा नव्हती , मग ती व्यक्ती कितीही मोठी असो .
या ज्ञानर्षीने एकलव्यासारखा सतत ध्यास घेतला होता तो ज्ञानसाधनेचा, आणखी, आणखी ज्ञान मिळविण्याचा . कधी ते दुपारचे झोपलेले दिसले नाहीत की वाचन लेखनापलीकडे काही करताना आढळले नाहीत. एखाद्या धनसंपन्नाला महाग वाटावीत अशी पुस्तकं सर लीलेनं विकत घेत. शेवटी सरांची कितीतरी पुस्तकं ग्रंथ संग्रहालय आणि त्यांचे विद्यार्थी यांच्याकडे गेली आहेत. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या ‘केवलानंद स्मारक’ मंदिराच्या ग्रंथसंग्रहालयाला शेकडो बहुमोल ग्रंथ सरांनी दिलेले आहेत. रुइया कॉलेजला त्यांनी तीन चार कपाटं भरून पुस्तकं दिली आहेत. कॉलेजमधून सर निवृत्त झाल्यावर त्यांना त्यांचं कुठचं पुस्तक वाचायचं असेल तर मला आणायला सांगायचे नेमकं ते पुस्तक कोणत्या कपाटातील कोणत्या खणात असेल ते सांगायचे आणि म्हणायचे, ”कपाट उघडतेच आहेस तर आपल्या सर्वच कपाटांतून डी.डी.टी. मारुन घे . मात्र स्वत:चा शहाणपणा वापरून पुस्तकांच्या जागा बदलू नकोस. मला ती घरी बसून आणवता येतील अशीच ठेवलेली असली पाहिजेत.’ एक दिवशी सरांचा कॉलेजमध्ये निरोप आला. त्यांना काही पुस्तकं तातडीनं हवी होती . मी ती सरांच्या घरी घेऊन गेले तर तिथे म.म.दत्तो वामन पोतदार बसले होते. आणि दोघं संस्कृतमधे गप्पा मारत होते . त्यांना ती पुस्तकं देत सर त्यांना म्हणाले, ”हं ! ही घ्या पुस्तकं ! आहेत ना बरोबर ? मात्र ती परत करायचं लक्षात असूं दे! ” सर त्यांना म्हणाले . ”बघू हो! मला काय तुमची पुस्तकं लक्षात” ठेऊन परत करायची इतकंच काम आहे की काय.” पोतदार म्हणाले . स कृतक कोपाने त्यांच्याकडे पाहत होते .
ज्ञानाची खळाळती गंगा सरांच्या रूपाने सर्वांसाठी सदैव उपलबध असे. मी स्वत: मोठ्या हक्काने तिचा फायदा करुन घेऊन आयतं ज्ञान पदरात पाडून घेतलं आहे. सरांना माझ्याबद्दल वाटणाऱ्या मायेचं दर्शन घडवणारे काही प्रसंग अगदी काल घडल्यासारखे माझ्या डोळ्यांसमोर आहेत. माझा एम.ए. चा रिझल्ट लागला. सकाळी पेपरात रिझल्ट पाहून मला त्यांच्याकडे जायची, त्यांना भेटायची घाई झाली .मी तयार होऊन दारात आले तो सर आमच्या जिन्यावरून वर येतांनादिसले. त्यावेळी फार आनंद झाला होताच, आज अधिक विचार करण्याची आणि भावना समजण्याची कुवत आल्यावर तो क्षण अक्षरश: सोन्याचा असावासं वाटतं .
हरि नारायण आपटे यांच्या कादंबर्यांवर मुंबई मराह्णी साहित्य संघात झालेल्या माझ्या व्याख्यानमालेला सर अध्यक्ष होते. ते तर मोठ्या कौतुकाने आलेच पण घरातले काकू, मामी, देवयानी, बाळूदादा हेही सर्व तीनही व्याख्यानांना आले. त्यांना आणि पुढच्या खुर्चीवर बसलेल्या सरांना मंचावर जाण्यापूर्वी नमस्कार केला . ”तयारी केली आहेस ना भरपूर ? चांगली बोल . माझे तुला नेहमी आशीर्वाद आहेत.” सर म्हणाले आणि मग मिश्कीलपणे मला म्हणाले, ”आम्हांस असे वाटते , असा थाट नाही ना?” यावर मी म्हणाले होते ”आम्हांस तरी तसे वाटत नाही” यावर आम्ही दोघेही मनमोकळं हसलो आणि माझ्या मनावरचं दडपण बरंच कमी झालं .
माझं लग्न झाल्यावर सर एकदा माझं घर पाहायला आले. जागा लहान असल्यानं बुफे केला होता. सरांच्या हातात मी बशी दिली ”सर, येता जेवण घ्यायला?” मी विचारलं. ‘हे बघ,’ सर म्हणाले, ”तू जे जे काही केलं आहेस, ते या बशीत घालून मला इकडे आणून दे मला मी बसल्याजागी. आज तुमचं तुम्ही वाढून घ्या म्हणती आहेस, पुढच्यावेळी तुमचा तुम्ही स्वयंपाक करून घ्या म्हणशील ! ”
सरांकडे चर्चा करायला , शिकायला परगावाहून आणि कधी तर परदेशाहूनही विद्वान येत असत . कुणीही आलं तरी सरांच्या पानाबरोबर त्यांचं पान असे. नातवंडांची पानं त्यातच . सुरुवातीला खुद्द देवयानीला हे वेगळं वाटलं. ती म्हणाली, ”मामी ,ही आहेत परदेशची मंडळी . त्यांचा धर्मही आपल्याहून वेगळा . मग त्यांना इथे आपल्या माजघरात आपल्याबरोबर जेवायला कसे बसवतो आपण? ” त्यावर मामी म्हणाल्या,”अग, साता समुद्रापार हे लोक आपली घरं आई-वडील सोडून काकांकडे शिकायला येतात , त्यांना आपल्या घरात दशग्रंथी ब्राम्हणाचा मान काका देतात आणि आम्हांलाही ते पटतं.” या उपर तुला काही शंका असल्या तर तू काकांना विचार देवयानीला काहीही विचारायची गरज वाटली नाही .सरांबद्दल किती आणि कायकाय लिहावं ? ”झाले बहु, आहेतही बहु, होतीलही बहू, परंतु या सम हा ” असे सरांचे सर्वच विद्यार्थी म्हणत असतील . आपल्याकडचं ज्ञान , पुस्तकं , प्रेम , माया सर्व काही आजन्म देत राहिले .
सरांच्या शेवटच्या आजारात रघूजी त्यांना सोबत व्हावी म्हणून रात्रीचा अभ्यास त्यांच्या टेबलाशी बसून करत असे याचे त्यांना फार सुख होई . ”त्याला इतका अभ्यास करतांना बघूनच मला आनंद होतो ; त्याच्या दिव्याचा मला काही त्रास होत नाही. अभ्यास करणाऱ्याची सोबत फार समाधान देते .” ते म्हणत . गुरुवार , दिनांक एकवीस डिसेंबर, एकोणऐंशीचा दिवस सरांच्या इच्छेप्रमाणे , त्यांचं मस्तक रघूजीनं प्रेमाने मांडीवर घेतलं असताना ,समोर मुलगा, दुसरा नातू, देवयानी, काकू, मामी आणि इतर नातेवाईक त्यांच्या संन्निध असताना, बुध्दि आणि अंत:करण स्वच्छ , प्रकाशमय असताना सरांनी वयाच्या 86 व्या वर्षी या जगाचा शांतपणे निरोप घेतला होता. हा तृप्तीचा, शांत भाव त्यांच्या अचेतन चेहर्यावरही दिसत होता .
संध्याकाळी घरी आले तो सरांना देवाज्ञा झाल्याचे दोनतीन फोन येऊन गेल्याचं कळलं. ह्यांच्यासाठी किंवा कुणासाह्णीही न थांबता निघाले आणि जिने उतरतानाच पाय गळाठले.सरांच्या पार्थिव देहावरून हात फिरविला , पायांवर डोकं ठेवलं आणि कढ आले ते आपलं मायेचं छत्र हिरावलं गेल्याच्या जाणिवेचे. जीवनाच्या नित्यक्रमात सरांसारखी सोन्यासारखी माणसं भेटतात. योग असला तर त्या भेटीतून अधिक सहवास आणि जिव्हाळा निर्माण होऊन आपलं जीवन उजळून जातं. सरांच्यानिधनानं माझ्या जीवनाचा तो उजळलेला भाग आता मरुनच गेला आहे. मागे राहिलंय ते त्यांच्या असंख्य आठवणींचं मोहोळ. त्यांच्यासारखी शरीरयष्टी किंवा एखादी वागण्याबोलणातली ढब असलेली कोणी व्यक्ती भेटते, तेव्हढ्यानं देखील हे मोहोळ जागं होऊन उधळतं आणि असंख्य स्वरूपातले सर दिसायला लागले. सरांच्या पार्थिव देहाकडे पाहिलं आणि वाटलं, यांनी केलेल्या ज्ञानयज्ञांची आज सांगता झाली. त्यांच्याबरोबरच त्यांचा अभ्यास, तर्कशुध्द विचारसरणी, त्याद्वारे मिळालेलं ज्ञान हे पण गेलं. कुठं गेलं असेल ते सारं? हा तर शतकानुशतकांचा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे पण प्रत्येकाला तो आयुष्यात अनेकदा छळतो . सरांनी लिहिलेल्या लेखांच्या आणि लाख मोलाच्या पुस्तकांच्या रूपात त्यांची ज्ञानविचक्षणा, तर्ककर्कश वृत्ती दिसत राहिली तरी त्यांच्या बुध्दिमत्तेच्या प्रचंड झेपेचा तो पहिलाच टप्पा म्हणत येईल इतकाच आहे. सरांनी अखंड ध्यास घेऊन विद्यार्जन केलं, स् वत:च्या आणि आपल्या सहवासात येणाऱ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या, शेवटी शेवटी आदल्या दिवशी येऊन गेलेलं माणूस आठवायचं नाही पण शेकडो वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या गर्भातल्या व्यक्ती आणि प्रसंग तारीख-वारांसह संपूर्ण तपशीलवार भक्कमपणे स्मरणात असायचे. त्यात जराही इकडंतिकडं व्हायचं नाही.
जीवनाच्या नित्यक्रमात सरांसारखी सोन्यासारखी माणसं भेटतात. योग असला तर त्या भेटीतून अधिक सहवास आणि जिव्हाळा निर्माण होऊन आपलं जीवन उधळून जातं. सरांच्या निधनानं माझ्या जीवनाचा तो उजळलेला भाग आज भरभरून गेला आहे. मागे राहिलं ते त्यांच्या असंख्य आठवणींचं मोहोळ. त्यांच्या सारखी शरीरयष्टी किंवा एखादी वागण्या बोलण्याची ढब असलेली कोणी व्यकती भेटते, तेवढ्यानं देखील हे मोहोळ जागं होऊन उधळतं आणि असंख्य स्वरूपातले सर दिसायला लागतात आणि त्यांच्या निरनिराळ्या वेळच्या आठवणी उत्कटतेनं येतात. त्यातच ते हयात नसल्याची जाणीव दंश करते.
कधी त्यांचे पुत्रवत विद्यार्थी श्री. पु. भागवत,बाळ सामंत किंवा ग.रा.कामत भेटतात . मग सरांच्या आठवणी निघतात आणि डोळे ओलावतात. अजूनही सरांच्या घरी गेल्यावर आत जाण्यापूर्वी त्यांच्या खोलीच्या दाराशी पावलं रेंगाळतात वाटतं, चाहूल लागली की सर वर बघतील आणि म्हणतील, ”या, बसा तुमच्या सिंहासनावर ” मग लक्षात येतं
ऋणानुबंधांच्या आता तुटल्या गाठी;मग कुठल्या गाठी भेटी ?
अचला जोशी 11, आसावरी – सी, 214, वीर सावरकर मार्ग , मुंबई, 400016.मो: 9322790333……
— अचला जोशी
Leave a Reply