काल राहुल देशपांडेंचे तू-नळीवरील ताजे ताजे ” माई री, मैं कासे ” ऐकत होतो आणि अचानक “पिंजर ” मधील या गाण्याची आठवण चमकून गेली. गुलज़ार / उत्तम सिंह आणि जगजीत यांचे ” हाथ छूटे भी तो ” माझ्याकडील “मरासिम ” च्या कॅसेट मध्ये होतं. तलम रेशमी, जीवन पचविलेल्या आवाजात जगजीतने ते गायले आहे.
पण कडव्यांमध्ये फेरफार करून गुलज़ारने जेव्हा हे “पिंजर ” मध्ये घातले तेव्हा या त्रयीने विव्हळणारा आगीनडाग दिला. फाळणीची जाळपोळ आणि क्षती पोहोचलेले जीव या गाण्यात उतरले. जालियनवाला बागेचे कांड फिके पडेल अशी ही फाळणीची जखम !
या होरपळीच्या आठवणींनी दग्ध झालेला गुलज़ार जणू स्वतःचे सांत्वन करतोय-
” हात सुटले म्हणून काय झाले? (त्या मातीशी, त्या लोकांशी) नातं तर तुटलं नाही ना ? वेळेच्या फांदीवरून क्षण गळून पडत नसतात. “
ते तर सगळं अंतर्यामी लख्ख आहे. हिंदू उर्मिलाला तिचे लग्न ठरले असताना जुना बदला चुकता करायचा म्हणून मुस्लिम मनोज तिवारी आणि त्याचे रिश्तेदार पळवून नेतात. निकाह झालेली उर्मिला नवऱ्याबरोबर पाकिस्तानात असते, थोडे दिवस उपचारांसाठी भारतात आल्यावर (होऊ न शकलेल्या ) आपल्या हिंदू नवऱ्याची दुरून नजरभेट घेते.
वेळेच्या फांदीवरून क्षण गळून पडत नसतात.
ती पाकिस्तानात परतते आणि सरतेशेवटी सीमेपर्यंत येऊन भारतात जाण्याऐवजी पतीसमवेत पुन्हा पाकिस्तानात जाते.दोन देशांमधील ही तिची येरझार जीवघेणी असते. नकाशावरील काही रेषांचे हे प्रताप आणि त्याची फळे भोगणे नशिबी आलेली ही निर्दोष माणसे !
” जिने पाऊलखुणाही मागे ठेवल्या नाहीत, तिचा शोध न घेता ” हिंदू उध्वस्त पती या रेषांशी जुळवून घेतो. आणि “त्याने आवाजच दिला नाही, अन्यथा मी शतकानुशतके मागे वळून पाहिले असते ” अशी तिची अवस्था.
तिचा भाऊ मात्र सुडाने मनोजचे रान उभे पेटवतो.
समंजस मनोज पुन्हा नातेवाईकांना सांगतो- ” आपण त्यांची तरणीताठी मुलगी पळवून आणली.त्यांचा राग जायज आहे.”
असाच समंजसपणा तो शेवटी दाखवितो- उर्मिलाला भारतात परतायचे असेल तर —– !
आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भूमिकेत आहे मनोज ! त्याचा अंडरप्ले आणि प्रगल्भपणा काहीच्या काहीच थोर आहे. उर्मिलाचा जन्म या एकाच भूमिकेसाठी झाला असावा असे वाटते.
“ बह रही है तेरी जानिब ही ज़मीं पैरों की
थक गए दौड़ते दरियाओं का पीछा करते “
आपणही त्यांची ही उरफाटी दौड बघून थकून जातो. जगजीत आणि गुलज़ारला यथायोग्य मिळालं, थोडा मागे पडला – उत्तमसिंह ! “डी टी पी एच ” लाही त्याने अप्रतिम संगीत दिलं होतं. इथे तर प्रश्नच नाही.
त्याच्या पूर्वजांनीही फाळणी जगली असेल कदाचित !
ती माती अजूनही त्यांना हाकारते आहे. नकाशावरील देशाचे नांव मातीला माहीत असण्याचे कारण नाही. पण अजूनही लालकृष्ण अडवाणींना त्या भागाचे वेध लागतात. मिल्खा सिंग ला तिकडे जावेसे वाटते. राज कपूर आणि दिलीप कुमारची “पुशतैंनी ” घरे वाचवावी असे आपल्याला वाटत राहते. “वीर-जारा ” मध्ये शाहरुख म्हणतो – ” ती (राणी मुखर्जी ) माझ्या देशवासीयांसारखीच दिसते.” माझा मित्र रविशंकर कंपनीच्या कामासाठी लाहोर ला गेल्यावर ते गांव कसे प्रति-मुंबई वाटते, आणि तिथल्या सहकाऱ्यांच्या आदरातिथ्याने कसे भारावून जायला होते, हे तोंड दुखेपर्यंत सांगत होता.
असेच दुसरे गाणे या चित्रपटात आहे- अमृता प्रीतम यांची ती रचना आहे.
” अज अंखा वारिश शाह नू ” ! सगळ्या सीमा ओलांडून ही वारिश शाहला केलेली विनवणी मला पंजाबी, इंग्रजी, शाहमुखी, गुरुमुखी आणि अर्थातच हिंदी /उर्दूत मिळाली.
विनवणी करणारी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात अमृता आहे-
सहन करण्याच्या बाबतीत कदाचित गुलज़ारच्या एक पाऊल पुढेच असेल ती.
वडाली बंधूंनी कपिल शर्माच्या शो मध्ये गाऊन हे गीत जिवंत केले होते. “पिंजर ” मध्ये ऐकताना मात्र फाळणीचे जाळून टाकणारे दाहक भागधेय आपल्यालाही चटके देते.
मी त्याच्या मराठी भाषांतरासाठी थांबलोय. मला इतकं टोकाचं “पोळलेलं” अपील जमणारच नाही. एका प्रथितयश कवयित्रिकडे ते काम दिलंय. तिची प्रतिभा कधीतरी न्याय देईल या रचनेला. त्यावेळी वारिश शाहला हाकारेन आणि कबरीतून बाहेर येण्याची पुन्हा विनंती करीन.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply