नवीन लेखन...

हाल्या भुसा खातो

पोळ्याचा सन दोन दिवसावर आलता.घरात अठरा विश्व दारीद्र्य.त्यात घरातला सगळा दाळदानाबी संपला व्हता.देवालं निवदालंपण दाळ,गुळ नव्हते.पहाटं उठल्या उठल्याच बायकोनं किरकिर कराया सुरवातं केलती.“मी हाय मनुन टिकली या घरात….” हे जगातलं सगळ्यात जास्त बोललं जाणारं वाक्य तीनं पुन्हा एकदा मलं फेकुन मारलं व्हतं.. बायकोच्या किरकिरीलं कटाळुन मी रूमालं झटकला आन बाहीर पडलो.मनलं पाव्हाव कुठुन उसनं- पासनं भेटते का ते….! कानालं रातची चुरगळलेली बिडी लावलेली व्हती.तलफ लागल्यानं म्या ती पेटवली.दोनबी झुरके झाले नस्तीलं तंबिडीनं दम तोडला.तल्लफ आधुरीच राह्यली.कोणाकडं उसनवारी कराय जावावं या विवंचणेत म्या पडलो व्हतो.तेव्हड्यात मलं किसना मुकादमाची आठवन झाली.याच्या आंधीपण लयदा कामावर येतो या आश्वासनावर म्या मुकादमाकुण उधारी आनली व्हती.आशेनं म्या मुकादमाकडं निंघालो तं मुकादम गाडी काढुन कुठं तरी जायाच्या तयारीत व्हता.म्या हाटकलं तं मुकादम एकदम मह्यावरं डाफरलाच.रागानंच मलं मनला की,“मायझं चांगला म्हत्वाच्या कामालं निंघालतो तं हाटकलं या आपिश्यानं,आत्ता झाले कामाचे तिन तेरा अन नव बारा.” .मुकडदमानं गाडी स्टॅंडवर लावली.घरात गेला अन पाणी पिऊन दोन मिंटाचा येळ घरातच बसला.त्यालं म्या हाटकल्याचा अपशकुन वाटल्यानं तोड मनुन ते घरात जाऊन बसला व्हता.मुकडदम येवोस्तोर म्या तिथंच पायर्‍यावर बसुन राह्यलो.मुकडदमाचा गडी पुढ्यात येऊन मनला की,“अयं सद्या,चलं निघ यिथुनं,मालकं महत्वाच्या कामालं निंघलेतं तव्हा हटकु नको.संद्याकाळी ये आसं मालकं मनलेतं.”मव्हा चेहरा पडुन गेला.म्या मनातल्या मनात मनलो कि,“ब्वा,घरातल्या मोठ्या माणसायलं पोळी नाय भेटली तं चाललं पण लेकरबाळं अन बैलायलं तरी पोळी भेटावी.”मुकादमाकडुन पैशाची आशा तं मावळली व्हती.येवढ्यात मुकादमानं गाडी काढली मुकादमाच्या एझडीनं बका बका धूपन सोडलं.मी तिथून उलट्या पावली निंघालो व्हतो.मलं बीडीची तलफ लागली होती.तेवढच येझडीच्या धुपटानं जरा बरं वाटलं.

मी रस्त्यानं चाल्लो व्हतो.एवढ्यात रस्त्याच्या कडलं नामदेव कढाण्या धोतर वाळवतं तं कोंडु कफाल्या रेडकु चारत बसले व्हते.पैशावाले नसले तरीबी दिलदार दोस्त व्हते ते महे…! मनात मनलं,“मायझं पैशाचं काम व्हवो न व्हवो पण जिवाभावाचे दोस्ततं भेटले.” दोस्तायलं भेटल्यानं मव्ह मन हारकुन गेलतं.म्या तेह्यच्या जवळ गेलो अन फतकल मांडी घालून बसलो.म्या मनलं कोंडु दा काढ एखांदी बिडी…! तसं कोंडुदानं एक मजुर छाप बिडी आन माचीस मह्याकडं सरकवलं.पहाटपसुन तल्लफनं मव्हा जीव निस्ता कासाविस झालता.म्या हावरटावणी गडबडीनं बिडी पेटविली अन एक जोराचा झुरका मारला.दोन बोटायच्या चिमटीतं बिडी पकडुन नामादा आन कोंडुदालं मनलं कि,“उंद्या पोळा हे.घरात दाळ दाना काहिच नाही.तव्हा पाचकशे रूपये असतीलं तं द्या बो…मुंग आलाय.पोळा झाला कि काढुन बजारात नेतो.अन तुमची उधारी फेडतो बो.”जसा मी एका दमात बोललो तसचं तेहनबी तेव्हड्याच चपळतेनं मलं नाही मनतं तेह्यचीच ब्याद मांडली. म्या मनलं आज खांदे मळन हाये, पाहु मनलं काय हातालं लागते का ते…काही उधारी पाधारी करावं मनलं तं ते दोघं बी मह्यासारकेचं ठणठण गोपाळ…!!! मह्याजवळ खडकुबी नवता.बजारालं तं जायाचं व्हतं पण फाटक्या खिशावर आणेराव रूसलेले व्हते.नामा कढाण्या आन कोंडु कफाल्या दोघायजवळ मिळूनं शंभरक रपै व्हते.मल कढाण्याची खोडी माहीत होती.जवळ पैसे असून बी ते काढायचं नाही.तरीबी नामा कढाण्यानं धोतराच्या कंबळातुनं हळुचं धा धा च्या चुरगळलेल्या पाच सहा धोटा काढल्या….कोंडुदानंबी आटुळे पिटुळे घेत पयजम्याच्या खिशातुनं पन्नासाची कडकडीत नोट काढली.तिघायच्या घरचा पोळ्याचा बजार करायचा मनलं तं दोन तिन हजारं तरी लागले आसते.काय करावं कायबी सुचत नवतं.म्या मनल मव्हा दोस्त तालुक्याल राहते.नवकरकिलं हे.त्याच्याजवळ चिक्कार पैकं आसतातं.चला जाऊन पाहू.तव्हा खेड्यापाड्यानं आतासारखे मोबाईल नवते.मंग काय करावं आम्हालं काही कळयनं.आम्ही हताश बसलो व्हतो.बिड्यायच बंडलं कव्हाचच संपलं व्हतं.येवढ्यातं कोंडु कफाल्यानं हातानं चुटकी वाजवली अन तटकन उठला.त्याच्या डोस्क्यातं काय चाललं आम्हालं समजयनं गेलतं.त्यानं नामदेव कढाण्यालं दहा पंधरा येळूच्या बल्लयायची मोळी आणायं लावली.लगबगीनं वाळु घालायं टाकलेले दोन्ही धोतरं गोळा केले.मलं तेह्यनं दोनक पोते कुटार भरून आनायलं सांगलं.म्या मनलं हे काय कफाला चालला आसल ब्वा या कफाल्याचा.तरी मी कोंडुदाचं ऐकुन दोन पोतडे भरून कुटार आणलं.कोंडु कफाल्यानं चरायलेला हाल्या पकडून आनला.येळूच्या बल्ल्या,कुटार आन दोनजार धांदी आसा ऐवज हाल्याच्या अंगावर चढवला.आन मंग कोडुदा मनाला की,“सदबा,अन नामा आत्ता पहा म्या शहरायतल्या लोकायलं कसं येड्यात काढतो ते…येर्‍ही शहरातल्या लोकायलं खेड्यातल्या जिनसायबद्दल अप्रुप आसते.ते खेडवळ मनुन आपल्याल कमी लेखतात नं,आज पहा कशी मजा घेतो ते.चला गड्यांनो पोळ्याचा बजारच करू आज…!” आसं मनुन ते शहराच्या दिशेनं निघाले.

दुपारचे बारा वाजले आस्तीलं.पोळ्याचा बजार जोमात भरला व्हता.बैलांचा शिंगारं,ताव,हिंगोळ,कावं,मातीचे बैलायचे दुकानावर झिंगाट गर्दी जमली व्हती.कोंडुदानं बजाराच्या कोपऱ्यातली जागा हेरली.बजारातल्याच एका पालावाल्याकुन कुसल्या आनल्या आन आम्हालं खड्डे करायलं जागा हेरून दिल्या.आम्ही केलेल्या खड्डयांत कोंडुदानं बल्ल्या रवल्या.मंग सगळ्या बल्ल्यायतं धांद गुफली.आन संग आनलेलं धोतर त्या बल्ल्यांच्या भवती गुंडाळून चौकुन पडदा बांधला.मंग हाल्या त्यान पडद्याच्या आतं नेवुन मंधात बांधला.संग आणलेल्या पोत्यातलं कुटारं त्या हाल्यापुढं टाकलं.आत्ता कोंडुकफाल्यानं जवळच्याच किराणा दुकानावुन दोन तीन खापटं आणले त्यानं त्याचा पोंगा बनवला अन नामा कढाण्यालं तिकीटाचे पैसे गोळा करायलं गेटच्या पुढं बसवलं.मह्या हातात एक खपटाचा पोंगा देला आन मलं तंबुपसुन जरा दुर गर्दित उभं केलं आन स्वतः जवळ एक खपटी पोंगा घेऊन तंबुच्या पुढं उभा राहिला.आत्ता आम्ही दोघायनं एका सुरात वड्डायलं सुरवात केली की,“चला ऽऽ चलाऽऽ नवा खेळ पाहायलं चला…कव्हा पाह्यला नसलं आसं पाहा…पक्त धा रप्यात……..चला…धा रूप्यात पाहा….. हाल्या भुसा खातोऽऽ…. हाल्या भुसा खातोऽऽ“. पाहाता पाहाता आमच्या दुकानापुढं चिक्कार गर्दी व्हवू लागली.हे काय नविनच मनुनं जे ते कुतुहलानं तिकीट काढुन पाहातं व्हतं.जशी जशी गर्दी वाढतं व्हती तस तस कोंडु कफाल्यालं चेव येत व्हता.त्यो आंजुकच जोरजोरात,“चला,हाल्या भुसा खातोऽऽ…..हाल्या भुसा खातोऽऽचला ऽऽ चलाऽऽ.”लोकं तंबुत जातं व्हते आन कुटार खायालेला हाल्यि पाहुन हासत वापस येत व्हते.हासतं यायलेले लोकं पाहुन बाहिरच्या लोकायलंबी नवल वाटायचं.ते बी नवलाईन पाह्यालं जायाचे.आस करता करता पाच वाजायलं आले व्हते.हाल्यानं आज तीन साडेतीन हाजार कमावले व्हते.

दिवस कलनील आलता.आता आम्ही आमचं बाडबिस्तारा गुंडाळला.पैश्याच्या वाटण्या केल्या.आमच्या जवळ पाहाटं बिडी घेयालंबी पैशे नवते आन आत्ता हजार बाराशे परत्येकाच्या खिशात जमले व्हते.आम्हालं कव्हा नाही ते कोंडुदाच्या कफाल्याचा अभिमान वाटला व्हता.मंग पोळ्याचा बजार करून हाल्याच्या पाठीवर वझं चढवुन गावाकडं निंघाले.खिशात आत्ता बिंडल व्हतं.तिघानबी एकेक बिडी पेटविली एकेक लांब झुरका वढला अनं जोरातं हसत हवेत सोडून दिला.धुपट हलकं हलकं व्हतं वर जातं व्हतं आमचं टेंशन कव्हाच दुर झालतं आम्ही पुढं पाह्यलं तं हाल्या गुमानं आमच्या संसाराच़ वझं वाहात व्हता……आजतरी ….!

©गोडाती बबनराव काळे,
हाताळा,जि.हिंगोली.

9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..