स्थळ=सोलापुर भागवत थिएटर ! चित्रपट= “खेल खेल में “! वेळ= संध्याकाळी सहा !
मित्र झळकीकरच्या बरोबर कॉलेजच्या पायवाटेवर ऋषीचा पाहिलेला पहिला पिक्चर ! (अंहं – बॉबी खूप नंतर पाहिला आणि जोकरही )
तेव्हापासून याला आम्ही पाहिलं अगदी शेवटच्या “मुल्क ” पर्यंत ! सुमारे ४०-५० चित्रपट या कलावंताचे मी आजवर पाहीले असतील आणि एकच केलं – आमच्या देव्हाऱ्यात दाटिवाटीत त्याला बसविले , शेजारच्या अमिताभ नामक कुलदैवताला धक्का न पोहोचविता !
संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं.
तो आवडावा असाच होता. बापाच्या /आज्याच्या आसपास न पोहोचू शकणारा, पण उरलेल्या दोघां भावंडांपेक्षा सुपीरिअर. माझ्या पिढीच्या समवयस्क असलेल्या या गृहस्थाचे ” कर्ज “, ” हम किसीसे कम नहीं ” कितीवेळा पाहीले असतील गणती नाही. त्याचा गोड /गुबगुबीत स्क्रीन प्रेझेन्स, हास्य , नृत्य , वादन सगळंच अफलातून ! फक्त ” सागर ” मध्ये कमल त्याच्यापेक्षा सुंदर नाचतो हे मानलं.
देव आनंद च्या चॉकलेटी घराण्याला याने पुढे नेलं आणि अमीर पर्यंत आणून सोडलं.
प्रेम करावं ते याच्या डोळ्यातून आणि आवाजातून !
समवयस्क डिम्पल बरोबर प्रवास सुरु केलेल्या ऋषीला पुढे पुढे पद्मिनी , पूनम ढिल्लन आणि दिव्या भारती बरोबर बघणे डोळ्यांना त्रासदायक होऊ लागले- कारण त्याचा बेढब अवतार रुचेना. पण पायात नृत्य तेच आणि “जोकर ” मधला निरागस भावही तोच !
त्याची सद्दी (नायक म्हणून) खऱ्या अर्थाने संपली – “दिवाना ” पासून ! जेंव्हा सेटवर शाहरुख साठी गर्दी होऊ लागली तेंव्हा कोपऱ्यातल्या ऋषीला बाडबिस्तरा आवरता घ्यावा लागला.
मग त्याने इतर दोन्ही भावांसारखा RK चा एक चित्रपट दिग्दर्शित केला ( प्रत्येक भावाने एकेक ) -आपल्या दुष्मनाला, “खन्नाला ” भूमिका दिली आणि झालं -गेलं विसरला.
मग टीव्ही वर दिसायचा , समाज माध्यमांवर काहीतरी controversy करायचा.
त्याला ऑल टाइम ग्रेट होण्यापासून अडवलं फक्त दोन गोष्टींनी – उंचीने आणि अमिताभने ! अन्यथा हा बापाच्या आसपास पोहोचला असता.
देव्हाऱ्यातून त्याला विसर्जित करताना त्याच्याच ओळी आठवताहेत –
” ए सनम , हम तो (सिर्फ- या ओळीतील एवढ्याच शब्दाला माझं OBJECTION आहे ) तुमसे प्यार करते हैं I ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply