पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृती जागवणारं ‘ययाती देवयानी’ या संगीत नाटकातील हे सुरांनो, चंद्र व्हा हे सुरेख पद..
हे गाणं लिहीलं आहे, मा.वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी. तर त्याला संगीत आणि आवाज लाभला आहे, स्वतः पं. जितेंद्र अभिषेकी यांचा. अभिषेकीबुवा हे गाणं गाताना इतके तन्मय होत की ते गाणं थेट मनाला भिडत असे. गाताना त्यांचं उजवं बोट आकाशाकडे जात असे. जणू काही ते सुरांना आज्ञाच देत असत. मुळातच ‘हे सुरांनो, चंद्र व्हा’ ही कल्पनाच सुचणं दिव्य आहे. अशी अलौकिक कल्पना फक्त कुसुमाग्रजांसारख्या महान कवींनाच सुचू शकते.
ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा अशा तिघांच्या प्राक्तनाची कहाणी म्हणजे हे नाटक आहे. यातील शर्मिष्ठा हे गाणं म्हणत असते.
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
शर्मिष्ठा खरंतर राजकन्या, पण एका दुर्दैवी घटनेमुळे ती देवयानीची दासी झालेली आहे. त्यावेळी ती ययातीसाठी हे गाणं म्हणत असते.
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥
ती म्हणते, हे सुरांनो, तुम्ही चंद्र होऊन माझ्या प्रियकराच्या आयुष्यात शीतल प्रकाश आणा. त्याच्यापर्यंत चांदण्याचे कोष पोहोचवा. त्याची वाट एकाकी आहे, अंधारमय आहे. तो हरवला आहे, त्याचं चित्त थाऱ्यावर नाही. हे सुरांनो, तुम्ही अमृताची बरसात त्याच्यावर करा. त्याला शांत करा. नवा मार्ग दाखवा. अशी विनवणी शर्मिष्ठा करत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply