|| हरी ॐ ||
कुठल्याही वस्तूला ताण सहन करण्याची काही मर्यादा असते आणि ती संपली ती वस्तू खराब होते किंवा बिघडते. तसे आता मुंबई शहराचे झाले आहे. अर्थात त्याला सर्वस्वी लोकसंख्याच जबाबदार आहे असे नाही तर अन्य बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जसे भरतातील प्रत्येक राज्याने स्वत:च्या राज्याचा विकास नोकरी किंवा व्यवसायाभिमुक न केल्याने बऱ्याच राज्यातील जनता मुंबईत कामधंद्याच्या निमित्ताने येत आहे हे साहजिकच आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जनतेच्या मुलभूत गरजा भागविताना पालिका/शासनाला तारेवरची कसरत करावी लागते त्यात घरांसाठी ‘टोलेजंगी’ विकासाशिवाय पर्याय नाही. त्यात अश्या बिल्डींग्सना आगी लागल्यास काही खरे नाही. कारण त्या विझविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि यंत्र-सामुग्रीची कमतरता आहे आणि त्याला काही आर्थिक, सामाजिक, आणि लालफितीची कारणे आणि इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत आहेत. असो.
मुंबई अग्निशमन दल हे महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिक्षेत्रात काम करणारे अग्निशामक दल आहे. याची स्थापना १ एप्रिल, इ.स. १८८७ रोजी झाली. हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. मुंबई अग्निशमन दल हे भारतातील सर्वांत मोठे अग्निशामक दल आहे. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.
देशात दररोज कुठेना कुठेतरी आग लागल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यास मिळते. आगीमुळे बर्याचदा वित्तहानी होते पण काही जवान आणि नागरिक आगीत भाजल्यामुळे दगावतात. आग लहान असो की मोठी ती विझविण्याची जबाबदारी अग्निशमन दलातील जवान सुरळीतरित्या पार पाडतात.
मुंबईच्या वाढत्या पसाऱ्याबरोबरच आगीच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यातच या आगी आटोक्यात आणताना जखमी होणाऱ्या अग्निशमन जवानांची संख्याही प्रचंड वाढली आहे. २००८ ते २०१० या काळात तब्बल ५९ जवान जखमी झाले आणि दोन जवानांचा मृत्यू झाला. मुंबईचा पसारा वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर अनेक संकटेही नव्याने उभी राहत आहेत. मुंबईत १९८६ पासून दरवर्षी सुमारे चार हजार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यात २००४ पासून आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे.
मुंबईत आग प्रतिबंधक यंत्रणेकडे आवश्यकतेने पाहिले जात नाही. अनेक ठिकाणी आगी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या असतात; मात्र जुन्या इमारती, चाळी, झोपडपट्टी यात आजही सक्षम यंत्रणा नाही. तसेच दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती आणि झोपडपट्टीमुळे आग वेगाने पसरते, अशी माहिती अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी देतात.
नुकतीच मुंबईतील अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्क बिल्डिंग शुक्रवारी आगीच्या भक्षस्थानी सापडली. ही आग सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. पण ही आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचा जवान शहीद झाला. अपुरी सुरक्षेची साधनं असल्यामुळे त्याचा मृत्यू ओढावला असा आरोप त्याचे कुटुंबीय करतात. ज्या इमारतीत आग लागली होती त्या इमारतीमध्येही फायर सेफ्टी नसल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी कोण दोषी आहे, कोणाच्या चुकीमुळे हे घडले याची पडताळणी करावीच लागेल पण मुख्य अडचण अशी आहे की असे प्रकार पुन्हा होणार नाहीत यासाठी काय दक्षता घेतली जाते हा यक्ष प्रश्न आहे. यातून पालिका/शासन आणि संबंधीत खाती काही आत्मपरीक्षण करणार आहेत का?
लोटस पार्कची आग विझविताना जवानांना संरक्षक सूट आणि मास्क न दिल्याने परवड झाली. तोच प्रकार शनिवारी पार्ले येथे लागलेल्या आगीच्या प्रसंगीही घडला. अग्निशमन दलातील जवानांची संख्या आगीच्या दुर्घटना बघता खूपच कमी आहे. पुरेसे तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, गाड्या, आणि आर्थिक सहाय्य मिळणे गरजेचे आहे. तसेच वेळोवेळी यंत्रसामुग्रीची देखभाल, दुरुस्ती आणि नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करणे जरुरीचे आहे. सध्या देशात बांधल्या जाणाऱ्या इमारतींना बाहेरून काचा लावण्याची एक टूम आली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला आग किंवा काही अप्पती अश्या मोठया आणि उंच इमारतीत घडल्यास ती निवारण करताना खूप कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागते. एक तर एवढ्या मोठया शिड्या आपल्याकडे नाहीत. पालिका आणि शासनाने इमारती बांधण्यासाठीचा परवाना देताना त्यामधील सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या अटीं-शर्तींची योग्य अमलबजावणी झाली आहे का नाही याची कुठेही भ्रष्टाचार न होता काटेकोर तपासणी करणे गरजेचे आहे. मुख्यम्हणजे आपल्या मुंबईत शहरात टोलेजंगी इमारती बांधणे गरजेचे आहे का? एक तर आपली मुंबई सात बेटांचे शहर आहे आणि बराचसा भाग समुद्र हटवून निर्माण केला गेला आहे त्यात तो भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने काही अप्पती घडलीच, घडू नये हीच परमेश्वराकडे प्रार्थना ! पण तरीही आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? या प्रश्नाचे उत्तर ना पालिका/शासन आणि संबंधीत खात्याकडे आहे.
वरील सर्व घटनांचे क्रम लक्षात घेता केंद्र, राज्यशासन, सर्व नगरपालिका आणि संबंधित खाती या सर्वांचे आत्मपरीक्षण करून त्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयास करताना दिसतील अशी अपेक्षा आहे त्यात जनतेचा सहभाग नक्कीच जास्त असेल तो अश्या आगीच्या घटना न होऊ देण्याचा. आलेल्या प्रसंगाचा न डगमगता धैर्याने सामना करण्याची आणि मुख्य म्हणजे कुठल्याही अफवेला बळी न पडण्याची. एकमेकांना आधार देण्याची आणि महत्वाचे म्हणजे आग जेथे लागली असेल त्या इमारतीपासून जास्त जास्त लांब जाण्याची आणि बघे म्हणून न दिसण्याची काळजी प्रत्यके मुंबईकराने घेतल्यास अग्निशमन दलाला त्यांचे काम करणे जास्त सोपे जाईल. कारण आपण स्वत: वाचलो तरच दुसऱ्याचे प्राण वाचवू शकू. तूर्तास एवढे केले तरी भविष्यातील बऱ्याच गुंतागुंती सुटू शकतील.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply