आपल्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींशी आपली नाळ जोडलेली असते पण त्याबद्दल कृतज्ञता अभावानेच व्यक्त केली जाते. त्या गोष्टी आपण सहजपणे गृहीत धरतो. काय करायचंय आणि कोणत्या स्थळांना भेटी द्यायच्या आहेत याची “बकेट लिस्ट” आपल्या मनात अहोरात्र सुरु असते. पण आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती, स्मृती, स्थळे, अनुभव यांचीही एक यादी तयार करावी ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. एखाद्या आनंदाच्या क्षणी कृतज्ञ असणे, तात्कालिक असते. रोजच्या दैनंदिन जीवनात ती भावना बाळगणे आणि व्यक्त करणे काहीसे आव्हानात्मक असू शकते. तरीही त्या दिशेने प्रयत्न करून बघायला हवा कारण त्यामुळे जीवनाची दिशाच बदलून जाते, आपल्या जगण्याच्या आणि सेवाभावी वृत्तीच्या व्याख्या सुधारतात.
हेतुपुरस्सर कृतज्ञता व्यक्त करणे सोप्पे असते. दिवसातून काही वेळा क्षणिक विसावा घ्यावा, मनात आणि मनाबाहेर काय अनुभव येताहेत आजमावून बघावे आणि नक्की कशाबद्दल कृतज्ञ आहोत याचा मागोवा घ्यावा. रोज याचा सराव केला तर त्यामधून काही फायदे अनुभवाला यायला सुरुवात होते-
१) नातेबंध घट्ट होतात.(जवळच्या जिवलगांना सांगा- त्यांनी आपल्यासाठी काही विशेष केले नाही तरी त्यांचे “असणे” आपल्यासाठी महत्वाचे असते.)
२) रोज भेटणाऱ्या (परिचित/अपरिचित) व्यक्तींचे मनःपूर्वक स्वागत करणे आपल्यालाच सुखावून जाते. (डेल कार्नेजी म्हणतो- “रोज काही मैत्रीच्या बिया वाटेवर, अगदी अनवधानानेही टाकल्या तरी त्यांचे भविष्यात वटवृक्ष होण्याची शक्यता अधिक.”)
३) एकुणातच आपण अधिक सजग नजरेने भवतालाकडे पाहू लागतो.(रोजनिशी लिहिली तर आपोआप मनानुभूती वाढू लागते.)
४) समानुभूती (empathy) अधिक कळायला लागते आणि प्रत्ययाला येते. ( “स्व” आधी ही भावना हळूहळू लोप पावते.)
५) आपले अग्रक्रम ठरविणारा आरसा सन्निध येतो.(आपली नीतिमूल्ये ठळक दिसायला लागतात.)
आज नोव्हेंबर २४ ! ” आभार प्रदर्शन ” दिवस ! यानिमित्ताने त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन कृतज्ञतेचा अनुशेष (बॅकलॉग) भरून काढू यात !
सर्वांचे आभार आणि जाहीर कृतज्ञता !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply