भारत लवकरच स्वतंत्र होईल आणि भारताला जागतिक व आर्थिक घडामोडीत निश्चित महत्वाचे स्थान मिळेल, असा दृढविश्वास असलेले उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांनी डिसेंबर १९४० मध्ये त्यावेळच्या म्हैसूर संस्थानच्या सहाय्याने हिंदुस्तान एअरक्राफ्ट ही कंपनी बंगलोर येथे स्थापन केली.
२३ डिसेंबर, १९४० रोजी नोंदणी झालेली ही संस्था केवळ चार कोटी रुपयांच्या भांडवलावर सुरू झाली. १९४२ मध्ये यात केंद्र सरकार भागधारक झाले. आणि १९४५ मध्ये केंद्र सरकारने कंपनीचे व्यवस्थापनही ताब्यात घेतले. १ ऑक्टोबर, १९६४ पासून कंपनीचे नाव हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि. (एच.ए.एल.) असे झाले. त्यात एअरोनॉटिक्स इंडिया लि. आणि एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपो, कानपूर या कंपन्याही विलिन झाल्या.
दुसऱ्या महायुद्धात हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनी ही प्रामुख्याने विमानांची दुरुस्ती आणि देखभाल करणारी कंपनी होती. विमानाची पूर्ण दुरूस्ती करणारी ही कंपनी इंग्लंड, अमेरिका, रशिया इ. देशांच्या अलाइड फोर्सेसच्या साऊथ इस्ट एशिया कमांडची मुख्य आधारस्तंभ होती. त्या अगोदर कंपनीने अमेरिकेच्या काँटिनेंटल एअरक्राफ्ट कंपनीच्या मदतीने हार्लो ही शिकवायची विमाने तयार केली. त्यानंतर कर्टिस हॉक ही लढाऊ विमाने व वल्टी हे बॉम्बफेकी विमान तयार केले.
महायुद्धानंतर डॉ. व्ही. एम. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली दहाजणांसाठी ग्लायडर तयार केले. ही पहिली भारतीय निर्मिती होय.
एच.ए.एल.ची एकूण १९ उत्पादन केंद्रे आणि नऊ संशोधन आणि विकास केंद्रे आहेत. आतापर्यंत भारतीय बनावटीची १२ आणि परदेशी परवान्याची १४ प्रकारची विमाने एच.ए.एल.ने तयार केली आहेत. एच.ए.एल.ने एकूण ३५५०८ विमाने आणि ३६०० इंजिने तयार केली तर ८१५० विमाने आणि २७,३०० इंजिने उघडून दुरुस्त केली.
१९६६ मध्ये एचएफ-२४ या फायटर विमानांचे उत्पादन एच.ए.एल.ने बंद केले. त्यानंतर ध्रुव हे अॅडव्हान्स लँडिंग हेलिकॉफ्टर बनवले तर तेजस हे लाईट कॉम्बॅट एअर क्राफ्ट आणि इंटरमिजिएट जेट ट्रेनर बनवायच्या प्रयत्नात आहेत. एच.ए.एल.ने बोईंग ७७७ . बनवण्यासाठी करार केला आहे.
– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply