असं म्हणतात, पैसा पैशाकडेच जातो.. तसाच हिरा हिऱ्याकडेच जातो, असेही म्हटले तर?धोनीने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यावर या क्षणाची वाट पाहत १३ वर्षे गेली. वनडे वर्ल्डकप आपण सचिनसाठी जिंकत आहोत, ही भावना तेव्हा जवळपास प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. आज T20 वर्ल्डकप जिंकतानाही भारतीय टीमला असेच काहीसे जाणवले असेल. ८ महिन्यांपूर्वीही ती संधी आली होती. पण… असो.
ती जखम एवढी खोलवर झाली होती की, यावेळी त्यावर कायमचा इलाज करणे गरजेचे होते. पण हे वाटते तेवढे सोपे नक्कीच नव्हते. नुकतीच आयपीएल संपली होती आणि भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. केवळ बुमराह सोडला, तर बाकी बॉलिंगचे वांधेच होते. त्यात शमी जायबंदी.. सिराज आणि अर्शदीप यांना सांभाळत वर्ल्डकपमध्ये सुपर ८ मध्ये भारताने प्रवेश केला.
आणि सुरु झाली कठीण परीक्षा. अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध दिमाखात विजय मिळवले, तरी खरी टशन तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच होती. वर्ल्डकप ट्रॉफी वर पाय ठेवणाऱ्या, पिन ड्रॉप सायलेन्सचा कटू अनुभव देणाऱ्या पॅट कमिन्स आणि मिचेल मार्शच्या ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे असेल, तर आपली कामगिरी दुप्पट, तिप्पट उंचावणे गरजेचे होते. रोहितने त्या दिवशी जो खेळ केला, त्याला तोड नाही. ‘त्या’ पराभवाचे उट्टे काढायचेच, या इराद्यानेच त्याने आक्रमक बाणा अवलंबला होता. स्टार्कची केलेली अविस्मरणीय धुलाई तर तो आयुष्यात विसरणार नाही. भारताने सामना जिंकला, आणि नंतर अफगाण संघ सेमीत पोहोचल्याने त्या पराभवाची सव्याज परतफेडही झाली. सेमीत इंग्लंडविरुद्ध त्याची खेळी आणि अक्सरचा खुबीने केलेला वापर आपल्याला फायनलपर्यंत घेऊन गेला.
संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेला विराट, शिवम दुबे यांना संघात कायम ठेवत रोहितने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्याचा मैदानावरील वावर, स्टंप माईक मधील ऐकू येणारे संवाद आश्वासक होते. संघ जिंकतोय, म्हणून खेळाडू हवेत जाणार नाहीत, याचीही खबरदारी त्याने घेतली. अशा वेळी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला एक डाव पुरेसा असतो. सेमी फायनल जिंकल्यावर भावूक झालेला रोहित त्याची वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा किती तीव्र आहे, याची संपूर्ण टीमला जाणीव करुन देत होता.
मैदानात कधीकधी ऐनवेळी नवे डावपेच खेळावे लागतात. धोनी स्टंपमागून सामना फिरवायचा.. तर रोहितकडे ३० यार्ड सर्कलमध्ये खंबीर उभा राहून सामना फिरवण्याची खासियत होती. सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी कोणाचा वापर कधी आणि कसा करावा, हे गेल्या काही वर्षांत रोहितला बरोबर जमले. कालही अक्सर पटेलला दुबेच्या आधी पाठवून त्याने पहिला डावपेच खेळला. दुसरा डावपेच डिकॉकसाठी अर्शदिपला योग्य वेळी आणत त्याची विकेट काढली. फायनलचे दडपण कोणाला नसते? काल त्याच्याही चेहऱ्यावर ते जाणवत होतेच. पण हार्दिकने क्लासनची विकेट घेतली आणि मॅच फिरली. त्यानंतर त्याने बुमराह आणि अर्शदीप यांना १८ वी, १९ वी ओव्हर देऊन दडपण वाढवले. त्याचा हा डावपेच निर्णायक ठरला. मिलर हार्दिकला फटका मारणार, हे अपेक्षित होतेच. त्याने तसे केलेही पण सूर्याचा तो कॅच… अहाहा !!! वर्ल्डकप मधील (कदाचित) हा सर्वोत्तम कॅच वर्ल्डकप मधील शेवटच्या सामन्यात, शेवटच्या ओव्हरला सूर्याने घेतला आणि आपल्याला आकाश ठेंगणे झाले. भारताने वर्ल्डकप जिंकला…
जाताजाता विराट आणि रोहित यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांचे योगदान कोण विसरेल? त्यांचे पर्व संपले असले तरी त्यांनी युवा खेळाडूंना योग्य दिशा दाखवून त्यांचे मार्गदर्शक व्हावे ही मनोमन इच्छा !! राहुल द्रविडचे एक खेळाडू म्हणून वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी एक कोच म्हणून होणारी सांगता विश्वकप जिंकून व्हावी, याहून मोठा आनंद कोणता?
नुसत्या आयपीएल ट्रॉफी (की टॉफी) जिंकून काय फायदा? खरी ऐट वर्ल्डकप जिंकण्यात आहे, यावरुन रोहितची अनेकदा खिल्ली उडवली गेली. आता त्याच्याही शिरपेचात वर्ल्डकप ट्रॉफी आली बरं !! विराटच्याही नशिबात अंडर १९ वर्ल्डकप ट्रॉफी होती. आयपीएल किंवा अन्य सिरीज ट्रॉफी (काहींच्या मते अजूनही टॉफी) म्हणजे चांदी, आशिया कप सोन्याचा तर वर्ल्डकप हिरा मानला, तर या हिऱ्याची चमक आता कधीच कमी होणार नाही. शेवटी हा हिरा हिऱ्यांकडेच विसावला आहे.. हिरा है सदा के लिये…
– आनंद मालशे
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply