नवीन लेखन...

कोकणातील बागायती फळ शेती

आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो. सद्यस्थिती  पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003 साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बी वर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बी वर प्रक्रिया करत आहेत.

दक्षिण कोकण भाग म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे या जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता जांभा खडक असलेली लॅटॅराईट सॉईल, उष्ण दमट हवामान ही प्रामुख्याने येतील नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. फलोद्यान पिकाला हे वैशिष्ट्य खूपच उपयुक्त आहे. त्यामुळे या भागातील आंबा, काजू ,कोकम, फणस, जांभूळ, नारळ, सुपारी या फळांना विशिष्ट स्वरूपाची गुणवत्ता प्राप्त झालेली आहे.  अलीकडे चिकू, पपया, केळी या पिकांच्या लागवडीकडे सुद्धा येथील शेतकरी लक्ष द्यायला लागला आहे. या गुणवत्तेमुळे येथील फलोद्यान देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. या वैशिष्ट्यांच्या संदर्भात येथील शेतकरी वर्गाने योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर दक्षिण कोकणात वर्तमान आणि भविष्य काळातही चिरस्थाई  रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

फलोद्यान लागवड व उत्पादन :- फळ पिकांच्या लागवडीच्या बाबतीत दोन्ही जिल्ह्यात मिळून आंबा पिकाखाली 2,45,561 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.  1,53,280 हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड आहे. 13,671  हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड आहे.  याचबरोबर जांभूळ, कोकम, फणस, सुपारी, आवळा याही फळ पिकांच्या लागवडीकडे येथील नागरीक वळू लागला आहे.  विशेषत: या पिकांच्या लागवडीबाबत काही प्रगतशील शेतकरी बांधवांनी प्रयोग सुरू करून उत्पादन व दर्जा याबाबत कृषी विद्यापीठाप्रमाणेच स्वतःही अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 44,315 मेट्रिक टन इतके आंबा उत्पादन होते. जिल्ह्यात हापूसची प्रतिहेक्टरी उत्पादकता 3.4 मॅट्रिक टन इतकी आहे, तर केसर आंब्याची दर हेक्टर उत्पादकता पाच ते सहा मॅट्रिक टन इतकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दरवर्षी 60,000 मेट्रिक टन आंबा मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत घाऊक व्यापारांकडे विक्रीला जातो.  एकूण उत्पादनापैकी 20 ते 30 टक्के आंबा कॅनिंग उद्योगात प्रक्रियेसाठी जातो. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात किमान 60 ते 75 हजार मेट्रिक टन इतका काजू बी तयार होतो.  या उत्पादनापैकी फक्त 30 ते 40 टक्के काजू बी वर या जिल्ह्यांत प्रक्रिया होते. नारळ, फणस, सुपारी, कोकम या पिकांचे हंगामी उत्पादन मिळते. अलीकडे आवळा पिकाची सुद्धा व्यावसायिक लागवड व्हायला लागली आहे.

फळ प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी :- रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या फळ पिकावर स्थानिक ठिकाणी प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहिल्यास येथील श्रमशक्तीला कायमस्वरूपाचा रोजगार मिळण्यास मदत होईल. सद्यस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात 125, रत्नागिरी जिल्ह्यात 75 च्या आसपास फळ प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटे-मोठे मिळून 400  काजू प्रक्रिया उद्योग सुरू झालेले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात 325 पेक्षा अधिक छोटे व मध्यम स्वरूपाचे काजू प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. फळ प्रक्रिया उद्योगात आंबा फळाबरोबरच कोकम, जांभूळ, आवळा, फणस या फळ पिकावर प्रक्रिया करून त्यापासून प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. येथील नागरिकांनी मनावर घेतले तर या दोन्ही जिल्ह्यात अजूनही उद्योग सुरू होऊ शकतात.

फळ  प्रक्रिया  उद्योगाकरिता  मूलभूत  सोयींची गरज :- मुळात दोन्ही जिल्ह्यात होणारी फळ पिके ही हंगामात तयार होतात. ती वर्षभर टिकून ठेवण्यासाठीची व्यवस्था होणे गरजेचे आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या दोन्ही जिल्ह्यात एकही कोल्ड स्टोरेज किंवा रायपनिंग चेंबर नाही. याबाबत कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. जर या फॅसिलिटी उपलब्ध झाल्या तर येथील उद्योजकाला वर्षभर आपला उद्योग सुरू ठेवता येणे शक्य होईल. त्यांना वर्षभर कच्च्या मालाची उपलब्धता होण्यास यामुळे चांगली सोय होऊ शकेल. शेतकरी वर्गालाही त्याच्या कच्च्या मालाचा योग्य भाव मिळू शकेल. तसेच दोन्ही जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रक्रिया माल टेस्टिंग करण्यासाठीची लॅबोरेटरी उपलब्ध होणे गरजेचे आहे, की ज्या लॅबोरेटरीमध्ये सर्व प्रकारच्या अध्ययावत अशा स्वरूपाच्या प्रक्रिया मालाच्या टेस्टिंगच्या सोयी उपलब्ध असतील. अलीकडे काही प्रगतशील शेतकरी उद्योजकांनी केंद्र सरकारची फळ प्रक्रिया उद्योगाची समूह विकासाची योजना घेऊन छोटी छोटी कोल्ड स्टोरेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांचा अनुभव सकारात्मक आहे

फळ प्रक्रिया उद्योगातील संधीचा योग्य प्रकारे लाभ घेतला जात नाही :- दोन्ही जिल्ह्यात शासन पातळीवर फळ प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी काही मूलभूत प्रयत्न केले जात आहेत. त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे जागतिकीकरणातील बाजारपेठेच्या स्पर्धेला सामोरे  जाण्यासाठी  फळ  पिकांचे  भौगोलिक  मानांकन (ॠशेसीरहिळलरश्र खपवळलरींळेप – ॠख) करून घेणे महत्त्वाचे आहे.  आपल्या दोन्ही जिल्ह्यासाठी आंबा व कोकम या पिकांचे भौगोलिक नामांकन प्राप्त झालेले आहे.  तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काजू पिकाचे ‘वेंगुर्ला काजू’ म्हणून नामांकन मिळाले आहे.

भौगोलिक नामांकन म्हणजे त्या विशिष्ट भागातील असणारे हवामान, जमीन व इतर नैसर्गिक परिस्थितीमुळे त्या त्या भागात तयार होणाऱ्या पिकाचे खास वैशिष्ट्य असते की जे इतर कोणत्याही  भागात नसते.  भौगोलिक मानांकन टॅग घेतलेला शेतकरी उद्योजक, प्रक्रिया धारक यांना आपला उत्पादित माल डायरेक्ट निर्यात करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.शिवाय शेतमालाची  किंमतही वाढते.  परंतु ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी प्रमाणपत्र धारक शेतकरी, उद्योजक,विक्रेते किती असावेत याची मर्यादा असते.

दुर्दैवाची बाब म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20000  पेक्षा जास्त आंबा उत्पादक आहेत, पण सभासद मात्र 290 इतकेच झालेले आहेत.  काजू पिकाच्या बाबतीतसुद्धा हीच स्थिती आहे. काजू पिकासाठी भौगोलिक नामांकन घेऊन चार वर्षे होऊन जाऊन सुद्धा अद्याप 125 शेतकरी,उद्योजक व विक्रेत्यांनी काजू पिकासाठीचे भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र घेतले आहे. कोकम पिकासाठी केवळ 30  शेतकऱ्यांनी भौगोलिक मानांकन घेतले. अशा स्वरूपाची आपल्या लोकांची मानसिकता आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पणन महामंडळाने भौगोलिक मानांकन प्राप्त शेतकऱ्यांच्या व उद्योजकांच्या प्रक्रिया मालाला हमखास बाजारपेठ संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. परंतु शेतकऱ्यांचा व  उत्पादकांचा प्रतिसाद पुरेसा मिळताना दिसून येत नाही.

शेतकरी उद्योजकांची मानसिकता बदलणे हे मोठे आव्हान :- आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो.

आम्ही कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन प्रस्थापित गोपुरी आश्रम, वागदे तालुका कणकवली च्या माध्यामातून, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि नाबार्ड, पुणे यांच्या सहकार्याने 2003  साली काजू प्रक्रियेच्या ‘समूह विकासाचा’ प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही सलग 20 वर्ष नव उद्योजकांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यांची मानसिकता तयार करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला. त्यांच्या समोर आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. त्याचा सकारात्मक परिणाम साधारण दहा वर्षानंतर अनुभवायला मिळाला.

सद्यस्थिती  पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003  साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बीवर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बीवर प्रक्रिया करत आहेत. गोपुरी आश्रम, नाबार्ड, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, सिंधुदुर्ग या आम्ही तीनही संस्थानी याकरिता सहनशीलता बाळगण्यासाठीचे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केलां त्याचे हे  फळ आहे असे मला प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.  जे काजू प्रक्रिया उद्योजक दिवसा दोन ते तीन टन काजू बीवर प्रक्रिया करतात त्यांच्या उद्योगात 70 ते 80  महिला व दहा ते पंधरा पुरुषांना सलग दहा महिने रोजगार प्राप्त होतो. फलोद्यान प्रक्रिया उद्योगात किती रोजगार क्षमता याची कल्पना येईल.

नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची : – मला सातत्याने गोष्ट जाणवते ती म्हणजेच कोकणातल्या नेतृत्वाला फळ प्रक्रिया उद्योगाबाबत सजगता असलेली दिसत नाही. विशेषत: केंद्र सरकारच्या फळ प्रक्रिया उद्योजकांकरिता आर्थिक पाठबळाच्या असंख्य योजना आहेत. यावर कोणीही अभ्यास करताना किंवा कृती करताना दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने शेतमाल प्रक्रियेच्या माध्यमातून त्या भागाच्या विकासाचा कायापालट केला.

परंतु कोकणचे नेतृत्व याकरिता प्रयत्न करताना दिसत नाही. ते होणे गरजेचे आहे. विशेषतः सहकाराच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात आंबा, काजू या पिकावर प्रक्रिया करण्याचे उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे, असे झाले तरच येथील भविष्यकालीन तरुण पिढीला शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध होईल. याचे भान येथील नागरिकांनी आणि विशेषत: सगळ्याच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. एवढेच या निमित्ताने मला सांगावयाचे आहे. एक मात्र महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दक्षिण कोकणात फळ पिकांच्या माध्यमातून रोजगाराची प्रचंड संधी उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी अभ्यास नियोजन आणि व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता सर्व नागरिक आणि नेतृत्वाचा पुढाकार असणे गरजेचे आहे.

-डॉ. राजेंद्र मुंबरकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..