एक
प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे.
आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते.
दोन
हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार गुट्ट. बाईंच्या मनात विचार आला 15 मिनिटात 25 माणसांना गरमगरम चहा पाजून कपबश्या विसळून जाग्यावर ठेवल्या असत्या.
तीन
घरी एकेकाला ब्रेकफास्टला बोलावून जीव थकून जायचा. एकाला एक आवडत तर एकाला एक. इतके करून काही उरले तर आपण खायचं, नाहीतर चहावरच भागवायचे. सगळ्यांचे झाले की एकटीने आवारायचे. हॉटेलात मात्र आजी तू निवांत बस एका जागी आम्ही तुला आणून देतो जाग्यावर. घरी कुणाचीच मदत नाही आणि इथे! सगळे मदतीला पुढे. स्थान महात्म्य दुसरे काय?
चार
गाडी हॉटेलच्या पोर्चमध्ये थांबली. दरवानाने अदबीने दार उघडले लवून नमस्कार केला. सगळे त्याकडे दुर्लक्ष करून सफाईने आत शिरले. तिने मात्र उलटा नमस्कार करून प्रतिसाद दिला. सुनेचे लक्ष गेलेच. तिच्या चेहर्यावर एक त्रासिक लकेर उमटली. कुणीतरी आपले स्वागत करतंय हेच तिला नवीन होते.
पाच
इतक्या गोष्टी प्लेटमध्ये होत्या. काटा चमच्याने घेताना गोंधळ उडाला. एक चमचा जमिनीवर पडला. शांत अशा रेस्टॉरंटमध्ये मोठ्ठा आवाज झाला. चमचा उचलण्यास लागली. नातू ओरडला आजी राहू देत कुणीतरी उचलेल. तू दुसरा चमचा घे. तिच्या मनात क्षणभर आले. घरी खरकटे सांडले की तिला अजिबात खपत नसे. लगेच रागवून पुसून घेई. इथे मात्र अगदी कावरीबावरी झाली. चार लोकांत असे व्हायला नको होते.
सहा
बाथरूममध्ये बादली नव्हती. गरम पाणी कसे येते हे कळेना. शेवटी नातीला बोलावली तिने आजीची चेष्टा करत पाणी सुरू करून दिले. अंग धुवायची सवय असलेल्या तिला शॉवर घेणे जमेना. ही मुले जन्मतःच शहाणपण घेऊन येतात की कोण जाणे.
श्रीकांत कुलकर्णी
9850035037
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक श्रीकांत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply