बरेचदा रहिवाशांच्या सोयीसाठी घरातील खोल्यांची, भितींची रचना बदलावी लागते. रहिवासी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात. तसेच अंतर्गत सजावट ही रहिवाशांच्या आवडीनिवडीचे प्रतीक असते. मग हे सगळे करताना पुष्कळदा एखादा खांब अगदीच मध्ये येतो. सगळा देखावाच बिघडतो किंवा एखादा खांब काढल्याने खोलीचा एकूण आकार मोठा वाटू लागतो. एखादी तुळई फार मोठी वाटते, आणि त्यामुळे छताच्या सुशोभीकरणात अडथळा येतो. कारणे अनेक. मग कशाला हवेत ते जागा अडवणारे अवजड खांब अन् त्या मोठमोठ्या तुळया असे म्हणत रहिवासी अगदी बिनदिक्कतपणे ते तोडताना दिसतात. पण असे करणे फार चुकीचे आहे.
इमारत बांधताना तुळया आणि खांबांचा एक सांगाडा आधी तयार करतात. त्या सांगाड्याच्या भक्कम आधारावरच इमारत उभी असते. त्यातला एखादा जरी खांब तुटला तरी इमारत कोसळू शकते. जसे आपल्या शरीरातील हाडांचे आहे. एक जरी हाड मोडले तरी शरीराचे दैनंदिन व्यवहार कठीण होऊन बसतात आणि ते हाड सांधले गेले तरी दुखावा राहतोच. इमारतीच्या बाबतीतही हे असेच आहे.
मग कधी कधी ते संपूर्ण न तोडता अर्धे तोडतात, त्यांचा आकार कमी करण्यासाठी. हे पण बरोबर नाही. खांबांचा आणि तुळयांचा आकार, त्या इमारतीवरील वजनाच्या प्रमाणात ठरवला जातो. मग जर आकार कमी केला तर त्या इमारतीची वजन पेलण्याची क्षमताच नाही का कमी होणार? तसेच खुपदा त्या खांबांना किंवा तुळयांना भोकं पाडून खिळे ठोकले जातात, किंवा त्यातून पाण्याचे, विजेचे पाईप नेले जातातकिंवा तत्समच काही इजा केली जाते.
बरेचदा अंतर्गत पुनर्रचना करताना बाल्कनीत स्वयंपाकघर करतात, किंवा तिथे स्वच्छतागृह बनवतात, कधी कधी पाण्याची टाकी ठेवतात. या सर्व गोष्टी धोकादायक ठरू शकतात म्हणूनच असे करताना स्ट्रक्चरल अभियंत्याचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, कारण याने इमारतीवरील संभाव्य वजनाचे वाटप बिघडून इमारतीच्या आयुष्याला धोका पोहचू शकतो.
Leave a Reply