आज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन हे केलंच पाहिजे पण मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य, त्याचं नियंत्रण कसे करायचे? हा प्रश्न बहुतांश जणांना भेडसावतोय, तर मानसिक स्वास्थ्य कसं सुधारावं याविषयी काही टिप्स.
सध्या बरेच लोक आपल्या फिटनेसवर भर देताना आढळून येतात विशेष म्हणजे आजची तरुण पिढी ह्यात आघाडीवर आहे, एकंदरच अनेकजण शारीरिक स्वास्थ्याबद्दल अधिक जागरूक झालेत. पण मानसिक स्वास्थ्याचं काय? हा प्रश्न अनेकांना सध्या भेडसावतच आहे. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धातत्मक युगात आपापल्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण झटत आहे पण त्याबरोबरच वाढत्या ताण-तणावामुळे नैराशासारख्या मानसिक आजाराला अनेकजण बळी पडत आहेत. दिवसागणिक शारीरिक आरोग्य सुधारण्यावर भर देताना मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. उत्तम शिक्षण, करिअर आणि दर्जेदार जीवनशैली बरोबरच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.
मानसिक आरोग्य कसं सुधारावं याची माहिती आपण आज जाणून घेऊया.
‘मला ते जमणार नाही’ किंवा ‘मला हे काम येतच नाही’ असे जर विचार तुम्ही मनात आणले तर तुमच्यात पराभवाची भावना अधिक दृढ होईल म्हणून असे विचार करून स्वतःच्या मनाचं असं खच्चीकरण कधीच करु नका. स्वतःच्या प्रबळ बाजू शोधून काढा आणि आत्मपरीक्षण करा कारण हे नेहमीच लक्षात ठेवा की आतापर्यंत तुम्ही स्वबळावर जे काही मिळवलं आहे ते तुमच्यामध्ये असलेल्या काही खास गुणांमुळे किंवा कौशल्यांमुळेच. आपल्या आजूबाजूला असलेल्या काही मंडळींना आपले विचार, आपली काम करण्याची पद्धत काहीवेळा आवडत नाही. म्हणूनच अशा लोकांची मर्जी राखणं किंवा त्यांना काय आवडतं हे पाहण्यापेक्षा तुम्ही स्वमूल्य जपत, आपल्या मनाला पटेल त्या पद्धतीने काम करावं.
प्रत्येक काम परफेक्टच व्हावे अशी नेहमीच स्वत:कडून अपेक्षा ठेवू नका कारण स्वत:वरच स्वत:च्या अपेक्षांचं ओझं लादणं हे अयोग्य असून तुमच्या मनाला थोडं स्वातंत्र्य देऊन तुमच्या स्वत:च्या अशा शैलीत यशाच्या दिशेने कूच करा.
कुठल्याही अडचणी फार क्षणिक असतात आणि त्यावर तुम्ही नक्कीच मात कराल असा आत्मविश्वास स्वत:च्या मनाला द्या आणि कुठलीही अडचण ही तुम्हाला नेहमीच काहीतरी शिकवून जाते ह्यावर ठाम विश्वास असू द्या.
बरेच जण हे आपला बराचसा वेळ हा इतरांना दोष देण्यात वाया घालवतात पण इथे एक गोष्ट लक्षत घ्या की दुसऱ्याला दोष दिल्याने तुमच्या परिस्थितीत काही बदल होणार नाही तर उलट त्याचा त्रास तुम्हालाच होईल म्हणून स्वत:च्या वागणुकीत सकारात्मक बदल करा.
Leave a Reply