आजच्या जमान्यात कमर्शिअल आणि समांतर सिनेमे असे सरळ सरळ दोन भाग सिनेपत्रकार पाडतात. पूर्वी असे नव्हते.एक तर चांगला सिनेमा किंवा वाईट असे दोनच प्रकार असत. तरीही कमर्शियल व समांतर सिनेमाचा समन्वय साधला तो बिमल रॉय व त्यांचा चेला ऋषिकेश मुखर्जी यांनी.
ऋषिकेश मुखर्जी बिमलदाकडे सहायक व एडिटर म्हणून रुजू झाले ते दो बिघा जमीन चित्रपटासाठी.ते बारकाईने बिमलदांचे काम बघत होते. एके दिवशी त्यांनी दिलीपकुमारला विचारले “ माझ्या चित्रपटात काम करशील ?” दिलीपकुमारने विचारले कथा काय आहे? ते म्हणाले तुला कथा ऐकायची असेल तर माझ्या घरी यावे लागेल.ते पेईंग गेस्ट म्हणून रहात होते, त्या खोलीत भिंतीवर आधीच्या पेइंग गेस्टनी आपली नावे लिहिली होती.हृषिदा दिलीपला म्हणाले “हीच माझी कथा .एका घरात जी लोकं भाडेकरू म्हणून येतात व निघून जातात त्यांना ते घर काय देते “ आणि त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट “मुसाफिर” त्यात त्यांनी पहिल्यांदा केष्टो मुखर्जीला हिंदीत पेश केले. चालता चालता अचानक अंगाला झटका देऊन पोलिओ झाल्याचा अभिनय केलाय लाजवाब.
त्यांनी विनोदी व गंभीर दोन्ही चित्रपट सारख्याच ताकतीने बनवले.चित्रपटातील पात्रे मध्यम वर्गीय केली त्यामुळे ती सामान्यांना भावली. त्यांनी “ हृषिदा टच” शैली तयार केली.अनुराधा चित्रपटात नायिका गाणे सोडून डॉक्टर बलराज सहानी बरोबर खेड्यात येते.तेव्हा पाहुणा म्हणून आलेला नासीर हुसेन तम्बोर्यावर हात फिरवून बोटांची धूळ झटकून टाकतो व अनुराधाकडे फक्त बघतो.हा हृषिदा टच. ते आनंद व गुड्डी एकाच वेळी करत होते.दोन्हीचे सेट बाजूबाजूला होते. आनंदचा हिरो राजेश खन्ना आणि गुड्डीचा अमिताभ बच्चन.(होय मी बरोबर लिहितोय). तीन रीळच शुटींग झाल्यावर हृषिदांच्या लक्षात आलं अमिताभ असल्या पुचाट भूमिकेसाठी नाही म्हणून अमिताभला काढून समीत भांजाला घेतलं.आणि आनंद मध्येच अमिताभ ने त्याने सिद्ध केलं तो अंग्री यंगमेन आहे “बाते करो मुझसे थक चुका हुं तुम्हारी बकबक सुनके”
बिमलदा बरोबर काम केल्यामुळे त्यांच्यात वक्तशीरपणा भिनला होता.म्हणूनच आनंद नंतर डोक्यात हवा गेलेल्या राजेश खन्नाला बावार्चीच्या शुटिंगसाठी उशिरा आल्यावर सेटवरून हाकलून दिले. आणि डमी कडून काम करून घेतले.आणि वक्तशीरपणा पाळणारा अमिताभ त्यांच्या गळ्याचा ताईत बनला.त्याचं आणखी एक वैशिष्ठ म्हणजे charactor. ते अशी काही पात्र तयार करत व अभिनेते निवडत की आपण त्या जागी दुसऱ्याचा विचारच करू शकत नाही. अनाडी मधील ललिता पवार, गोलमाल मधील उत्पल दत्त,चुपके चुपके मधील ओम प्रकाश, खुबसुरत मधील रेखा आणि अशोककुमार. “कुत्ते,कमीने,तेरा खून जाऊंगा “ म्हणणारा धर्मेंद्र ,चुपके चुपके मध्ये इतका सहजसुंदर विनोदी अभिनय करू शकतो यावर विश्वास तरी बसू शकतो का ?
त्यांचा स्वताचा आवडता चित्रपट सत्यकाम . त्यांना वाटले होते,त्यातील नायक आदर्श आहे आणि तसेच भारतीय बनतील पण तसे झाले नाही.शेवटचा चित्रपट “झूट बोले कौवा काटे” चित्रपटाच्या वेळी कलाकारांच वेळेवर न येण,मनमानी करणे बघून ते हताश झाले आणि रीमा लागुला विचारले “माझं काही चुकतंय का ?” तेव्हा लागुने सांगितले “नाही दादा,आम्ही त्यांना समज देऊ” असा हा अष्टपैलू दिग्दर्शक २७ ओगस्ट २००६ रोजी जग सोडून निघून गेला.
— रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply