प्रत्येक सजीवात संगीत हे स्पंदनांच्या रुपात असते. श्वासाला निश्चित अशी लय असते. ध्वनी लहरींची विशिष्ट कंपने (स्वर किंवा श्रुती ) आपल्या शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतात. विशिष्ट स्वर आणि लय यांच्या मिलाफातून निर्माण होणारे भारतीय अभिजात संगीतामधील वेगवेगळे राग व त्यांचे भाव किंवा रस हे मानवी मनाच्या व शरीराच्या स्थितींवर निश्चितपणे परिणाम घडवू शकतात असे निर्विवाद संशोधनाद्वारे आता सिद्ध झाले आहे.
२० व्या शतकातील प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ व संगीताचे गाढे अभ्यासक, जगदीशचंद्र बोस यांनी सजीवांचा संगीताला मिळणारा प्रतिसाद सप्रमाण सिद्ध केला व त्यापूर्वीच्या वैदिक काळातील अभिजात संगीताच्या मन व शरीर यांच्यावरील संगीतोपचाराचे महत्त्वच अधोरेखित केले. यातूनच संगीतोपचार ही, मूळ औषध व उपचार पद्धतीला पूरक अशी उपचार पद्धती म्हणून विकसित झाली आहे.
आजकालच्या धकाधकीच्या व संघर्षमय जीवनशैलीमुळे हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब तसेच वाढत्या प्रदूषणामुळे होणारे इतर रोग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. या शारीरिक व्याधींबरोबरच जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव व बरेचदा अपयशातून येणारे नैराश्य या सर्व मानसिक अनारोग्यावर देखील संगीतोपचार फार यशस्वीरित्या काम करतात. कॅन्सर, कंपवात, अशा दुर्धर रोगांवर तसेच स्व-मग्नता (Autism) सारख्या रोगावर देखील हे उपचार अत्यंत प्रभावीपणे काम करतात.
या उपचाराचे अगदी तानसेनाच्या काळापासून ते दुसर्या महायुद्धाच्या काळात पं. ओंकारनाथ ठाकूर यांनी इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी याचा निद्रानाशाचा उपचार राग दरबारी कानडा गाऊन केला असे पूर्वापार दाखले उपलब्ध आहेत. मालकंस, चंद्रकंस, यमन, बागेश्री, दुर्गा, हिंडोल असे काही राग हे उदाहरणादाखल सांगता येतील. भारतीय अभिजात संगीतकारांनी समयचक्र, ऋतू, निसर्गातील पंचतत्वे यांचा रागसंगीत व रागांचे भाव आणि रस यांचा अचूक मेळ घालून सुखी, शांत, समाधानी व वेदनारहित अशा जीवन शैलीचा अमूल्य ठेवा जोपासला आहे व तो आजच्या काळात संगीतोपचार या रुपात रोग निवारणात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
— डॉ. मानसी गोरे
Leave a Reply