व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. दिपाली पाटवदकर यांचा लेख
काही दिवसांपूर्वी गौरी गणपतीसाठी आईकडे गेले होते. या वर्षी, मी गौरीसाठी माहेरी आल्याने आईला खूपच आनंद झाला आणि एरवी ती जे शॉर्टकटमध्ये करत असे ते आता दोघी होतो म्हणून आम्ही दोघींनी मिळून सगळं अगदी साग्रसंगीत केले. आईकडे गौरी येते ती पाणवठ्यावरून. माझी आजी पूर्वी असा कलश नदीवरून भरून आणत असे.
आई विहिरीवरून भरून आणायला लागली आणि मी आत्ता आमच्या बोअरवेलच्या नळावर भरला होता! आजी, आई नदीची वा विहिरीची पूजा करून, पाण्याच्या स्रोताला नमस्कार करून पाणी आणत. मी आपलं बोअरवेलचा नळ धुतला आणि कलशात पाणी घेऊन आले. त्या कलशात नदीच्या जवळचेच पाच खडे टाकायची पद्धत आहे. पण आमच्या सोसायटीत सगळ काँक्रीटीकरण केले असल्याने, दगडच काय माती सुद्धा दिसत नाही. म्हणून मी घरातून बरोबर नेलेले खडे कलशात टाकून आणले. गंगा गौरी घेऊन आल्यावर आईने गौरीला ओवाळून आत घेतले. गौरीचे स्वागत करून तिला मखरात बसवून झाल्यावर मग आम्ही दोघी स्वयंपाकाला लागलो. १६ भाज्या, २ कोशिंबिरी, पुरणाची पोळी, कटाची आमटी, चटणी, कढी, भजी, पापड, कुरडई इत्यादी.
सगळा कार्यक्रम संपवून, जेवण आटपायला दोन वाजून गेले होते. विडा खाऊन झाल्यावर मात्र जरा वेळ पडलोच. पाठ टेकली अन् विचार आला गौरी-गणपतीच्या या सोहळ्यात प्रत्येक गोष्ट ‘लोकल’ होती. हरितालिकेला नदीच्या पत्रातील मूठभर वाळूची पिंडी करून शिवपूजा करणे. दुसऱ्या दिवशी बसवायचा गणपती पण खरेतर नदी जवळची माती आणून करायचा. गौरीसाठी पुन्हा त्या नदी आईचे पाणी आणून त्याची पूजा करायची. नदी माईच्या जवळचे खडे सुद्धा पूज्य मानले गेले. आणि गौरीला आवडते म्हणून या ऋतूत येणाऱ्या भाज्यांची एकत्र भाजी करायची ! फुलेसुद्धा या मोसमात ढिगाने येणारी तेरड्याची. या परंपरेतील प्रत्येक गोष्ट स्थानिक तर होतीच, पण Eco-friendly सुद्धा होती. त्या मध्येही विशेष असे की, या पद्धती स्थानिक निसर्गाविषयी आपलेपणा जागवणाऱ्या होत्या. दगड, माती, वाळू, नदी, विहीर, ओहोळ, रानफुले, भाज्या या सर्वांविषयी कृतज्ञता जागवणाऱ्या होत्या.
या पद्धती पिढी दर पिढी चालत आलेल्या परंपरा आहेत. लोकपरंपराच आहेत या. त्या आल्या कुठून. त्याचे मूळ स्रोत कुठे सापडते, शास्त्रात ‘स्थानिक’ किंवा ‘स्वदेशी’ गोष्टींबद्दल काय सांगितले आहे या विषयी नंतर माझा अभ्यासू मित्र विवेक सानेशी चर्चा केली. त्या विचार मंथनातून कितीतरी गोष्टी नव्याने समोर आल्या. माझी विचार गाडी पुराण वाङ्मयाच्या दिशेने धावू लागली.
तत्पूर्वी आपण भारतीय ज्ञानपरंपरेविषयी बोलू. भारतीय संस्कृतीचे मूलाधार म्हणजे वेद आणि वेदांगे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार वेदातून जीवनपद्धतीचे, शिष्टाचाराचे प्रतिबिंब घडते. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे ह्या वेदांच्या ज्ञानशाखा. वेदांग, वेदांचे उपग्रंथ, जैमिनीची धर्म मीमांसा, बादरायणाची ब्रह्ममीमांसा, अशा काही मीमांसा, वेदांवर आधारित उपनिषदे, व प्रत्येक वेदांचे उपग्रंथ जसे ब्राह्मण आणि आरण्यक, काही उपवेद जसे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, पुराणवेद इ. इ. असे सर्व मिळून आपली आजची संस्कृती, पारंपरिक साहित्य समृद्ध झाले आहे.
याच परंपरेतील पुराणे आणि उपपुराणे यांची स्वदेशी विचारांच्या प्रसारात नेमकी भूमिका पाहू. कोणतेही साहित्य हे समाजमनाचा आरसा असते असे म्हटले जाते. पुराण वाङ्मय हा भारतीय समाजमनाचा आरसा आहे. भारतीय संस्कृतीतील जे जे उदात्त ते या पुराणांनी काळजीपूर्वक जतन केले आहे. पुरा नवं भवति इति पुराणम् जे प्राचीन असूनही नित्यनूतन भासते ते पुराण. पुराणांतून सर्व मानवांना पारमार्थिकदृष्ट्या समता देण्याची दृष्टी आढळते. पुराणे म्हणजे साधारणपथ किंवा सर्वांचा मार्ग, असा निर्देश पद्मपुराणात आढळतो.
पुराणांतील देवी आणि मुख्य देव शिव व विष्णू हे कोणताही भेदाभेद न मानता सर्वांना पावन करणारे आहेत. पुराणांतील मनोरंजक कथांनी समाजातील सर्व वर्गांना सद्वृत्ती, धार्मिक श्रद्धा व नीती ह्यांचे शिक्षण दिले. तसेच कथा, कीर्तन, देवतोत्सव, सण इ. रूपाने धार्मिकता निर्माण केली आणि भक्तिमार्गाची स्थापना करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली. पुराणांची निर्मिती विश्वनिर्मितीच्या रहस्य उकलीपासून ते आजपर्यंतच्या इतिहासाची नोंद घेण्यासाठी केली आहे. हे विश्वनिर्मितीचे रहस्य आजच्या भाषेत वैज्ञानिक आधार असलेले असेल असे नाही, तर तत्कालीन तत्त्वज्ञानावर आधारित असलेली विश्वनिर्मिती, इतिहासाचे वर्णन करणे, वेगवेगळ्या राजांची वर्णने, वंशावळ्या ठेवणे, भूगोल, काळ इ सर्वांचा उल्लेख पुराणात आहे. त्यातही महापुराणे व उपपुराणे असा भेद आहे. महापुराणांचे प्रकार १८.
१. ब्रह्म, २. पद्म, ३. विष्णु, ४. भागवत, शिव, ५. ६. भविष्य, ७. नारद, ८. मार्कंडेय, ९. अग्नी, १०. ब्रह्मवैवर्त, ११. लिंग, १२. वराह, १३. स्कंद, १४. वामन, १५. कूर्म, १६. मत्स्य, १७. गरुड, १८. ब्रह्मांड आणि उपपुराणे एकूण २७.
पुराणांमध्ये देव-असुरांची युद्धे, भूगोल इ चे वर्णन आहेच पण त्याशिवाय विविध चरित्रे, व्रतवैकल्य, स्मार्त, धर्मशास्त्र, तीर्थस्थाने इ. विषय पण आहेत. पुराणांचे स्वरूप सदैव बदलते राहिले. पुराणांनी काय नाही शिकवले. जो श्रेष्ठ मानवधर्म आहे, जी भारतीय विचारधारा आहे, त्याचे मूळ या पुराणात आहे. वैदिक धर्मातील यज्ञादींचे महत्त्व कमी करून भारतीय समाजाला एक नवे वळण देण्याचे काम केले.
भक्तीचे माहात्म्यही पुराणांनी वाढविले. भक्तीचे लौकिकी, वैदिकी व आध्यत्मिकी, मानसी, वाचिकी व कायिकी आणि सात्त्विकी, राजसी व तामसी इ. विविध प्रकार करण्यात आलेत. जप, नामस्मरण, मूर्तिपूजा, मंदिरांची निर्मिती इत्यादींना पुराणांकडून प्रोत्साहन मिळाले. पूर्तधर्म म्हणजेच तलाव, विहिरी, धर्मशाळा, अन्नछत्रे इ. निर्माण करून परोपकार करणे, हे पुण्यकारक असल्याचे त्यांनी सांगितले. दान विशेषतः अन्नदान हे अत्यंत पुण्यकारक मानून त्याचे महत्त्व वाढवले. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थांचे विवेचन केले. चार वर्ण व चार आश्रय यांच्या कर्तव्यांची चर्चा केली. निष्काम कर्मयोगाचेही महत्त्व सांगितले. ईश्वरी अवतारांचे वर्णन हा पुराणांचा एक महत्त्वाचा विषय आहे.
पुराणांचे विषय धर्मशास्त्रापुरतेही मर्यादित राहिले नाहीत. नारद, गरुड, अग्नी व विष्णुधर्मोत्तर यांसारखी काही पुराणे व उपपुराणे ही विश्वकोशात्मक व सर्वस्पर्शी बनली आहेत. राजधर्म, काव्यशास्त्र, छंदशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, पशुवैद्यक, वृक्षायुर्वेद, धनुर्वेद, धातुशास्त्र, रत्नविद्या, शिल्पशास्त्र, नृत्यसंगीतादी कला, वास्तुशास्त्र, मूर्तिशास्त्र, ज्योतिष, गणित, सामुद्रिकशास्त्र इ. विषयांची चर्चा अनेक पुराणांनी केली आहे. अनुलेपनविद्या (पायाला लेप लावल्यावर अर्ध्या दिवसात हजारो योजन चालू शकण्याची विद्या), वशीकरणविद्या, अंतर्धानविद्या, धन कमी पडू न देणारी पद्मिनीविद्या, स्वेच्छारूपधारिणीविद्या, त्रैलोक्यविजयविद्या इ. विविध विद्यांची माहिती अनेक पुराणांतून आली आहे. भारतीयांनी अति प्राचीन काळी केलेल्या भौगोलिक परिक्रमणाच्या सूचक कथा पुराणांत आढळतात, असे एक मत आहे. पुराणांतील तीर्थक्षेत्रांची वर्णनेही भौगोलिक ज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
पुराणांनी केलेल्या कुशद्वीपातील नीलनदीच्या वर्णनावरून कॅप्टन स्पीक यांनी इजिप्तमधील नाईल नदीचा उगम शोधून काढला, या ऐतिहासिक घटनेमुळे पुराणांतील वर्णनांचे महत्त्व वाढले आहे. पुराणकथांतील अनेक घटनांना नैतिक आदर्श आणि मार्गदर्शक तत्त्व या दृष्टींनीही मूल्य असते. उदा. मोठे पाप करणाऱ्या लोकांमुळे प्रलय होतो, परंतु मोठे पुण्य करणारे लोक असले म्हणजे जग तरते, सुखसमृद्धी होते, अशा अर्थाच्या अनेक पुराणकथा असतात. या कथांचा व त्यांतून मिळणाच्या संदेशांचा माणसाच्या आचरणावर निश्चितच प्रभाव पडत असतो. मानवी विचारांना हवे ते वळण देण्याचे वा त्यात आमूलाग्र बदल करण्याचे सामर्थ्य त्या पुराणकथांत होते. पुराणकथांच्या प्रभावामुळे मानवी जीवन व संस्कृती यांना विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. पुराणकथांवरील श्रद्धेमुळेच माणूस विशिष्ट प्रकारचे आचरण करण्यास प्रवृत्त होतो, निषिद्ध कृत्ये टाळतो, सुखांचा त्याग करून यातनाही सोसतो. थोडक्यात म्हणजे माणूस पुराणकथा जगत असतो.
आधुनिक मानवाचे मन जसे फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या घटनांनी बनले आहे, तसे प्राचीन मानवाचे मन पुराणकथांनी बनले होते, असे जे मीर्शा ईलिआने म्हटले आहे, ते सार्थच आहे. आधुनिक काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे पुराणकथांचे सामर्थ्य निश्चितच क्षीण झाले आहे. तरीदेखील आधुनिक काळातील साहित्यादी विविध कलाकृतींवर अजूनही प्राचीन पुराणकथांचा प्रभाव आढळतो. लहान मुलांना अजूनही पुराणकथा सांगितल्या जातात. व्यक्ती, विमाने, जहाजे इत्यादींचे नामकरण पुराणकथांच्या आधारे केले जाते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अजूनही कर्मकांडरहित पुराणकथा व्यक्त होतात.
चित्रपट, वृत्तपत्रे, मुद्रणालये, दूरदर्शन, आकाशवाणी इ. माध्यमांमुळे त्यांची प्रभावक्षमता काही प्रमाणात वाढलीही आहे. आधुनिक काळात नाझींनी स्वमतपुष्ट्यर्थ प्राचीन पुराणकथांचा आधार घेतला होता, हे सर्वश्रुत आहेच. पुराणकथांचा प्रभाव आणि सामर्थ्य असे प्रचंड असल्यामुळेच संस्कार करण्याचे एक शैक्षणिक साधन म्हणून पुराणकथांचे स्थान अनन्यसाधारण आहे.
भारतासारख्या विशालकाय व विविधतेने भरलेल्या देशात राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्याचे महान कार्य भारतीय पुराणकथांनी प्राचीन काळापासूनच केले आहे. काळाच्या ओघात या पुराण वाङ्मयात अनेक बदल झाल्याचेही आढळते. काळाच्या ओघात बदलत व वळणे घेत घेत विकसित झालेली पुराणे आणि उपपुराणे हा भारतीय संस्कृतीचा अत्यंत समृद्ध ठेवा आहे.
मातृभूमीबद्दल प्रेम, आदर, अभिमान उत्पन्न करण्याचे काम पुराण – वेद यांनी केले आहे. विष्णुपुराणामध्ये भारतवर्षाचे अर्थात भारत देशाचे भौगोलिक वर्णन
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्ष तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।
अशा शब्दात केले आहे. ऋग्वेदामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा याचेही दाखले सापडतात.
श्रेष्ठं यविष्ट भारताग्ने द्युमन्तमा भर
वसो पुरुस्पृहं रयिम् ।। (ऋग्वेद २-७ – १ )
भारत अशा ऊर्जावान युवकांचा देश आहे जे सर्व विद्यांमध्ये अग्नी समान तेजस्वी विद्वान आहेत, सर्वांचे भले करणारे, सुखी असणारे आहेत आणि ज्यांना ऋषिगण कल्याणमयी, विवेकशील आणि लक्ष्मीवंत होण्याचा उपदेश देतात. राष्ट्राची एकता, सजगता, अखंडता याची प्रेरणा आपल्याला वेदसाहित्यातून मिळते.
ते अज्येष्ठा अकनिष्ठास उद्भिदोऽमध्यमासो महसा विवावृधुः ।
सुजातासो जनुषा पृश्निमातरो दिवो मर्या आ नो अछा जिगातन ॥
(ऋग्वेद)
परेह्यभीहि धष्णुहि न ते वज्रो नि यंसते ।
इन्द्र न हि ते शवो हनो वर्त्र जया अपोऽर्चन्न नु स्वराज्यम् ।
(ऋग्वेद)
आपण जेव्हा भारतीय पुराण आणि स्वदेशी विचारधारा यावर जेव्हा विचारमंथन करतो, तेव्हा काही महत्त्वाचे मुद्दे विशेष चिंतनीय वाटतात.
स्वदेशी शिक्षण संस्था
भारतीय शास्त्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्वदेशी शिक्षण. याचे तीन पैलू आहेत-
१. भारतीय शिक्षण पद्धत
२. भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचे शिक्षण.
आणि
३. भारतीय भाषेत शिक्षण. या तिन्ही ‘स्वदेशी’ गोष्टी पाहू-
१. स्वदेशी शिक्षण पद्धत –
भारतामध्ये तीन शिक्षण पद्धती होत्या. एक स्वतःच्या घरी वडील, काका, आजोबा यांच्याकडून घरातील व्यवसायाचे शिक्षण घेणे. दोन एखाद्या स्थपतीकडे अथवा कारागिराकडे उमेदवारी करणे आणि तीन गुरुगृही जाऊन वेद, शास्त्र व शस्त्रांचा अभ्यास करणे. या शिवाय प्राथमिक शिक्षण म्हणजे लिहिणे, वाचणे, बेरीज, वजाबाकी इत्यादी वयाच्या ५ व्या ६ व्या वर्षापासून शिकवले जात असे.
-याबद्दल शास्त्रांनी – विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ, केशान्त आणि समावर्तन हे संस्कार सांगितले आहेत.
विद्यारंभ हा संस्कार प्राथमिक शिक्षणास सुरुवात करताना होत असे. यानंतर मूल धुळाक्षरे गिरवण्यास लागत. कोणी शिक्षक घरी येऊन हे शिकवत किंवा मंदिरांच्या प्रांगणात असे लहान वर्ग भरत. उपनयन – हा संस्कार गुरुकुलात जाण्याच्या आधी केला जात असे.
वेदारंभ – हा संस्कार वेदांच्या अभ्यासाच्या आधी केला जात असे. केशान्त – शिक्षण संपल्यावर केला जाणारा संस्कार. समावर्तन – शिक्षण संपल्यावर गुरू शिष्याला औषधी व सुगंधी पाण्याने स्नान घालत. नवीन वस्त्रे देऊन त्याची पाठवणी करत. हा शिष्य ‘स्नातक’ ही पदवी मिळवत असे. संपूर्ण शिक्षण विनामूल्य असे. शिक्षण संपल्यावर जेव्हा जमेल तेव्हा स्नातकाने गुरुदक्षिणा देणे अपेक्षित होते.
२. स्वदेशी शास्त्र – तिन्ही प्रकारच्या शिक्षण पद्धतीत स्वदेशी विज्ञान शिकवले जात असे. जसे स्थापत्य शिकणारा घरे, मंदिरे, विहिरी, तलाव, पुष्करणी, बांध आदि कसे बांधावे हे मयमत किंवा समरांगणसूत्रधार सारख्या ग्रंथातून शिकत असे. किंवा खगोलशास्त्र शिकणारा आर्यभटसिद्धांत, सूर्यसिद्धांत आदि ग्रंथातील सूत्रे शिकत असे. ज्यामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वीवर चंद्राची सावली पडली की सूर्यग्रहण होते अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत.
आर्यभटसिद्धांत हे पुस्तक ४थ्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत पाठशालांमधून शिकवले जात होते. तसेच भूमिती शिकणारा बौधायनाची किंवा आपस्तंभाची शुल्बसूत्रे शिकत असे. गणित शिकणारा भास्कराचार्यांचे सिद्धांतशिरोमणी शिकत असे. व्याकरण शिकणारा पाणिनींची अष्टाध्यायी शिकत असे. काव्य शिकणारा पिंगलांचे छंदशास्त्र शिकत असे. अभिनय व नृत्य शिकणारा भरतमुनींचे नाट्यशास्त्र शिकत असे. रामायण, महाभारत ही आर्षकाव्ये, कालिदास, माघ, दंडी आदींची महाकाव्ये; पंचतंत्रातील कथा आणि सुभाषिते मुलांना शिकवली जात असत. यामधून मुले हसत खेळत नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, ethics, morals, management, इतिहास, भूगोल इत्यादी शिकत होती.
३. स्वदेशी भाषेत शिक्षण – सर्व शिक्षण मातृभाषा आणि संस्कृतमधून दिले जात असे.
स्वकर्म
स्वदेशीचा एक भाग आहे ‘स्वकर्म’ गीतेने आपले कर्म कौशल्यपूर्ण करावे तोच योग आहे हे सांगितले.
योगः कर्मसु कौशलम् ॥
हे काम म्हणजे कोणतेही काम नाही, तर ते ‘स्वकर्म’ आहे. गीतार्थ सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात – आपले कर्म हेच ईश्वर चरणी वाहिलेले फूल आहे. आपले कर्म हीच ईश्वराची पूजा आहे.
तया सर्वात्मका ईश्वरा| स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागी ।
अर्थात प्रत्येकाने आपले स्वकर्म उत्तम केले तर तो संपूर्ण समाज आत्मनिर्भर होईल यात शंका नाही. उदाहरण द्यायचे झाले तर, मला जर देशी कुंभाराकडे उत्तम प्रतीची मातीची भांडी मिळाली तर मी चीनी बरणी विकत घेणार नाही. किंवा देशी विद्यापीठात उत्तम शिक्षणाची संधी मिळाली तर हुशार मुले परदेशात शिकायला जाणार नाहीत. म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कामात कौशल्य आणणे अत्यावश्यक आहे.
स्वधर्माचरण
आणखी एक ‘स्वदेशी’ गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे – स्वधर्म! अर्थात स्वतःच्या धर्माचे पालन करणे. जसे राजाने राजधर्म पाळणे. गृहस्थाने गृहस्थधर्माचे आचरण करणे. पित्याने पितृधर्माचे, मुलाने पुत्रधर्माचे आचरण करणे इत्यादी. उदाहरण म्हणून एक घेऊ गृहस्थधर्म. गृहस्थधर्म हा मी, माझी बायको आणि माझी मुले असे आम्ही छान आनंदात राहू इतका मर्यादित नव्हता. गृहस्थाच्या लहान मोठ्या दानांवर शिक्षणसंस्था अवलंबून होती, वानप्रस्थातील (निवृत्त झालेले) लोक अवलंबून होते, तसेच संन्यासी जन अवलंबून होते.
यापैकी जो कोणी दारात भिक्षा मागायला येईल त्याला अन्नदान करणे महत्त्वाचे होते. नवरा-बायको या दोघांना मिळून पंचमहायज्ञ (५ जबाबदाया) सांगितले होते.
हे रोज आचरणात आणायचे होते ब्रह्मयज्ञ (स्वत: शिकणे व दुसऱ्याला शिकवणे), देवयज्ञ (धार्मिक कार्य करणे), पितृयज्ञ (आई, वडील व घरातील वयोवृद्धांची काळजी घेणे), भूतयज्ञ ( निसर्ग, वृक्ष व प्राण्यांची काळजी घेणे) आणि अतिथियज्ञ (समाजातील इतरांची काळजी). ज्यावेळी समाजातील प्रत्येक कुटुंब हे यज्ञ करत होते तेव्हा सहजच वृद्धाश्रम, PET आणि ढीगभर NGOsची गरजच नव्हती. स्वधर्म पाळणे किती महत्त्वाचे होते हे गीतेतील या श्लोकातून कळते –
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।। ३.३५ ।।
दुसऱ्याचा धर्म उत्तम असला आणि आपला त्या समोर कमी वाटत असला तरीही स्वत:चा धर्म सोडू नये. स्वतःचा धर्म पाळताना मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर आहे, पण दुसऱ्याचा सोपा वाटतो किंवा चांगला दिसतो म्हणून तो घेऊ नये. कारण दुसऱ्याच्या धर्माच्या पालनात आपला नाश आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण अंगीकारलेली पाश्चात्त्य शिक्षण पद्धती. माँटेसरी, किंडर गार्डेन, Macaulay शिक्षण पद्धत, कॉन्वेंट शिक्षण आदि मधून आपण विदेशी धर्म अंगीकारला. विदेशी शिक्षण पद्धत, विदेशी शास्त्र आणि विदेशी भाषेतील शिक्षण अंगीकारले. आता त्याचे भयानक परिणाम पहात आहोत. मुलांचे धड मातृभाषेवर प्रभुत्व नसते धड इंग्रजीवर नसते. जिथे भाषाच नीट येत नाही तिथे त्यापैकी कोणत्याही भाषेतून कोणतेही विषय शिकवले तरी ते कितपत कळतात हा प्रश्नच आहे. रामायण, महाभारतातील तत्त्वज्ञान कळायचे राहू देत, या विदेशी पद्धतीतून शिकल्याने मुलांना त्यामधील पात्र सुद्धा माहीत नसतात.
कैक शतके अशी होती की, चीन मध्ये भारतातून कोणी आला आहे असे कळताच त्याला घरी आणून त्याचा आदर सत्कार करत असत. कशामुळे? तर अगदी साधा भारतीय मनुष्य सुद्धा ज्ञानी असे. ते ज्ञान शिक्षणातून मिळत होतेच. पण पुराणिक व कीर्तनकारांकडून रामायण, महाभारतातून व पौराणिक कथांमधून सुद्धा मिळत असे.
आज सुद्धा जेव्हा एखादा काही न शिकलेला वारकरी गीतेचे तत्त्वज्ञान सांगतो आणि तसे जगताना दिसतो तेव्हा कळते की स्वदेशी ज्ञान किती खोलवर रुजलं आहे! प्रचलित शालेय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्याला मात्र या कशाचाही गंध नाहीये. ज्या माणसाला मातीचा गंध येत नाही, तो कसला भूमिपुत्र? तो कसला भारतीय? एकूण स्वधर्माचा त्याग केल्याने सध्या शिक्षण पद्धतीतून ‘परदेशी’ मुले तयार होत आहेत असे म्हटले तर ते काही चुकीचे नाही.
परधनाची अभिलाषा नको
उपनिषदांनी देखील हेच सांगितले आहे. ईशावास्य उपनिषदात म्हटले आहे –
ईशावास्ममिदं सर्वं यत् किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जिथा: मा गृधः कस्य स्विद् धनम् ॥
सर्व चराचरात ईश्वर सामावलेला आहे. त्याग केल्याशिवाय कशाचाही उपभोग घेऊ नकोस आणि दुसऱ्याच्या धनाची हाव धरू नकोस.
अर्थात कोणाकडूनही फुकटचे काहीही घेऊ नकोस. जर कोणी काही फुकटात देत असेल तर त्यामध्ये निश्चित मेख आहे. स्वकष्टाने धन, धान्य, अर्थ मिळव. दुसऱ्याचे धन मग ते कोणत्याही प्रकारचे असो त्याची हाव धरू नकोस. जसे-
विदेशी धान्य – आठवते गव्हाबरोबर आलेले काँग्रेस गवत ?
विदेशी वृक्ष पर्जन्यवृक्ष, सुबाभूळ आदि अपायकारक वृक्ष.
विदेशी शब्द – Race, Caste, Tolerance, Secularism … हे शब्द आपल्यावर लादले गेले खरे, पण आपणही ते आपल्याला चिकटवून घेतले आहेत. युरोपसाठी ते शब्द योग्य होते पण भारतीय परंपरेत यांना स्थान नाही.
विदेशी शिक्षण, विदेशी कपडे आणि कापड विदेशी पाणी साठवण्याच्या पद्धती, सांडपाण्याची व्यवस्था या देखील आपण आत्मसात केल्या. आपल्या स्वत:च्या निसर्गाशी अनुकूल असलेल्या पद्धती सोडून आपण यांची हाव धरली.
विदेशी इंधन आणि इतर कितीतरी….
Think Global Act Local
स्वदेशीवर भर देताना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की वेदांनी स्वदेशी आचरण सांगताना परकीय गोष्टींसाठी कान बंद करायला सांगितले नाही. उलट सगळीकडून आमच्याकडे चांगले, उत्तम विचार येऊ देत. आम्ही शिकायला उत्सुक आहोत हेच सांगितले. दुसऱ्यांनी काही चांगले सांगितले तर ते तावून सुलाखून, तपासून मग ग्रहण करू –
आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः ।।
-(ऋग्वेद १.८९.१ )
आमच्याकडे विश्वातून सगळीकडून, कल्याणकारी विचार येऊ देत !
Go Global
त्यापुढे जाऊन वेदांनी हे देखील सांगितले की आपल्याला कूपमंडुक वृत्तीने केवळ आपल्या पुरते राहायचे नाहीये. तर आपल्याकडे जे जे म्हणून चांगले आहे, उत्तम आहे ते सर्वांना द्यायचे आहे. चांगले गुण, चांगल्या सवयी, चांगल्या पद्धती, चांगले ज्ञान यांचा संपूर्ण विश्वात प्रचार करून सर्वांना गुणी वैश्विक नागरिक करू
कृण्वन्तो विश्वमार्यम् || (ऋग्वेद ९.६३.५ )
सर्व लोकांना आम्ही सद्गुणी करू !
हे विश्व आम्ही गुणी लोकांनी भरू !
Self-Reliant and Selfless
श्रुती स्मृती आदि सर्व शास्त्रे मानवाला परावलंबन सोडून स्वावलंबी होण्यास सांगतात. तसेच आत्मनिर्भर असलो तरी आत्मकेंद्री नको हे सांगतात आणि स्वार्थ सोडून परमार्थ करण्यास सांगतात.
भारतीय संस्कृती आणि एकूणच वेद, उपनिषदे, पुराणे, उपपुराणे यांनी अद्वैताला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. अद्वैत म्हणजे आपल्यासारखेच इतरेजन आहेत ही संकल्पना आपण सर्वजण सारखे का, आपणात एकत्व का, अद्वैत का, तर ही परमात्म्याची शक्ती सर्वात सारखीच आहे. तो आणि मी एकच आहोत. माझ्यातून त्याचीच शक्ती प्रगट होते. तशीच ती इतरांतूनही.
अद्वैत म्हणजे आपल्या आणि परमात्म्याच्या ऐक्याची अनुभूती आहे. मला जे काही मिळाले आहे ते दुसऱ्यालाही मिळावे.
आपल्याला ज्या गोष्टींमुळे आनंद प्राप्त होतो, तसाच आनंद दुसऱ्याच्या वाट्याला यावा. मला जे आत्मज्ञान प्राप्त झाले आहे तसेच दुसऱ्यालाही प्राप्त व्हावे. नियती आपल्याला अद्वैत शिकवीत असते. आपल्या भोवतालची सृष्टी आपल्याला अद्वैत शिकवीत असते. भोवतालची सृष्टी आपल्याला याचेच संकेत देत असते. अद्वैतभाव हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे हे तत्त्व आपण मान्य केलं तर त्या संस्कृतीत आपण किती भर घालत आहोत याचा प्रत्येकाने विचार करावा.
(संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास, चित्रकला या सर्वांचा मिलाफ त्यांच्या साहित्यात असतो. चित्र ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक प्रकाशित)
-प्रा. दिपाली पाटवदकर
Leave a Reply