नवीन लेखन...

इंद्रधनू नभातले…. रंग माझ्या मनातले…

संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात नुकताच पावसाचा शिडकावा पडून गेल्यावर आल्हाददायक गारवा निर्माण झालाच होता, स्वच्छ सुंदर वातावरणात परत उन्हाची कोवळी किरणे पसरू लागली आणि काय आश्चर्य! छान इंद्रधनुष्य आकाशात उमटले, तसे कावेरीबाईं आनंदीत झाल्या अनेक वर्षांनी आज असा योग आला होता. आकाशातील इंद्रधनू पाहाणे त्यांना फार आवडत असे. तसेच आजही त्या मोहीत झाल्या आणि खिडकीतून बाहेर निरखून बघू लागल्या. हल्ली त्यांच्याकडे वेळचं वेळ असे. उमा त्यांची सून अतिशय लाघवी, त्यांना काही करु देत नसे, त्यामुळेच त्या निवांत असतं.

इंद्रधनुष्याचा लालीमा आकाशात दूर-दूर पसरला होता. हिरव्या वनराईत त्याचे रुप एखाद्या मनमोहक शोडषे सारखं दिसत होतं. पानांवरचे पाण्याचे चकाकणारे थेंब सर्व आसमंत परावर्तीत करीत होते, चाफ्याचा, गुलाबाचा ओला सुगंध हवेवर दरवळत होता. पक्षांच्या ओल्या पंखांची फडफड, गुंजारवही मधूनच कान तृप्त करीत होता. या वातावरणातला रंग कुठे आणि कसा साठवुन ठेवावा असे त्यांना वाटले, मुळची गाण्याची आवड त्यांना होती पण बर्‍याच दिवसांत सराव नव्हता. आज ह्या मनोहर दृष्याचा आनंद घेत ते बघत..बघत….. ” ता..ना..पि..हि..नि.. पां.. जां.. ” असे शब्द आपसुकच त्यांच्या ओठावर आले ते म्हणताना त्या विचारांमध्ये गढल्या……..

की जशी ही निसर्गात रंगांची मुक्तपणे केलेली ऊधळण माणसाच्या आयुष्यातही असतेच की……विधात्याने या रंगांची उधळण मानवी आयुष्यात किती समर्पक केली आहे…

बालपणीचा गोंडस तांबडा व नारंगी यांचा मिलाफ एकत्र होऊन गुलाबी रंग सुरुवातीपासून मुलं तारुण्यात असे पर्यंत असतोच की, लहानपणीचे दिवस अनेक गोष्टींसाठी आई वडीलांकडे लाडेलाडे हट्ट पुरवून घ्यायचे, छोट्या छोट्या सवंगड्यांसोबत लुटूपुटूचा अबोला धरायचे, गुलाबी गोबर्या गालाचे दिवस आईवडिलांच्या पंखाखाली चिऊ-काऊ करत भुर्रकन उडून जातात.

नुकतीच तारुण्याची चाहुल लागते. कोवळ्या वयात डोळ्यात गुलाबी स्वप्न असतात. आयुष्यात काहीतरी ध्येय असते. शिक्षणासाठी कष्ट करायचे असतात, याच वयात मैत्र जीवांचे मिळतात, आयुष्याची दिशा ठरवायची असते, पुढील आयुष्याची झोकून देऊन पायाऊभारणी करायची असते. गडद गुलाबी रंग देहबोलीतूनही दिसत असतोच. हळूहळू व्यक्तीमत्व आकार घेते.

तडफदार ऐन तारुण्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. अनेक अपेक्षांची पूर्ती करण्यासाठीचा योग्य काळ…..खरेतर आयुष्यातील ऊन्हाळे-पावसाळे बघायचा काळ, आयुष्यातील कोवळा गुलाबी रंग ओसरून हिरवा रंग पांघरण्याचा काळ हा ऐन तारुण्याचा. अनेक जबाबदार्या समर्थपणे पेलण्याचा काळ आयुष्यात येणारे बरे-वाईट अनुभव याच वयात येतात. तारुण्याची ऊर्मी असते, स्वभाव धाडसी बनतो, जगाचे अनुभव मिळतात, मित्र-नातेवाईक, व्यवहारातील फायदे-तोटे, चांगले-वाईट अनुभव… हा काळ बराच मोठा असतो व अनेक अनुभवही देतो, आयुष्याची ही शिदोरीच पुढे शेवटपर्यंत उपयोगी पडते. याच वयात कधीतरी दोनाचे चार हातही होतात, नव्या नवलाईच्या आयुष्यातील नवलाई ही हिरव्या रंगाचे प्रतिक तर वाईट अनुभव हे आयुष्यातील ऊन्हाळे – पिवळ्या रंगाचे प्रतिक. ऊन-पाऊस सोसत दिवस सरत असतात..

त्यानंतरची येणारी अवस्था म्हणजे ऐन तारुण्य ओसरून मध्यम वय, तारुण्यातील जोश जरा शांत होऊन समजुतदारपणाने मार्ग काढण्याची प्रवृत्ती वाढण्याचा काळ. आयुष्यात डोके थंड ठेवून मार्गक्रमण करण्याचा काळ, निळ्या रंगाची थंड प्रकृती अनुकरण करण्याचा काळ, कारण याच वयात तडतड केली तर हजार दुखणी मागे लागु शकतात, तरुण मुलं, सहकारी, मित्र यांच्याशी वागताना त्यांच्याशी शांतपणे जमवुन घेण्याचा काळ. निळ्याशार जलाशयासारखा सखोल विचार करण्याचा काळ. ज्याप्रमाणे थेंब थेंब साचत अथांग शांत निळा जलाशय बनतो तसेच आपल्या बरोबर समोरच्याची प्रगती साधायचा काळ व आपल्या सभोवताली एक एक करीत आपला मित्रसंग्रह वाढवण्याचा काळ.
या काळात शांततेनेच मार्ग काढणे अपेक्षित असते…
हाही काळ तसा बराच मोठा असतो, हळुहळू मुलांना हाताशी घेण्याचा काळ..

नंतर येणारा वृद्धापकाळ, सर्व गात्र हळुहळू शिथील होण्याचा काळ या अवस्थेत कोणतीही स्वप्न नसतात, कोणत्याही प्रकारच्या ईच्छा जवळजवळ संपलेल्या असतात, ईच्छारहित अवस्था म्हणून पांढरा रंग. निर्मोही अवस्था, आयुष्यातील अनेक रंग उपभोगून “रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा….” हे अनुभवण्याची अवस्था, परमेश्वरी दरबारातील चैतन्य मय अवस्था, आयुष्याचा लेखा-जोखा मांडतानाची शुध्द अवस्था ईथे कोणत्याही रंगाला स्थान नाही, फक्त श्वेत-शुभ्र रंग.

व शेवटी परत पाण्याशी संबंध म्हणून जांभळा रंग….

असे इंद्रधनू माणसाच्या आयुष्यातही रंगांची मुक्त उधळण करीत असते. असे माणसाचे आयुष्यही मनमोहक मोरपंखी रंगाचेच असते. माणूस त्यात निर्व्याज र्प्रेम, आनंद, माया, वात्सल्य यांची किनार देऊन जीवन चित्र आणखी मोहक बनवु शकतो….

कावेरीबाई विचारातून बाहेर आल्या. आज त्यांचा चेहेरा या विचारांनी एकदम खुलला होता. अचानक बघितलेले इंद्रधनू त्यांना कमालीचा आनंद देऊन गेले. मनप्रसन्न अवस्थेत त्यांनी रियाजासाठी तंबोरा काढला….

— सौ. शिवानी श्री. वकील 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..