चिकित्साक्रम व कार्यकारण विचार
पंचकर्म – बस्ति चिकित्सा
बस्ति चिकित्सा : गर्भधारणेपूर्वी यथोचित पंचकर्म चिकित्सा करून शरीरशुद्धी करावी ही संकल्पना आपण जाणतोच. त्यातही बस्ति चिकित्सा सर्वात महत्वाची आहे. ही चिकित्सा उभयतांनी करावी. ह्याने गर्भाशयातील अंतस्त्वचेला व बीजवाहिनीला शोथ व त्यामुळे बीजवहनात अडथळा, वंक्षणभागातील अवयवांचा शोथ (PID), गर्भाशयाच्या अंतस्त्वचेचा अवाजवी रोगट विस्तार (Endometriosis) ह्या विकारांवर मात करता येते.
अपानोऽपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः । शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ।। अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/९)
अपानवायु गुदस्थानी रहात असून कटि, शिस्न व मांड्या ह्या ठिकाणी संचार करतो. तो शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ ह्यांना योग्य काळी शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे वंध्यत्व चिकित्सा करतांना अपानवायूचा विचार महत्वाचा आहे.
बस्ति चिकित्सेने अपानवायुचे अनुलोमन होऊन आतड्यातील मळाचे खडे सहजपणे बाहेर पडल्याने बीजकोशाला प्राणवायुयुक्त रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो, परिणामी त्याचे प्राकृत कार्य सुधारते. ‘भीतीने गर्भगळीत होणे’ हा जरी वाक्प्रचार असला तरी ह्यात शास्त्र दडलेले आहे. अपान वायु प्राकृत अवस्थेत असेल तर तो योग्य काळपर्यंत गर्भ टिकवून धरतो आणि विकृत झाला तर मात्र हमखास गर्भाला बाहेर टाकतो असा बोध ह्यातून घ्यावा. म्हणून गर्भावस्थेत अपानाला सर्वात जास्त महत्व आहे. आतड्यातील अपान वायु, मळाचे खडे हे गर्भाशयाच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर व बीजवाहिन्यांवर दाब निर्माण करू शकतात. हा दाब नाहीसा करण्यासाठी बस्ति चिकित्सा महत्वाची ठरते. बस्ति चिकित्सेने अपानाचे कार्यही सुरळीत होते.
कृत्स्ना चिकित्सापि च बस्तिरेकैः । । अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान १९-८७
अपान वायूच्या विकारांसाठी बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.
अपानवायु कशाने बिघडतो ?
अपानो रूक्षगुर्वन्नवेगाघातातिवाहनैः । यानयानासनस्थानचङ्क्रमैश्चातिसेवितैः ।।
कुपितः कुरुते रोगान्कृच्छ्रान्पक्वाशयाश्रयान् । मूत्रशुक्रप्रदोषार्शोगुदभ्रंशादिकान्बहून् ।। अ. हृदय, निदानस्थान १६/२७-२८
रूक्ष व गुरु अन्न सेवन, वेगांचा अवरोध, अतिशय कुंथणे, गाडीघोड्यावरून प्रवास करणे, फक्त बैठे काम करणे, सतत उभे राहणे, बेसुमार चालणे अशा कारणांमुळे अपानवायु कुपित होतो. ह्याने पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे मूत्राघात, प्रमेह, शुक्रदोष, मूळव्याध, गुदभ्रंश सारखे कष्टसाध्य व्याधी उत्पन्न होतात.
ग्रंथात वर्णन केलेल्या ह्या कारणांव्यतिरिक्त काळानुसार इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. जसे – अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ सेवन करणे, कार्बोनेटेड शीतपेयांचे बेसुमार सेवन, कंबरेचा पट्टा (बेल्ट) फार घट्ट बांधणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, घाई घाईने व न चावता जेवण करणे, मोड आलेल्या कडधान्यांचे अधिक सेवन करणे, अकाली झोप घेणे व रात्र-रात्र न झोपणे (शिफ्ट ड्युटीज, रात्रीचे ड्रायव्हिंग मुळे) अशी अनेक कारणे अपानवायु बिघडवतात.
मैद्यामुळे पाचक स्रावांना पचनयंत्रणेत येण्यास अडथळा होतो, शीतपेयांमुळे पाचकस्रावांची शक्ती कमी होते, कंबरेचा पट्टा कसून बांधण्यामुळे आतड्यांची चलनवलन गती मंदावते, मांसाहार पचण्यास जड असल्याने पाचकस्रावांना पचनास पुरेसा वाव मिळत नाही, घाईने जेवतांना अन्नाबरोबर भरपूर प्रमाणात हवा अन्नमार्गात घेतली जाते, कडधान्य पचनयंत्रणेत जाऊन आंबतात व फसफसतात, जागरणाने शरीराचे बायोलॉजिकल क्लॉक बिघडते. म्हणून अपानाचे संतुलन राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक वापर करावा, कोणत्याही प्रकारचा अतिरेक होत नाही ह्याची खात्री करावी.
मानसिक संतुलन उत्तम असेल तर गर्भ स्थिर राहतो व बिघडल्यास गर्भपात घडतो. स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान होण्यासाठी उभयतांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे महत्वाचे आहे. भीती, चिंता, क्रोध, मानसिक दडपण निर्माण झाल्यास त्याचा पियुशिका ग्रंथींच्या संप्रेरकांवर (हॉर्मोन्सवर) परिणाम होतो. ह्याने प्रजनन क्षमताही कमी होते. औषधी चिकित्सा करतेवेळी हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
औषधी चिकित्सा – (अ) प्रजांकुर नस्य (ब) फलमाह (क) प्रथमाह
वंध्यत्व निराकरण व्हावे, स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान व्हावे, गर्भात दोष राहू नयेत, गर्भस्राव किंवा गर्भपात होऊ नये, गर्भ व गर्भिणीपोषण होऊन सुप्रजनन व्हावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने गर्भस्थापक नस्य, फलसर्पि व मासानुमासिक पाठांची रचना केली आहे. त्यांचा अंतिम परिणाम प्रत्यक्षातही दिसून येतो. ह्यातील प्रत्येक वनस्पतीचा स्वतंत्रपणे सखोल अभ्यास केल्यावर आयुर्वेदाच्या मौलिक खजिन्याचे महत्त्व लक्षात येते. अनेकविध जंतुसंसर्गांच्या संदर्भात एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे वैयक्तिक रोग-प्रतिकार शक्ति. गर्भिणीच्या शरीरातील ही शक्ती, जीवाणू व विषाणूंपासून गर्भाचे रक्षण करते. एकाच प्रकारचे विषाणू किंवा जीवाणू भिन्न शरीरात प्रविष्ट केले असता प्रत्येकाची प्रतिक्रिया निराळी असते. कोणाला रोगाची सौम्य लक्षणे निर्माण होतात तर कोणाला अतिशय तीव्र. म्हणूनच सर्व पाठांमध्ये निरनिराळ्या प्रकारे रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट वनस्पतींचा वापर केलेला आढळतो. काही वनस्पतींमुळे पांढऱ्या पेशी वाढतात तर काही यकृताचे कार्य सुधारतात. काहींनी रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते तर काही पेशी रक्षक (Antioxidant) म्हणून कार्य करतात. काहींनी मूत्रवह संस्थेचे कार्य सुधारते तर काही मज्जा संस्थेला बळ देतात. नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेली जीवन सत्वे, खनिजे, लोह, कॅल्शियम, विविध प्रकारची संप्रेरके ह्या पाठांतील वनस्पतींमध्ये आहेत. थोडक्यात काय तर गर्भ व गर्भिणीच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी एक “अभेद्य सुरक्षा कवच” ह्या पाठांच्या सेवनामुळे प्राप्त होते.
plz send your address