दाम्पत्याने विवाहानंतर किमान तीन वर्ष सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे ह्याला वंध्यत्व म्हणतात. वंध्यत्वाचे वैद्यकीय कारण पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्येही असू शकते. नेमके कारण शोधून त्याची चिकित्सा केल्याने गर्भधारणाहोणे शक्य असते. नेमके कारण लक्षात आले नाही तर मात्र स्त्रीलाच दोषी ठरवून ‘पुनर्विवाह’ करण्याची मानसिकता अजूनही भारतात, विशेषतः अशिक्षित किंवा अति उच्चभ्रू समाजात दिसते.
३१ ते ४० वयोगटातील सुमारे ६३% विवाहित जोडप्यांना वंध्यत्व निवारणासाठी वैद्यकीय चिकित्सेचा आधार घ्यावा लागतो. ज्यामध्ये सुमारे ४१% पुरुषांमध्ये शुक्रबीज दोष तर सुमारे ४०% स्त्रियांमध्ये बीजकोषात साबुदाण्याप्रमाणे लहान कोष तयार होणे (PCOS) हा विकार सापडला. स्त्री वंध्यत्व ही एक फार मोठी समस्या आहे आणि त्यावर आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा वापर करण्याची नितांत गरज आहे असे जाणवते. ह्या लेखात पुरुष व स्त्री वंध्यत्व ह्यापैकी फक्त स्त्री वंध्यत्व हाच विषय केंद्रित केला आहे.
आयुर्वेदात वर्णन केलेल्या ‘ऋतु, क्षेत्र, अम्बु आणि बीज’ ह्या ४ गोष्टी सुस्थितीत असतील तर गर्भधारणा होण्यास बहुदा अडचण येत नाही. आधुनिक वैद्यक शास्त्रात दिलेली वंध्यत्वाची कारणे देखील ह्या चार मध्ये सामावतात असे आपल्या लक्षात येईल.
ऋतु – म्हणजे गर्भधारणेसाठी सुयोग्य काळ. स्त्रीसाठी वय वर्ष १६ पासून पुढे आणि मासिक रजःस्रावाच्या १० व्या दिवसापासून १८ व्या दिवसापर्यंत हा काळ गर्भधारणेसाठी योग्य असतो. म्हणूनच स्त्रीला ह्या काळात ‘ऋतुमती’ म्हणतात.
क्षेत्र – गर्भाशय, बीजवाहिन्या, बीजकोष ह्या सर्व भागांना एकत्रितपणे ‘क्षेत्र’ समजावे. ह्यातील कोणत्याही भागात दोष असेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही.
अम्बु – झाडांच्या वाढीसाठी जसे खतपाणी तसेच गर्भाशयाच्या व गर्भाच्या पोषणासाठी जे जे काही आवश्यक घटक ते सर्व म्हणजेच “अम्बु”. आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन इ. संप्रेरकांचा समतोल असणे येथे अभिप्रेत आहे. ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मिती, रजोनिवृत्ती अशा सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी शरीरातील अन्तःस्रावी ग्रंथींचे कार्य अविरतपणे चालू असते. गर्भावस्थेत ह्यांचा समतोल गर्भाच्या पोषणासाठी अनिवार्य असतो.
बीज – जन्मतः स्त्रीबीजकोषात ठराविक संख्यने सूक्ष्म स्वरुपात स्त्रीबीज दडलेली असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी एक एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरूषबीजाबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. स्त्री व पुरुषबीजे निरोगी असली तरच गर्भधारणा व्यंगरहित घडते, निरोगी व सुदृढ बालक जन्माला येते.
स्त्री वंध्यत्वाची प्रमुख कारणे – आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार :
• अनियमित रजःप्रवृत्ती (Irregular menstruation) किंवा रजःप्रवृत्ती न होणे (Amenorrhea) त्यामुळे स्त्रीबीज परिपक्वता न होणे (Anovulatory cycle) (अम्बु दोष) –
वयाच्या साधारण १३ – १४ व्या वर्षी स्त्रीला प्रथम रजःप्रवृत्ती सुरु होते. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे रजःप्रवृत्तीचे कालचक्र अनियमित होते. मानसिक ताण, आहारातील वैषम्य, हॉर्मोन्सच्या गोळ्या वारंवार घेणे, वजनाचे चढ-उतार, अति श्रम, जीर्ण आजार, केमोथेरपी, क्षकिरणांचा दुष्परिणाम अशा अनेक कारणांमुळे रजःप्रवृत्ती अनियमित होते. कारणांचा विचार करून चिकित्सेची आखणी करावी लागते.
• गर्भाशयातील अंतस्त्वचेला (Endometritis) व बीजवाहिनीला शोथ (Salpingitis) त्यामुळे बीजवहनात अडथळा (Tubal obstruction) (क्षेत्र दोष) –
ट्युबरक्युलोसिस किंवा लैंगिक आजारांमुळे होणारे जंतुसंसर्ग झाल्याने गर्भाशयाच्या व बीजवाहिनीच्या अंतस्त्वचेला सूज येते.
• पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS) (अम्बु विकृतीमुळे झालेला क्षेत्र दोष) –
बीजकोषात साबुदाण्याप्रमाणे कोष तयार होणे – सुमारे ४०% स्त्रियांमध्ये आजकाल हा विकार लहान वयातच झालेला आढळतो. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, चरबी वाढणे, थायरॉइड विकृती, मानसिक ताण, जीर्ण आजार, विद्युत चुंबकीय उपकरणांचा बेसुमार वापर ह्यासारख्या कारणांमुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडणे ही ह्याची प्रमुख कारणे आहेत.
• वंक्षणभागातील अवयवांचा शोथ (PID) (क्षेत्र दोष) –
योनिमार्गात जंतुसंसर्ग झाल्यास गर्भाशय मुखाचे स्राव त्याचे नियंत्रण करण्यास समर्थ असतात. शरीराची एकंदर रोगप्रतिकारक्षमता खालावाल्यास हे जंतुसंक्रमण वंक्षण भागात पसरून शोथ निर्माण करतात.
• गर्भाशय अंतरस्तर अस्थानता (Endometriosis) (क्षेत्र दोष) –
ह्या अवस्थेत स्तराची जाडी वाढते आणि गर्भाशयाच्या आसपास जागा मिळेल त्या ठिकाणी हे स्तर पसरत जातात. त्यामुळे बीजवाहिनीत अडथळा निर्माण होतो व गर्भधारणेला प्रतिबंध होतो.
• गर्भाशयात ग्रंथि होणे (Uterine fibroids) (क्षेत्र दोष) –
ह्या ग्रंथी होण्याचे नेमके कारण अवगत नाही. परंतु ग्रंथी निर्माण झाल्यावर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन संप्रेरकांची वाढ होते वा चिकित्सा करणे कठीण होते.
• बीज परिपक्वता दोष व बीजकोशाला इजा होणे (Anovulatory cycle) (बीजदोष) –
संप्रेरकांच्या संतुलनात, विशेषतः हायपोथॅलॅमसच्या क्रियेत बिघाड झाल्याने बीज परिपक्वता अनियमित होते. ह्याचा परिणाम प्रजनन यंत्रणांवर होऊन वंध्यत्व येते.
plz send your address