भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट 75 अंतर्गंत आयएनएस कलवरी मुंबईतल्या माझगाव बंदरात बांधण्यात आली आहे. फ्रान्सचे नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी या पाणबुडीचे आरेखन केले आहे.
स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे.
या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तिची लांबी 67.5 मीटर तर उंची 12.3 मीटर इतकी आहे. पाण्याचा कमी प्रतिकार व्हावा अशा पध्दतीने या पाणबुडीची विशिष्ट रचना करण्यात आली आहे.
पाणबुडीची युध्दसामग्री सज्जता अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि सेन्सर्सनीयुक्त असून त्यासाठी सबमेरीन टॅक्टीकल इंटीग्रेटेड कॉम्बॅक्ट सिस्टिमने सिध्द करण्यात आली आहे. पाणबुडीच्या आक्रमण आणि शोध परिदर्शकासाठी लो लाईट लेव्हल कॅमेरा आणि लेसर रेंज फाईंडर्सचा उपयोग करण्यात आला आहे. बॅटरी जलद गतीने चार्ज व्हाव्यात यासाठी 1,250 किलोवॅटची दोन डिझेल इंजिनेही या पाणबुडीवर आहेत.
पाणबुडीच्या बोधवाक्यात तीन वेगवेगळया मात्र एकमेकांशी संबंधित बाबींचा समावेश आहे. एव्हर ऑनवर्ड हे बोधवाक्य मिरवणारी ही पाणबुडी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करेपर्यंत न थांबण्यासाठी स्फूर्ती देत असते
आयएनएस कलवरी या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकमध्ये करण्यात आली असून 14 डिसेंबर 2006 मध्ये या कामाची सुरुवात करण्यात आली. पाणबुडीचे पाच वेगवेगळे भाग 30 जुलै 2014 मध्ये एकत्र जोडण्यात आले. बांधकामाचा हा आधुनिक दृष्टिकोन वापरुन बांधण्यात येणारी भारतीय नौदलाची ही पहिली पाणबुडी आहे. तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते 6 एप्रिल 2015 रोजी माझगाव बंदरात ईस्ट यार्डमध्ये ही पाणबुडी आणण्यात आली.
माझगाव डॉकचे तत्कालिन अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक रिअर ॲडमिरल आर. के. श्रावत (निवृत्त) यांच्या पत्नी रितू श्रावत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि अथर्व वेदाच्या मंत्रोच्चारात 27 ऑक्टोबर 2015 ला या पाणबुडीला कलवरी असे नाव देण्यात आले. 1 मे 2016 रोजी कलवरीचे जलावतरण करण्यात आले त्यानंतर या पाणबुडीचे सामर्थ्य सिध्द करण्यासाठी विविध चाचण्या सुरु झाल्या. त्यानंतर ही पाणबुडी 21 सप्टेंबर 2017 ला भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.
याआधीची आयएनएस कलवरी या पहिल्या भारतीय पाणबुडीचे 8 डिसेंबर 1967 रोजी कमांडर के.एस. सुब्रमण्यम यांनी सोविएत रशियाच्या रिगा या किनाऱ्यावर जलावतरण केले. तेव्हापासून हा दिवस भारतीय नौदल पाणबुडी दिन म्हणून साजरा करते. रिगाहून 18 एप्रिल 1968 रोजी कलवरीने प्रवासाला सुरुवात करुन 16 जुलै 1968 रोजी तब्बल 19,000 नॉर्टिकल मैलाचे अंतर कापून ही पाणबुडी विशाखापट्टणममध्ये दाखल झाली. तब्बल तीन दशकांच्या सेवेनंतर 31 मे 1996 ला या पाणबुडीला निरोप देण्यात आला. त्यानंतर विशाखापट्टणम येथे या पाणबुडीवर सागरी संग्रहालय तयार करण्यात आले.
Leave a Reply