उंच-उंच पर्वत आणि आनंददायी, प्रसन्न करणार्या वातावरणाचा मनात केवळ विचार आला तरी शांत वाटू लागते. पर्वतांचे सौंदर्यही असेच काहीसे आहे, जे आपल्याला आकर्षित करते. काही पर्वत, शिखर एवढे सुंदर आहेत की, आपणास त्याचे आकर्षण कायम असते.
संयुक्त राष्ट्र महासभाने २००२ साली संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून घोषित केले आणि ११ डिसेंबर २००३ पासुन ‘इंटरनॅशनल माउंटन डे हा साजरा करण्यात येतो. दरवर्षी तो एका खास थीमसह साजरा केला जातो.
‘माउंटन डे’च्या निमित्ताने नेपाळ सरकारने मंगळवारी ८ डिसेंबर रोजी माउंट एव्हरेस्टची नवीन उंची जाहीर केली.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळून माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच पर्वताची उंची कमी झाल्याची शक्यता काही तज्ज्ञ व्यक्त करत होते. अखेर माउंट एव्हरेस्टची मोजणी करुन नेपाळ सरकारने सध्याची पर्वताची नेमकी उंची जाहीर केली. माउंट एव्हरेस्ट पर्वताची सध्याची नेमकी उंची ८८४८.८६ मीटर आहे. नेपाळ सरकारने मंगळवारी ८ डिसेंबर रोजी ही उंची जाहीर केली.
माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. याआधी १९५४ मध्ये भारताच्या सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेने माउंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. मात्र २०१५ मध्ये झालेला भूकंप तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे माउंट एव्हरेस्टवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त होती. अखेर नेपाळ सरकारने चीनच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने नव्याने माउंट एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजली. या मोहिमेसाठी नेपाळ आणि चीन यांच्यात २०१९ मध्ये एक करार झाला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नेपाळच्या दौऱ्यावर असताना माउंट एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नेपाळ आणि चीन यांच्यात करार झाला. यानंतर उंची मोजण्यात आली.
भारताने १९५४ मध्ये तत्कालीन तंत्रज्ञानाच्या मदतीने माउंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर असल्याचे भारताने जाहीर केले होते. यानंतर चीनसोबत नेपाळने केलेल्या ताज्या मोजणीत माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर असल्याचे लक्षात आले.
माउंट एव्हरेस्टची उंची जाहीर करण्याचा कार्यक्रम नेपाळ आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली (Pradeep Gyawali) यांनी माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी केलेल्या सहकार्याकरिता चीनचे आभार मानले. तसेच नेपाळमुळे माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचे एक ऐतिहासिक काम करण्याची संधी मिळाली म्हणून चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी नेपाळचे आभार मानले. चीन-नेपाळ मैत्री यापुढे आणखी दृढ होईल, असा विश्वास चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply