नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग १ – जंगलाचे प्रकार

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग १ – जंगलाचे प्रकार

महाराष्ट्रात हवामानातील फरकानुसार वनस्पतीमध्येही विविधता आढळते. जंगलांचे प्रमाणही सर्वत्र सारखे नाही. दाट जंगले मुख्यत: सह्याद्री व पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. सह्याद्री पठारी भागाकडे पावसाचे प्रमाण कमी होते व जंगलेही विरळ होतात.

महाराष्ट्रातील वनश्रींचे आढळणारे विविध प्रकार आणि विविधता यांचे अस्तित्व स्थानिक परिसरात असलेली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, जमिनीचा मगदूर, चढउतार, समुद्रसपाटीपासून उंची यांवर अवलंबून असलेले दिसतात. वनश्रीच्या जडणघडणीमध्ये वरील नैसर्गिक व काही अनैसर्गिक कारणांचाही म्हणजे बोगदा जंगलतोड, अनिर्बंध गुराढोरांची चराई, वणवे इ. मोठा भाग असतो. या कारणांमुळे विद्यमान वनश्रींच्या प्रकारात पूर्णपणे आविष्कार झालेली वने फारच क्वचित ठिकाणी, अतिदुर्गम ठिकाणी, अभयारण्यातून अथवा देवरायांतून आढळतात.

जंगले ही दोन प्रकारची असतात – १. नैसर्गिक व २. मुद्दामहुन लावलेली (man made) जंगले

नैसर्गिक जंगले ही दऱ्याखोऱ्यात, डोंगरावर आढळतात. त्यात मानवाचा हस्तक्षेप नसतो. पण सध्या राज्याचे वनविभाग, वृक्ष मित्र, व पर्यावरण संस्था ओसाड जमिनीवर किंवा जेथे चांगली जमीन पडीक आहे व डोंगरउतारावर आहे तेथे वृक्ष लावून ते वाढवतात त्यामुळे वृक्षांची घनता वाढण्यास मदत होते. पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या समोर पंचवटी भागात महाराष्ट्र वन विभागाने रोपे लावून वाढवलेले शंभर हेक्टरावरील जंगल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हा पर्यावरण संतुलित राखण्याचा एक चांगला प्रयत्न आहे.
महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१,९३५ चौ.कि.मी. जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे. महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.

अरण्यांचे वर्गीकरण हे तेथील वार्षिक पर्जन्यमानावर अवलंबून असते. त्यानुसार महाराष्ट्रातील अरण्ये खालील प्रकारात मोडतात.

१. सदाहरित अरण्ये
२. पानझडीची अरण्ये
३. निमसदाहरित अरण्ये
४. खारफुटीची (मॅग्रोव्ह) अरण्ये
५. काटेरी झुडुपांची अरण्ये

१. सदाहरित अरण्ये-

महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य मान असते.

या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, भीमाशंकर, अंबोली, आंबा घाट गगनबावडा, कोयनानगर आलापल्ली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात.

या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरून आढळतात. वृक्षांमध्ये जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजन, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ, गारबी, पळसवेल, वाटोळी, वगैरे अजस्र वेली आढळतात.

 

२. निमसदाहरित अरण्ये-

वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो.

सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असते.

निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, कदंब, शिसम, बिबळा, ऐन हे वृक्ष आढळतात

३. पानझडीची अरण्ये-

सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगा सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. या अरण्यांना मान्सून अरण्येही म्हणतात.

येथील वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से. मी. असते. अशी अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसवी, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन, बांबू, ताड, किकर, वेत, साग, चंदन इत्यादी.

या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टिंबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैराच्या झाडापासून काथ मिळतो.

 

 

४. खारफुटीची (मॅग्रोव्ह) अरण्ये –

यांना भरती-ओहोटीची अरण्ये म्हणतात. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आणि नदीच्या मुखाजवळ लाटा येणार्‍या ठिकाणी आढळतात. यांना पारंब्या लोंबकळतात.

गंगा, गोदावरी, महानदी आणि कृष्णेच्या त्रिभुज प्रदेशात ही अरण्ये आढळतात. महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई जिल्हात समुद्रकिनारी, खाडी व दलदलीच्या ठिकाणी हे वृक्ष दिसतात. अवेसीनिया,ऱ्हिझोफोरा हि त्याची उदाहरणे आहेत.

याठिकाणी सुंदरीची झाडे असल्याने त्याला सुंदर बन म्हणतात. फर्निचर करण्यासाठी या लाकडांचा उपोग करतात.

भारतातील किंबहुना आशिया खंडातील सर्वात मोठे मॅग्रोव्ह अरण्य हे पश्चिम बंगाल मध्ये सुंदरबन येथे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आहे.

५. काटेरी झुडुपांची अरण्ये –

ज्या ठिकाणी 60 ते 75 सें.मी. पाऊस पडतो तेथे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, बळ्ळारी हा कर्नाटकातील प्रदेश, आंध्रातील कर्नूल आणि काडाप्पा इत्यादी प्रदेशात ही अरण्ये आढळतात.

ज्या वनस्पतींची मुळे खोल गेलेली असून काटेरी असतात अशां झुडुपांची येथे वाढ होते.

कोणत्याही अरण्यातील वातावरणात एक विशिष्ट्य प्रकारचा वास (smell) असतो. त्यावरून ते अरण्य कोणत्या प्रकारात मोडते हे अनुभवी शात्रज्ञ लोकांना कळते.

वरील वर्णन केलेल्या पाचही प्रकारच्या अरण्याचा वास हा वेगळा आहे.

 

जंगल व पर्यावरण :

यंदाच्या पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे होते व त्यामुळे एक आगळे महत्त्व होते. तापमानाच्या पातळीत होणारी वाढ, झपाट्याने कमी होणारी जंगले, या साऱ्याचा पृथ्वीवरील एकंदरच सजीवसृष्टीवर दुष्परिणाम होत आहे. हवेतील बदलांमुळे वर्षानुवर्षांचे तालबद्ध ऋतुचक्र आपली लय हरवत आहे की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. आपल्या देशातील पर्जन्यमान बेभरवशाचे होऊ लागले आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवेळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसलाच, परंतु बागायतींचेही मोठे नुकसान झाले. आपले
शेजारी पाकिस्तान आणि नेपाळ यांनाही या बेभरवशाच्या पावसाचा फटका अलीकडच्या काळात बसला आहे. एकीकडे पाऊस-पाण्याबाबतची अनिश्चितता वाढत आहे आणि दुसरीकडे हवाही बदलत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये बदल करावे लागणार आहेत. तापत्या हवामानात तग धरू शकतील अशी वाणे विकसित करण्याचे प्रयोग चालू आहेत.

हवामानातील बदल लक्षात घेऊन विविध धान्यांच्या, फळांच्या, वनस्पतींच्या बियांचा मोठा संग्रह तयार करण्याचे कामही जागतिक पातळीवर सुरू आहे. वाढती कारखानदारी, खाजगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस पडणारी भर, लोकसंख्येचा स्फोट, झपाट्याने होत असलेले शहरीकरण, त्यासाठी तुटणारी जंगले, कमी होणाऱ्या पाणथळ जागा, डिझेल-पेट्रोलच्या साठ्यांमध्ये होणारी घट असे विविध प्रश्न जगातील मुख्यत: अविकसित आणि विकसनशील देशांपुढे उभे ठाकत आहेत. त्यांची तीव्रता कमी करावयाची तर वातावरणात टाकल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करायला हवे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी ऊर्जासोतांचाही विचार होत आहे. परंतु वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जंगले सुरक्षित ठेवणे आता अनिवार्य होत आहे. जगभरात विविध कारणांसाठी दरवर्षी सुमारे साडेतीन कोटी एकरावरील जंगल नष्ट होत आहे. ही चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळेच जंगलांचे रक्षण आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. जंगलांमुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होतेच, परंतु पाणी जमिनीत मुरण्यासाठी, जमिनीची धूप रोखण्यासाठी, जैविक बहुविधता अधिकाधिक संपन्न करण्यासाठीही जंगलेच उपयोगी पडतात. निसर्गाच्या विराट चक्रातील जंगले हा एक घटक आहे आणि तो पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीचा तारक आहे. याचे कारण एकंदर परिसंस्थेचे आरोग्य कायम राखण्यातही जंगले मोलाची भूमिका बजावत असतात. जंगल हा सजीवांचा सखा आहे, त्याचे रक्षण करणे माणसाचे काम आहे, हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केले आहे.

जंगलांचे फायदे

जंगलांचे अनेक फायदे आहेत. जमीन धुपण्यापासून वाचवणे, पुरावर नियंत्रण, हवामानात समतोल आणणे, प्राणी व वनस्पतींची जपणूक करणे हे प्रमुख फायदे होतात. शिवाय इमारत, जळण, फनिर्चरसाठी, घरे शाकारणीसाठी लाकूड, निरनिराळया प्रकारची तेले, खैर, डिंक, काथ्या, मध, लाख इत्यादी अनेक गोष्टी जंगलापासून मिळतात. महाराष्ट्रात लाकूडतोडीचा व्यवसाय कंत्राटदारी पध्दतीने चालतो. आईन, खैर,शिसव, साग, बाभूळ इत्यादी जातीचे लाकूड कठीण असल्यामुळे त्याचा उपयोग इमारतीच्या लाकडासाठी फर्नीचर व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी केला जातो. बाभूळ, चिंच,खैर, हिरडा याचे लाकूड जळण्यासाठी वापरले जाते.

ह्या पुढील लेख मालिकेत आपण वरील सर्व प्रकारच्या अरण्यातील महत्वाच्या व बहुपयोगी वृक्षाची माहिती करून घेणार आहोत.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ:
१. विकिपीडिया (वने)
२. “सतीशकुमार भोसले : महाराष्ट्रातील वने”.. 2018-10-31
३. Sanreiya, K.P. (2017) Forests and forestry of India. National Book Trust, New Delhi, pp. 319
४. Karunakaran, C.K. (2014) The ailing Forests of India. National Book Trust, New Delhi, pp. 328
५. गुगल वरील इतर लेख
६ सर्व फोटो गूगल वरून साभार

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 75 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

3 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग १ – जंगलाचे प्रकार

  1. छान अभ्यासपूर्ण लेख ! पुढच्या लेखामधून अधिक माहिती मिळावी .

  2. I have read the whole article, as you have mentioned in the first type of jungle (thick) we come across this type in, Amba, where we have our plot !

    Your articles gives us nice knowledge
    Thanks

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..