आमच्या लहानपणी ३१ डिसेंबर ला आम्ही सेंट जॉन च्या चर्च मध्ये होणारी रात्रीची प्रार्थना मोठ्या आवडीने न्याहाळत होतो..आमचे क्रिश्चन मित्र आम्हाला मोठ्या प्रेमाने घरी बोलावत असत.
आता खरे सांगतो, आमच्या घरून त्यांच्या घरी जाण्यास आम्हाला थोडासा विरोधच असायचा .आम्ही त्यांच्या घरी जाऊन अभक्ष भक्षण करू कि काय याची घरच्यांना भीती असायची .त्यांचे रिवाज वेगळे ,आपले वेगळे वगैरे ऐकावे लागे .परंतु त्यांची नववर्षाची मध्य रात्री केलेली प्रार्थना …उत्तम कपडे घालून अत्यंत शिस्तीने त्यांचे चर्च मध्ये जाणे.
त्यांच्या घरातून गिटार किंवा मेंडोलीन चे येणारे सूर …घरा समोरील त्यांची चांदणी …अतिशय सौम्य पण आल्हाद दायक केलेले लायटिंग ….सुबक अत्यंत रेखीव घरांचा त्यांचा परिसर हे कुठेतरी मनाला भुरळ पडायचे .खूप आवडायचे .शिस्त हा त्यांचा स्थाई भाव होता.निटनेटके पणा आणि कमालीची शांतता हा त्यांचा स्वभाव होता .वागण्या बोलण्यात उद्दामपणा किंवा आतताई पणा नव्हता.कोलबाड ,चरई,केव्हीला या भागात क्रिश्चन कुटुंबे वर्षानु वर्षे राहत आहेत.माझ्या लहानपणी हा भाग अत्यंत शांत वस्ती असलेला म्हणून ओळखला जात असे.हिंदू आणि क्रिश्चन यांच्या मध्ये वाद किंवा भांडणे झालेली मला आठवत नाहीत.
वसई ला तर क्रिश्चन लोकांची मोठी वस्ती होती .वसई चे क्रिश्चन बागीईतदार होते.अत्यंत अस्खलित मराठी बोलत असत.माझ्या मित्राकडे वसई ला गेल्यावर त्यांनी केलेला पाहुणचार बघून अवघडल्या सारखे होई .त्याची आई अत्यंत शुद्ध मराठी बोलत असे.त्यांच्या घरी मराठी लेखकांची पुस्तके होती .वडील रेल्वेत नोकरीला होते.सुट्टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब शेतात आणि बागेत राबत असे.जसे घर सुंदर तसे त्यांची बाग ही सुंदर होती.कचरा ,घाण याचा लवलेश नव्हता . का कोणास ठाऊक पण मी त्याच्या घरी खूप सुखावून जात असे.
आजही अनेक क्रिश्चन कुटुंबे तो आब बाळगून आहेत.
पूर्वी मला गोव्यात गेल्यावर सुद्धा त्यांचे राहणे ,नीटनेटकेपणा , शांतता आवडत असे .
आणि हिंदू ????
हिंदू धर्मावर केलीली टीका माझ्या मित्रांना आवडणार नाही पण क्रिश्चन नववर्षाची “वाट” आपल्या हिंदू लोकांनीच लावली आहे.आत्ताचा हिंदू समाज धड ना हिंदू धड ना क्रिश्चन असा बेगडी झाला आहे.कुणी हि विकृती आपल्या समाजात घुसवली हे कळत नाही.डी.जे चा धिंगाणा ,बेफाम दारू पिणे ,रस्त्यावर गोंधळ,आणि अनिर्बंध वागणूक हि आजच्या नव हिंदू संस्कृती ची ओळख झाली आहे.हि विकृती अत्यंत वेगाने फोफावत आहे.मिडिया ,व्यापारी ,आणि नैतिकता नसलेले आणि फक्त पैसा हेच सर्वस्व मानणा-या लोकांनी सर्व सण आणि उत्सवाची लक्तरे काढली आहेत.इतर धर्माची लोक हि आपली अधोगती पाहून मनातल्या मनात हसत असतील हे नक्की.
बरे नववर्षा चा गोधळ कमी आहे कि काय म्हणून आपले नवरात्र उत्सव,गणपती उत्सव सुद्धा आपण असेच बेगडी ,पावित्र हीन ,आणि लाज वाटेल असे करून ठेवले आहेत.हि विकृती कोणी आणली ? आपली विचारशक्ती गोठली कि काय ?
हा समाज कसा असा झाला आणि कोणी केला ?
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply