आम्हाला पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला तेव्हा जॅकी श्राॅफची समक्ष भेट झाली. ‘पैंजण’ या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट जाहिरातीबद्दल तो पहिला पुरस्कार होता. रंगभवनला पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यावर ‘हाॅटेल ताज’ला पार्टी असल्याचं समजलं. आम्ही दोघं बाळासाहेब सरपोतदार यांचे सोबत गेलो. ‘ताज’मधील एका प्रशस्त हाॅलमध्ये पुरस्कार विजेते, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व काही सेलेब्रिटी सहभागी झाले होते.
आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही अशा दिमाखदार पार्टीचा अनुभव घेत होतो. तिथं सिनेअभिनेत्री जयश्री टी, तिचे बंधू यांना पाहिले. तेवढ्यात कोट सुटातील जग्गूदादाने हाॅलमध्ये प्रवेश केला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाशी हात मिळवत त्याने ‘हाय, हॅलोऽ’ सुरु केले. काही क्षणातच तो आमच्यापुढे आला. त्याने माझा हात हातात घेतला व ‘हॅलोऽ’ म्हणाला. तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकून घेतलं सारं. असा ‘डाऊन टू अर्थ’ हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार मी अद्याप पाहिलेला नाही. तो पन्नास वर्षांपूर्वीही वाळकेश्वरमध्ये, तीन बत्तीच्या चाळीत रहात असताना तसाच होता, आजही तसाच आहे.
त्याच्या वडिलांना ज्योतिष कळायचं, त्यांनी जग्गूचा हात पाहून जाणलं होतं की, हा पुढे मोठा कलाकार होणार आहे. त्यांच्या वडिलांनी अगदी तरुण वयातच त्याच्या आईशी लग्न केलं होतं. हे दोघे भाऊ व आई-वडील असं चौघे चाळीतली जीवन जगत होते. मोठा भाऊ हेमंत, मित्राला वाचवायला समुद्रात गेला आणि स्वतःच नाहीसा झाला.
परिस्थितीमुळे जग्गू अकरावीनंतर शिकला नाही. छोटीमोठी कामं करीत राहिला. त्याला माॅडेलिंगची ऑफर आली आणि त्याची गाडी रुळावर आली. जाहिरातीमधील फोटो पाहून त्याला देव आनंदच्या ‘स्वामी दादा’ मध्ये छोटा रोल मिळाला.
१९८३ साली सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटानं त्याला शब्दशः हिरो केलं. चित्रपट सुपरडुपर हिट झाल्यामुळे त्याच्याकडे निर्माते रांगा लावू लागले. ‘राम लखन’, ‘कर्मा’, ‘त्रिदेव’, ‘परिंदा’, ‘सौदागर’, ‘गर्दीश’, ‘खलनायक’, ‘१९४२ लव्ह स्टोरी’, ‘१०० डेज’, ‘संगीत’, ‘अग्निसाक्षी’ अशा चित्रपटांमुळे तो सुपरस्टार झाला.
हिंदीतील चित्रपटांसाठी त्याला चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘देवदास’, ‘बाॅर्डर’, ‘रंगीला’ मधील त्यांच्या छोट्या भूमिकाही अविस्मरणीय ठरल्या.
आजपर्यंत त्याने तेरा विविध भाषांतील १५० हून अधिक चित्रपट केलेले आहेत. बालपणीच्या श्रीमंत मैत्रिणीसोबत लग्न करुन संसार थाटला आहे. दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा त्याच्या पावलावर पाऊल टाकत ‘हिरो’ झालेला आहे. त्याने स्वतःची निर्मिती संस्था स्थापन केली आहे.
आज पासष्ठाव्या वयात पदार्पण करताना तो समाधानी आहे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं की, जेव्हा आम्ही छोट्या घरात रहायचो, तेव्हा कुणाला काही झालं तर लगेच कळायचं. मोठ्या घरात राहताना पलिकडच्या खोलीत आई अत्यवस्थ होती, मात्र ते कळलं नाही. जेव्हा कळलं तेव्हा उशीर झालेला होता.
जग्गूदादानं आजपर्यंत मोठ्या भावाच्याच भूमिका अधिक केलेल्या आहेत. तो मोठा भाऊ म्हणून शोभतोही!! मग तो ‘राम लखन’ मधला असो वा ‘परिंदा’ मधील!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१-२-२२.
Leave a Reply