१० जानेवारी १९६४ रोजी भारत वि. इंग्लंड मालिकेतील पहिला कसोटी सामना मद्रासच्या कॉर्पोरेशन स्टेडिअमवर सुरू झालेला होता. भारताचे कर्णधार होते पतौडीचे धाकटे नवाब. त्यांनी नाणेकौल जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि दुसर्या दिवशी ७ बाद ४५७ धावांवर डाव घोषित केला. बुधी कुंदरन १९२, विजय मांजरेकर १०८. फ्रेड टिटमस ५०-१४-११६-५.
दुसर्या दिवस-अखेर इंग्लंडने २ बाद ६३ अशी मजल मारली होती. १२ जानेवारीला (सामन्याच्या तिसर्या दिवशी) दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुणे ४ बाद २३५ पर्यंत पोचलेले होते. १३ जानेवारी या विश्रांतीच्या दिवसानंतर १४ जानेवारीला इंग्लंडचा डाव ३१७ धावांवर संपुष्टात आला. चंदू बोर्डे ६७.४-३०-८८-५. या डावादरम्यान रमेशचंद्र गंगाराम ऊर्फ ‘बापू’ नाडकर्णी या डावखुर्या फिरकीपटूने तब्बल २१ संपूर्ण षटके निर्धाव टाकली ! सलग १३१ चेंडूंवर धाव नाही ! सहा चेंडूंच्या ओव्हर साठी हा विश्वविक्रम होता.डावाअखेरीस त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण होते : ३२-५७-५-०. दुसर्या डावात गोलंदाजी करताना मात्र त्यांनी तब्बल स-हा धावा दिल्या : ६-४-६-२. कर्णधार माईक स्मिथ आणि यष्टीरक्षक जिम पार्क हे दोघे नाडकर्णीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाले.
एका ओव्हर मधील चेंडू१९७९-८० च्या हंगामापासून कसोटी क्रिकेटमध्ये एका ओव्हर मधील चेंडूंच्या बाबतीत एकवाक्यता आली आणि सर्वत्र ‘षटकेच’ फेकली जाऊ लागली. त्याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये ८ चेंडूंची ओव्हर, दक्षिण आफ्रिकेत ५ आणि ८ चेंडूंची ओव्हर, ऑस्ट्रेलियात ४ आणि ८ चेंडूंची ओव्हर तर दस्तुरखुद्द इंग्लंडमध्ये ४, ५ आणि ८ चेंडूंची ओव्हर असे प्रकार अस्तित्वात होते. (सात चेंडूंची ओव्हर मात्र कधी कुठे असल्याचे उल्लेख आढळत नाहीत.)
सलग निर्धाव ओव्हर्स (प्रथमश्रेणी सामने)४ चेंडूंच्या २३ ओव्हर्स : आल्फ्रेड शॉ. १९७६.५ चेंडूंच्या १० ओव्हर्स – अर्नी रॉब्सन. १८९७.६ चेंडूंच्या २१ ओव्हर्स – बापू नाडकर्णी. १९६४.८ चेंडूंच्या
१४ ओव्हर्स – ह्युग टेफिल्ड. १९५६-५७.
ओव्हर या संज्ञेसाठी ‘षटक’ हा शब्द मराठीत वापरला जातो मात्र सहा चेंडूंच्या ओव्हर पुरताच तो अर्थवाही ठरतो. तेव्हा, ओव्हर साठी सर्व अर्थच्छटा दाखवू शकणारा शब्द कुणी सुचवू / शोधू / बनवू शकेल काय?
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply