नवीन लेखन...

जपान देश आणि इथली माणसं ! (जपान वारी)

आजवर कित्ती तरी बाबतीत जपान देशाचं नाव ऐकलंच असेल. जसे औद्योगिक दृष्ट्‍या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक असलेला, उगवत्या सूर्याचा देश. त्याबरोबरच जपानने आजवर भोगलेली भयानक संकटे, इथे होणारे भूकंप, त्सुनामी इथपर्यंत सर्वकाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. हे सारे घेऊन जगणारे हे जपानी आणि  ह्या देशातील काही रंजक अनुभव, मी या जपान विषयीच्या लेखमालेतून लिहिण्याचा प्रयत्न करीन.


Night view from Mount Hakodate

चला जपानची व्हर्चुअल भ्रमंती करूयात ! सुरुवात करतेय जपान देशाच्या उत्तरेकडील भुभागापासून.

मी पाहिलेला होक्काइदो (भाग १)

हाकोदाते

जपान हा देश म्हटलं की डोळ्यासमोर येते आणि सगळ्या जगाला माहिती आहे ते म्हणजे राजधानीचे शहर तोक्यो (Tokyo). मज्जा म्हणजे अगदी सेम जपान मध्ये सुद्धा इंडिया म्हटलं कि या जपानी लोकांना ‘ताजमहाल’ आणि ‘चहा’ या दोन गोष्टीच पटकन आठवतात. (असा माझा तरी अनुभव आहे)

कदाचित म्हणूनच आपल्याकडच्या प्रसिद्ध चहा उत्पादक ब्रँड ने त्यांचं नाव ठेवल असाव तसं… वाह ताज!

असो तर सांगायचा मुद्दा असा की जपान = तोक्यो, क्योतो, हिरोशिमा आणि ओसाका हे समीकरण झालं आहे. हा देश एवढाच मर्यादित नसून इतरही अनेक ठिकाणे ह्या देशाच्या सुंदरतेत भर घालतात. इकडचं हवामान जितक चटकन बदलतं तितकीच सुंदरता! या बदलांमुळेच रोजरोज नवनवीन भासत राहतो हा देश.

आजवर अनेक पुस्तके वाचली असतील, प्रवास वर्णने ऐकली असतील या देशावरची, YouTube तर मिनीटात कुठेही घेवुन जातयं आजकाल. कारण हेच की या देशावर आणि इकडच्या लोकांवरती लिहावं-बोलावं तेवढं कमीच आहे. पण ते सगळं काही असलं तरी प्रत्येकाच्या नजरेतून त्याला आलेला अनुभव, अनुभूतीच म्हणूया हव तर, यात नक्कीच वेगळेपण आढळून येईल. आपण सगळेच सारखा विचार करत नसतो नाही का, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणतात ना, तसं असावं बहुदा.

तर प्रत्येकाच्या नजरेतला हा जपान देश आज मी माझ्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न करतेय…

जपान या देशात 47 prefectures (राज्य म्हणूयात) आहेत. बाकी सविस्तर माहिती Google च्या कृपेने आजकाल एका Click वर उपलब्ध आहे. तर या देशाच्या चार मुख्य भूभागातील एक आहे “होक्काइदो”. “होन्शू” या मुख्य भूभागानंतरचा जपान मधला मोठा भुभाग. जपानच्या नकाशात पाहिलं तर सगळ्यात मोठा प्रदेश दर्शवणारा हा होक्काइदो. ‘जपान मधला स्वर्ग’ म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटू नये इतका इथला निसर्ग सुखावणारा आहे. होक्काइदो ची राजधानी असलेले शहर म्हणजे “साप्पोरो” त्या बद्दल नंतर सविस्तर पाहुया…

या होक्काइदो ला होन्शू (Main land) शी जोडणारा मार्ग म्हणजे…
विमान ?
हो ते तर आहेच! पण, रेल्वे सुद्धा जाते. आता बोला!

एक बोगदा हे काम हाती घेतो आणि तोक्योहून निघालेली शीनकानसेन (bullet train) पार करवतो.
त्याचं नाव “सेइकान टनेल”.  हे जपानी लोक काही पण करू शकतात याच एक उदाहरण !
हा टनेल होन्शू वरील आओमोरी आणि होक्काइदो मधील हाकोदाते या शहरांना जोडतो.
समुद्राच्या पाण्याखालून जाणारी शीनकानसेन आणि रेल्वेची लाईन हेच किती नवल वाटण्यासारखं,जे यांनी शक्य करून दाखवले आहे. हा बोगदा जगातील long underwater tunnel म्हणून प्रसिद्ध आहे. हे सगळं अनुभवत आपण येऊन पोहोचतो, हाकोदाते शहरात.

जपान ने अगदी अलीकडेच हाकोदाते ला शिनकानसेनद्वारे होन्शूशी जोडलं आहे.

होक्काइदो मधील बाकी प्रमुख शहरानंपर्यन्त अद्याप शिनकानसेन पोहोचलेली नसून सध्या ते काम चालू आहे. एक ठिकाणी वाचलं त्यानुसार २०३० पर्यन्त उर्वरित प्रमुख ठिकाणी नेटवर्क वाढवण्यात येणार आहे.

“हाकोदाते शहर” हे बंदर (Port City) म्हणूनही प्रसिद्ध आहे.
शीन-हाकोदाते स्टेशन पर्यंत शिनकानसेन ने प्रवास करून पुढे JR हाकोदाते स्टेशन पर्यंत आपण ट्रेनने किंवा बसने प्रवास करू शकतो.
हाकोदाते शहरात अजून एक विशेष म्हणजे रस्त्यांवर धावणाऱ्या ट्राम्स. दोनच डबे असणाऱ्या या ट्राम्स पण विविध रंगात पाहायला मिळतात.

या शहरातील मी पाहिलेली स्थळे दोन, Mount Hakodate आणि Goryokaku Tower.

दोन्ही JR हाकोदाते स्टेशन पासून काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. गव्हर्नमेंट च्या बसेस अगदी उत्तम सेवा देतात आणि सगळ्या प्रवासी ठिकाणांना जोडतात. त्याची माहिती सुद्धा स्टेशन वरील “मीदोरीनो मादोगूची*” ला मिळते. (*जपान मध्ये बऱ्याच JR रेल्वेस्थानकांवर ही “चौकशी खिडकी” असते जिकडे आगाऊ बुकिंग आणि तिकीट विक्री होते.)

तर आता पाहू पहिले ठिकाण “माऊंट हाकोदाते”. जपानच्या नावलौकिकाला साजेशी उत्तम रचना आणि अजिबात नावं ठेवताच येणार नाही अशी प्रवासी व्यवस्था असलेला Hakodate Ropeway आपल्याला घेऊन जातो Mount Hakodate वरती. साधारणपणे सूर्यास्ताच्या वेळी इकडे जाता आल तर उत्तमच! गार वारा आणि रम्य संध्याकाळ पाहून होणारा आनंद अवर्णनीय!

डोंगरावरून दिसणारा view म्हणजे (Go-Man : God Made + Man Made) मनुष्य आणि नैसर्गिक निर्मिती चा मिलाफ़ आहे असं म्हणू. दोन्ही बाजूला समुद्र आणि मध्ये असणारा एक जमिनीचा भाग, वाळूचे घड्याळ किंवा इंग्रजी अक्षर ‘X’ सारखा दिसणारा तो View जणू सांगत असतो प्रगती करत राहा पण निसर्गाचा अवमान करू नका..
हा View जपान मधील तीन प्रसिद्ध Night Views मध्ये प्रथम स्थानावर आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

View from Goryokaku Tower (Fort and surrounding park star shape)

या नंतर पाहिलेले ठिकाण गोऱ्योकाकू टॉवर (Goryokaku Tower).इकडे गेल्यानंतर, हाकोदाते शहरातून फिरताना अधून मधून डोकावणारा एक मध्यम उंचीचा टॉवर स्पष्ट दिसायला लागतो. त्यामागेच जपानचा एदो काळातील आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक इतिहास सांगणारा एक किल्ला व त्या भोवतालचा सुंदर असा होशी पार्क (होशी म्हणजे स्टार ) आपला स्वागत करण्यास सज्ज असतात.

टॉवर दुमजली असून त्यातल्या एका मजल्यावर नीटनेटकी मांडलेली छोटीछोटी जपानी मावळे मंडळी (Miniatures presenting history ) ठेवलेली आहेत जी ऐतिहासिक प्रसंग आपल्या समोर मांडतात.  दुसऱ्या मजल्यावर शॉपिंग एरिया आहे. टॉवर वरती फिरताना बाजूचे छोटेखानी शहर, ‘स्टार’ सारखा हुबेहूब दिसणारा भव्य पार्क आणि मध्ये असलेला तो किल्ला एका गिरकीत दिसतात.

जपान मध्ये प्रत्येक Tourist Spot ला चालू सिझन नुसार, खास सजावट आणि ‘सिझन विशेष’ असा मामला असतो. सगळीकडे हे दिसून येतं, विक्रीसाठी ठेवलेल्या विविध वस्तूंपासून, खाद्यपदार्थ, सभोवतालचा परिसर सगळंच सिझन विशेष. अगदी कोंबीनी (कॉन्व्हिनिअन्स स्टोअर्स) च्या कॉफी ग्लास पासून ते एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्म पर्यंत सगळ्यात हे सिझन स्पेशल तंत्र असतंच. शिनकानसेन मधील सफाईकामगारांचे युनिफॉर्म सुद्धा याला अपवाद नाहीत. असो, तर तसाच हा गोऱ्योकाकू टॉवर सुद्धा कोणत्याही सिझन मध्ये त्याचं वेगळेपण जपतो. स्प्रिंग मध्ये हा साकुराच्या (चेरीब्लॉसम) गुलाबी रंगात रंगतो तर ऑटम मध्ये लाल आणि पिवळ्या रंगात सजतो, मागून येणाऱ्या थंडी मध्ये शुभ्र बर्फात नटतो.

होक्काइदो ची सुरुवात असणाऱ्या या हाकोदाते शहरात अजूनही बरीच ठिकाणे आहेत, पण वर सांगितलेली दोन नक्कीच पाहावी अशी.

ह्या होक्काइदो ची सफर अशीच चालु ठेऊया, पुढील भागात पाहुयात

होक्काइदोची राजधानी साप्पोरो !

– प्रणाली मराठे 

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..