“जपानला फिरायला जात आहात? का हो?
युरोप वगैरे पाहण्यासारखा आहे म्हणतात. जपानला काय आहे फिरायला?”
असे संवाद कानावर येतात आजकाल! शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी सुद्धा जपानची निवड करताना कित्येक वेळा फेरविचार केला जातो.
हे सगळे असावे कदाचित या जपानच्या क्लिष्ट भाषेमुळे. आपली एक बाराखडी असते पण जपानी भाषेत तर तीन वेगवेगळ्या लिपी आहेत.
तिथे जाऊन भाषा नाही समजली तर काय? अशी एक भीती असतेच नाही म्हणलं तरी.
पण आजकाल ग्लोबल झाले आहेत सगळेच देश, म्हणजेच काय तर इंग्रजी भाषेचा वापर होऊ लागलाय बराच!
जपान किंवा इतर अनेक देशात त्यांनी त्यांची मूळ भाषा अजिबात सोडलेली नाही हे खरंच! परंतु ग्लोबल होण्याच्या मार्गावर जोरदार वाटचाल करत आहेत हे देश. जपानमध्ये शिक्षण आणि नोकरी करिता बऱ्याच ठिकाणी जपानी भाषेचे शिक्षण बंधन कारक असले तरी पर्यटनासाठी नक्कीच जपानचा विचार करता येऊ शकतो.
जपानी भाषेमध्ये जितके नाविन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि या देशातील रहिवाश्यांमध्ये. काही वर्षे जपान मध्ये राहिल्यानंतर, मला आपल्या भारत देशा विषयी जितके प्रेम आणि आपुलकी माझी मातृ भूमी म्हणून वाटते तितकीच सध्याची कर्मभूमि म्हणून जपान बद्दल वाटते. त्यामुळेच ह्या देशाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी ज्या फारशा माहिती नाहीत अशा, आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायला हव्या अशी प्रबळ होत गेली.
खास करून ह्या देशातील अनेक प्रेक्षणीय स्थळे पहिल्यानंतर मला प्रकर्षाने जाणवले. आता लिहूयात!
आजवर कित्ती तरी बाबतीत जपान देशाचं नाव ऐकलंच असेल. जसे औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक असलेला, उगवत्या सूर्याचा देश. येथील नागरीकांबद्दल म्हणाल तर, प्रामाणिक वागणूक असणारे व कामावरच्या अतीव निष्ठेसाठी ओळखले जाणारे हे जपानी नागरीक. त्याबरोबरच जपानने आजवर भोगलेली भयानक संकटे, इथे होणारे भूकंप, त्सुनामी इथपर्यंत सर्वकाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच.
परंतु या सगळ्याच्या पलीकडे मला भावलेली एक गोष्ट म्हणजे इथल्या नागरिकांचे देशाविषयी असलेले प्रेम आणि ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ ही वृत्ती…
हे सारे घेऊन जगणारे हे जपानी आणि ह्या देशातील काही रंजक अनुभव, मी या जपान विषयीच्या लेखमालेतून लिहिण्याचा प्रयत्न करीन.
सुरुवात पर्यटन हा विषय घेऊन करते. यातुन नक्कीच वाचकांना घरबसल्या या देशाची व्हरचुअल भ्रमंती घडेल अशी मी आशा करते.
योई ताबी ओ (आपला प्रवास सुखाचा होवो)…
— प्रणाली भालचंद्र मराठे
Apratim lihilayes