खांदेकरी शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन – अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू नये . दातात भरलेली चांदी मात्र तशीच राहील ; त्याचे श्रेय दंतवैद्याला द्यायला हरकत नाही , बिचारा कायम विनोदाचा विषय झालेला !
दफन झाले तर कीड्यामुंग्यांना मेजवानी आणि झाडांना दर्जेदार खत मिळणार आहे , शिवाय शरीरातला काही भाग सल्फर आणि कार्बनच्या स्वरूपात पंचमहाभूतात विलीन होणार आहे , ही माहितीसुद्धा हाताशी असू द्यावी . बँकेत एवढाच बॅलन्स असू द्यावा की ज्यामुळे वारसांमध्ये भांडणे लागणार नाहीत , मुले एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत , सेवाभावी संस्था मागे लागणार नाहीत ८० – जी चे प्रमाणपत्र घेऊन ! आणि असलीच थोडी प्रॉपर्टी तर मृत्युपत्र करताना मुलाच्या नावे करण्याऐवजी नातवाच्या नावे करावी , म्हणजे नातू सज्ञान होईपर्यंत आपला नालायक मुलगा आपल्याला शिव्या देत , शेवटच्या क्षणी पाणी पाजल्याचा पश्चात्ताप करीत रोज आपली आठवण काढत राहील .
एरवी सर्वत्र पुढे असणाऱ्या पण शेवटी मागे राहणाऱ्या बायकोची काळजी करू नये . बायका वयाने नवऱ्यापेक्षा मोठ्या असण्याची पद्धत आपल्यात नसल्याने बायकांना विधवा करण्याची संधी नवऱ्यांना आयतीच मिळते , त्याला कोण काय करणार ? आणि दररोज लाल टिकली चिकटवून घेणाऱ्या कपाळालाही थोडा चेंज मिळावा यात गैर ते काय ?
अंत्ययात्रेच्या वेळी हसू नये जीवनाची कॉमेडी आठवून आणि बऱ्या – वाईट आठवणींच्या क्षणांची नोंदवही जाता जाता हळूच परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे सटकावे . जन्माला का आलो आणि का मेलो , यासारखे प्रश्न ‘ राम बोलो ‘ च्या डस्टरने पुसून टाकावे मनाच्या पाटीवरून .
गल्लोगल्ली श्रद्धांजलीचे फलक लावण्यासाठी आणि वृत्तपत्रात जाहिराती देण्यासाठी मित्रांना भुर्दंड पडेल , इतकी कीर्ती मिळवू नये . पुतळ्याचेही स्वप्न बाळगू नये . कारण कार्यकर्ते करतील त्याही निधीत भ्रष्टाचार आणि कावळ्यांना मिळेल सार्वजनिक कमोड ! मरताना डोळे मिटलेले असावे , स्वतःच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या वाचायला मिळू नयेत म्हणून आणि तोंड उघडे असू द्यावे सांगायचे बरेच काही राहून गेले पण ऐकून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नव्हता म्हणून .
महागुंगीच्या धुक्यात शिरताना समोर स्टेशनमास्तर भेटावा . त्याच्याकडे चौकशी करावी ‘ पुष्पक विमान ‘ कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते याची आणि वैकुंठाचे तिकीट काढून वाट पाहत बसावे तुकारामाचे आयटेम साँग म्हणतः आम्ही जातो अमुच्या गावा , अमुचा राम राम घ्यावा !
— अविनाश
विनोदी लेख छान.अंत्यसंस्कारापुर्वी दिलेली विनोदात्मक अशी माहीती हसतहसत मनाला हलकेच भिडून जाते.