माग़ील काही काळापासुन जाती-जातीमधला मतभेद व त्यामधुन निर्माण होणाऱ्या तेढाचे प्रमाण वाढतच चालले आहे. आजच्या आधुनिक काळात जेथे आपण जातींच्या पलीकडे जाण्याचा विचार युवा पिढीत रुजवण्याचा प्रयत्न करतो, तेथेच अशा प्रकारच्या वाढत्या प्रकारांमुळे पुन्हा या परिस्थितीचे आज विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजची युवा पिढी या जातीवादी चक्रव्युवात का अडकत चालली आहे याचे सर्वांगीण विश्लेषण होऊन त्यावर उपाय-योजना शोधण्याची जबाबदारी समाजातील जबाबदार व वैचारिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांनी घेण्याची गरज आहे.
सखोल अभ्यासातून असे लक्षात येते कि आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात शर्यतीचे, चढाओढीचे वातावरण आहे. मुख्यतः युवा पिढीच्या खांद्यावर तर सर्वात जास्त बोजा आहे, म्हणजेच शिक्षणातील यशापासून त्यानंतरच्या व्यावसायिक किंवा नोकरीच्या कारकिर्दीतील स्पर्धात्मक विश्वात उभे राहण्याचे मोठे आव्हान आहे. त्या आव्हानाला तोंड देतांना देखील युवकांना सामाजिक तेढात भाग घेण्याचा वेळ कसा उपलब्ध होतो याचे फारच आश्चर्य वाटते. या सर्व गोष्टींच्या मागची काही स्पष्ट कारणे समोर येतात.
सर्वात प्रथम म्हणजे “सोशल मिडिया” या नुसत्या शब्दातच आजचे सगळे विश्व जणू सामावत आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा जातीय तेढाचे मुख्य कारण आहे. प्रत्येक होणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांना जातीशी-धर्माशी जोडून त्याचा “सोशल मिडिया” मार्फत अफाट प्रचार करण्याचा लाजीरवाणा प्रकार जोरात सुरु आहे. तसेच ज्या लोकांना जातीच्या राजकारणातून आपला स्वार्थ साधायचा आहे त्यांच्यासाठी तर “सोशल मिडिया ” एक वरदानच ठरले आहे. अशा या “सोशल मीडियाच्या” माहितीवर आपण किती विश्वास ठेवायचा? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायचा व आपण यातून काय साध्य करणार आहे याचा गांभीर्याने विचार करावा. एखादी अशी पोस्ट किंवा मेसेज पुढे पाठ्वण्यापेक्षा समाजातील कर्तृत्ववान, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विचारवंतांच्या विचारांचा, कार्याचा प्रसार करणे कधीही सर्वांच्या हिताचेच आहे तसेच वैयक्तिक हिताचे देखील आहे कारण त्यातून सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे बरेच काही शिकता येईल.
दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे “बेरोजगारी”. दिवसेंदिवस युवा पिढी महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होऊन बाहेर पडत आहे. परंतु त्यानंतर तेव्हड्या प्रमाणात त्यांना अडकवून ठेवण्यासाठी पुरेसे रोजगार उपलब्ध नाहीत. जर हाच युवा रोजगारात अडकला तर त्याची नकारात्मक विचारांकडे ओढ जाण्याची शक्यता कमी होईल. सतत कर्तृत्व करण्याच्या प्रयत्नांतून त्याचा वैयक्तिक विकास होईल व विचारांना चालना मिळेल.
तिसरे सर्वात मोठे कारण म्हणजे “राजकारणी कृत्यांमागचा हेतू समजून घेण्याची विवेकबुद्धी नसणे”. “राजकारण ” हा विषय आणि याची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळेच पुरेपूर अभ्यास न करता एखाद्या नेत्याला व त्याच्या विचारांना डोळे झाकून अंगीकारणे व त्याचा शब्द अखेरचा शब्द समजून कृत्य करणे यामुळे आपण आपल्या बुद्धीचा वापर कधी करणार हा प्रश्न पडतो. राजकारणात आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी नेहमीच चढाओढ असते यातूनच अनेक चांगल्या विचारांचा तसेच वाईट विचारांचा देखील उगम होतो. “जातियवाद” हा राजकीय हेतू साधण्यासाठी सर्वात सोपा मार्ग असतो याची कल्पना युवापिढीने ठेवली पाहिजेल. राजकारणी व्यक्ती आपला वापर जातीवाद निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न तर करत नाही..याचे आपल्याला भान हवे.
जातीय तेढामध्ये कधीच कोणता एक समाज पूर्णपणे सामील नसतो, त्यामध्ये देखील विविध मतभेद असतात. त्यामुळे कोणा एका समाजाला वा जातीला पूर्णपणे दोष देण्याचा अधिकार कुणालाही नाही. दोष देयचाच असेल तर त्या समाज कंठकांना दिला पाहिजेल जे असल्या कृत्यांना चिथावणी देतात. आजची युवा पिढी मनात आणले तर सर्व थांबवू शकते. फक्त खुल्या विचारांनी व आपल्या ज्ञानाचा व बुद्धीचा योग्य वापर करून यावर मात करण्याची गरज आहे. एकदा सर्वांनी शांत बसून विचार करा कि “आपल्याकडे करण्यासाठी दुसरे काहीच नाही का ?” “फक्त जातियवाद उरला आहे का?” यातून मिळणाऱ्या उत्तराने स्वतःच आपली दिशा ठरवा.
— विवेक विजय रणदिवे
सर्वांना विचार करायला लावणारा लेख..