संगीताची तालीम जयमाला शिलेदार यांनी गोविंदराव टेंबे यांच्याकडून घेतली. टेंबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेषांतर’ या नाटकामधून शिलेदार यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर आपल्या अभिनय आणि गायनानं रंगभूमी गाजवून सोडली. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९२६ रोजी झाला. प्रमिला जाधव हे त्यांचं माहेरचं नाव.
संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट बालगंधर्व यांच्याबरोबर भूमिका केल्याने गंधर्वसुरांची शिलेदारी जतन करणारी गायिका अशीच जयमाला शिलेदार यांची ओळख होती. ‘शाकुंतल’ नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्याबरोबर काम केलं आणि त्यानंतर हे दोघं विवाहबद्ध झाले. विवाहानंतर या दोघांनीही आपल्याला संगीत रंगभूमीसाठी वाहून घेतलं. या दोघांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ आदी नाटकांची निर्मिती केली.
१९६२ मध्ये संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली. जयमाला शिलेदार यांनी ४६ संगीत नाटकांमध्ये ५२ भूमिका रंगभूमीवर साकारल्या, तर १६ नाटकांचे संगीतदिग्दर्शन केले. सलग २५ वर्षे नायिकेच्या भूमिकेत कार्यरत असल्याबद्दल १९७६ मध्ये त्यांचा सत्कार झाला होता. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षांत १९८७ मध्ये सव्वाशेहून अधिक संगीत नाटय़प्रयोग सादर करून त्यांनी बालगंधर्वाना अभिवादन केले. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर २१ वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी संस्थेची धुरा पेलली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत १२ वेगवेगळय़ा नाटकांचे ५० प्रयोग करण्यात आले.
नाटकांच्या निर्मितीबरोबरच जयमाला शिलेदार यांनी त्या काळातील बहुतेक सर्व गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये काम केलं. ‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’ आदी नाटके त्यांनी गाजविली होती. रसिकांच्या प्रेमाबरोबरच विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
बालगंधर्वांच्या चाहत्या असणार्याय जयमालाबाईंना त्यांच्या नावाचा पुरस्कार तब्बल तीन वेळा मिळाला होता. २००६ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला होता. २००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमतानं निवड झाली होती. जयमाला शिलेदार यांचे ८ ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply