लवकरच दोन वर्षे पूर्ण होताहेत – ” बडी सुनी सुनी हैं , ज़िन्दगी ये ज़िन्दगी ” हे गाणं सतत दुःखाच्या, अनामिक भीतीच्या पहाऱ्यात गुणगुणून ! कोठल्या तरी उदास,बेबस क्षणांवर एका अदृश्य विषाणूने आपले नांव कोरले आणि जीवनाचे प्रवाह जणू गोठले. पानिपतासारखे याही लढ्यात किती मोती गळाले, खुर्दा नष्ट झाला याचा हिशेब सारेजण आपापल्या परीने लावताहेत. पण वर्षांच्या ,क्षणांच्या, श्वासांच्या भाषेत किती नुकसान झाले याची गणती नाही. आमचा अमिताभ “रोटी कपडा —- ” मध्ये म्हणतो तसे- ” आयुष्यात गमावलेल्या गोष्टींची भरपाई रूपये /पैसे चलनातून होत नसते.” जगण्याचे हिशेब वेगळे असतात.
केव्हा तरी सकाळ होऊन जीवनाला हाकारता यावे – ” ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना !”
उगाच रुसून गेलेल्या, आपली चूक नसताही दुरावलेल्या जीवनाला नव्याने आवतण द्यायला हवे- बघ सगळं सहन करूनही,झालेल्या मोडतोडीने खोलवर दुखावून, व्रण मिरवत आम्हीं डगमगत्या पावलांवर उभे आहोत.
उघडू या सताड दारे, आणि जाऊ या एकमेकांच्या घरी दारावर टकटक न करता बेधडक ! समुद्राच्या लाटांना भेटून खूप काळ लोटलाय. काहीबाही ठरवलेलं असंच विस्कटून गेलंय. दिवाभीतासारखी निर्बंधांच्या काचात जखडलेली ज़िन्दगी जरा मोकळी करू या. भिंती,छत साऱ्यांना त्यागून भेटू या जीवनाला-त्याच्या आणि आपल्याही स्वतःच्या, हक्काच्या घरात ! आणि उन्हात हिंडूनही युगं झालीत,किती राहायचं घराच्या उबदार गोधडीसारख्या सावलीत ?
पुन्हा एकदा दारावर ” प्रेम ” अशी स्वागताची पाटी लावू या. घरात नव्याने शिरलेल्या ज़िन्दगी चे इतमामात स्वागत करू या, पुन्हा तिला गृहीत धरण्याची चूक करणार नाही अशी ग्वाही देऊ या कान पकडत हवी तर आणि इतके दिवस जगापासून, स्वतःपासून दडविलेले अश्रू तिच्या ओंजळीत मनसोक्त सांडू या.
ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना I
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply