नवीन लेखन...

जिया बेकरार है……हसरत जयपुरी

शिवाजी, इक्बाल आणि बद्रुद्दीन या तिघांमध्ये काय साम्य असू शकेल?….. बरोबर…काहीच नाही. सर्वत्र आढळणारी सर्वमान्य नावे वगळता यात काहीच साम्य नाही….. मग शिवाजी गायकवाड, ईक्बाल हुसेन आणि बद्रुद्दीन काझी …याच्यांत काय साम्य असेल ? याचे उत्तर मात्र अनेकजण देवू शकतात. कारण ही तिनही नावं चित्रपट क्षेत्रात येऊन नंतर प्रसिद्धी मिळालेल्या प्रतिभावंताची आहेत… शिवाजी गायकवाड अर्थात् रजनीकांत आणि बद्रुद्दीन काझी अर्थात जॉनी वॉकर हे दोघेही सतत पडद्यावर दिसणारे अभिनेते असल्यामुळे सर्वांनाच परिचित आहेत. मात्र ईक्बाल हुसेन यानां ओळखणारे कमीच….

चित्रपट हा मुळात अनेक कलांचे एकत्रीकरण असलेला एक सजवलेला छानसा गुलदस्ताच. या गुलदस्त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतात ती अनेक रंगीबेरंगी सुंदर फुलं. नतंर लक्ष जाते आकर्षक पद्धतीने रचलेल्या पानांकडे. मात्र हा गुलदस्ता सजविण्यासाठी एक मूळ फ्रेम तयार करावी लागते जी या गुलदस्त्यात कुठेच दिसत नाही…यातील फुले म्हणजे मुख्य अभिनेते व अभिनेत्री, पाने म्हणजे सह कलाकार…हे दोन्ही घटक पडद्यावर आम्ही बघत असल्यामुळे लक्षात राहतात व लवकर ओळख होते. यातील गुलदस्त्याची मूळ फ्रेम म्हणजे पडद्या मागचे साहित्यीक, कलावंत व तंत्रज्ञ…..ज्यांची फक्त नावं आम्ही ऐकून असतो….प्रत्यक्षात आभावानेच दिसतात. या सर्वांना आपल्या कामाद्वारेच स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागते….दुसरा कोणताच पर्याय नाही…………..त्यामुळे इक्बाल हुसेन पटकन् आमच्या स्मरणात येत नाही.

वर मी ज्या शिवाजी, इक्बाल आणि बद्रुद्दीन मधील साम्या बद्दल बोललो ते हे की हे तिघेही चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी बस कंडक्टर होते. पैकी दोघे तर आम्हाला माहित आहेतच. आज मी तिसऱ्या विषयी अर्थात् ईक्बाल हुसेन विषयी सांगणार आहे. १५ एप्रिल १९१८ रोजी जयपूर येथे जन्मलेल्या ईक्बालचे आजोबा फिदा हुसेन एक नामवंत शायर होते. शायरीचा हा ठेवा ईक्बालला लहानपणीच मिळाला. ही शायरी नावाची खुबसुरत बला भारी चंचल. अगदी प्रेयसी सारखी… ती एका जागी टिकणे तसे अवघडच…मात्र हे सूत्र इक्बालला फार लवकर समजले. या प्रेयसीला इक्बालने आयुष्यभर आपल्या जवळ जखडून ठेवले. मात्र यासाठी भरपूर सायास करावे लागले…… अगदी स्वत:च्या इक्बाल हुसेन या नावाचा त्याग करून “हसरत जयपूरी” हे नाव धारण करावे लागले………………

इक्बाल माध्यमिक स्तरापर्यंत इंग्रजीतच शिकला. नतंर मात्र उर्दू आणि फारसी भाषेत तालीम घेतली. विशीत पोहचे पर्यंत लिखाणही करू लागला. या वयाचा आग्रह म्हणून शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमातही पडला. राधा हे तिचे नाव….नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे भीन्न धर्माची असल्यामुळे भावना व्यक्त करणेही अवघड…..मग या पठ्ठ्यानं एक प्रेम पत्र लिहलं. हे प्रेमपत्र राधाला पोहचलं की नाही माहित नाही मात्र चित्रपटसृष्टीतल्या एका प्रतिभावंत अभिनेता दिग्दर्शकाच्या हाती पडलं आणि त्याचं सोनं झालं….हे प्रेमपत्र आजही धूमशान करतं………….

हसरत म्हणजे हार्दीक ईच्छा, कामना, लालसा, अरमान…..या सर्व स्वप्नांचे गाठोडे घेऊन इक्बाल हुसेन १९४० मध्ये मुंबईला आला खरा पण हे गाठोडं टेकवायचं कुठे? सांभाळायचं कसं? हे ओझं हलकं कसं करायचं? एक ना दोन प्रश्न..शायर झाला म्हणून काय झालं? वहीच्या पानांच्या भाकरी नाही थापता येत…आणि शाईची दालही नाही होत……..मग !!!! नोकरी मिळाली. बस कंडक्टरची. महिना पगार ११ रूपये.  जवळपास आठ वर्ष ही नोकरी केली. नंतर आपल्या प्रत्येक मुलाखतीत इक्बाल आपल्या या नोकरीचा आवर्जुन उल्लेख करीत. दिवसभर बसची रटाळ घंटी वाजावायची आणि रात्री रसाळ शायरी करायची. दिवसभर या बसप्रवाशांत ते आपल्या राधेचा चेहरा शोधत असत. मग रात्री त्यांची राधा कधी गझल तर कधी कवितेच्या रूपात त्यानां शब्दांचा नजराना देऊन जाई.

मुशायरा हा हसरतचा जीव की प्राण. खरं तर चित्रपट गीते लिहण्यापूर्वी ते एक मुक्कमल शायर होते. अशा मुशायऱ्यानां आवर्जुन उपस्थित राहणारी चित्रपट दुनियेतली एक नामवंत हस्ती म्हणजे पृथ्वीराज कपूर. गीतकार, लेखक हेरण्यात ते पटाईतच होते. स्वत: १५० कलावंताचा ताफा घेऊन भारतभर आपल्या नाटकांचे प्रयोग करीत असत. त्यांनी हसरत यांची एका मुशायऱ्यात “मजदूर की लाश’’ ही कविता ऐकली आणि प्रचंड प्रभावित झाले. त्यांनी हसरतला पृथ्वी थिएटरला येण्याचे आमत्रंण दिले व राज कपूरची भेट घडवून दिली. राज कपूर तेव्हा आपल्या दुसरा चित्रपट “बरसात” च्या तयारीत मग्न होते. हसरत यांनी आपले एक गीत “मैं बाजारों की नटखट रानी”  त्यानां ऐकवले आणि राज कपूरला संगीताच्या सुरातला एक सूर मिळाला. लताबाई, मुकेश, शैलेंद्र, शंकर जयकिशन, राघू कर्मकार (छायाचित्रकार) आणि अल्लाऊद्दीन (ध्वनी संकलक) असे सातही सूर आरके नावाच्या गुहेत जमा झाले आणि एका अनोख्या पर्वाची सुरूवात झाली…या सातहीजणानां वेगळे केले ते मृत्यूनेच…..

राज कपूरने हसरतला १५० रू. प्रति महिना वेतनावर रूजू करून घेतले. बस कंडक्टरचे रूपये ११ प्रतिमाह वेतना वरून चक्क १५० रूपये महिना…!!!! १४ पट वाढ… हसरतने शायरीचा हात गच्च धरून ठेवला त्याचेच हे फळ होते…शंकर जयकिशन यांनी एक धून हसरतला ऐकवली व यावर शब्द बांधायला सांगितले. त्या धूनमधले शब्द काहीसे असे होते- “अंबुआ का पेड़ है वहीं मुंडेर है आजा मेरे बालमा काहे की देर है” मग हसरतने लिहले- “जिया बेकरार है छाई बहार है आजा मेरे बालमा तेरा इंतजार है”  १९४९ मध्ये बरसात प्रदर्शीत झाला आणि हे गाणे प्रत्येकाच्या ओठावर आले. या शिवाय छोड गए बालम (हसरतचे पहिले द्वंद्व गीत), बिछडे हुए परदेसी, हवा मे उडता जाए, मुझे किसीसे प्यार हो गया, मेरी आंखोमे बस गया कोई रे, अब मेरा कौन सहारा…………अशी हसरतची सर्वच्या सर्व गाणी तुफान गाजली. दिवसभर सिटी बसची किरकिरी बेल वाजवणारा हसरत एका रात्रीत प्रेक्षकांच्या हृदयातील तारा छेडू लागला. बरसात ही एक प्रेमकथा …..स्वत: हसरत आपली प्रेयसी जयपूरला ठेवून मुंबईत आला खरा पण त्याच्या रोमारोमात ती होती आणि लेखणीद्वारे झरतही राहिली………… आयुष्यभर…………………

हसरतच्या लेखणीतून प्रेमाच्या विविध छटा असणारी शेकडो गाणी सहजपणे उतरत असत. सोबत शैलेंद्र सारखा प्रतिभावान गीतकार असल्यामुळे गीत, गजल, नज्मची एकावर वरचढ एक दौलतजादा प्रेक्षकांवर उधळली जाई. १९७१ पर्यंत हसरत यांनी शैलेंद्र सोबत राजकपूरच्या सर्व चित्रपटातील गीते लिहली. बरसात नंतर राज कपूरचा “आवारा” १९५१ मध्ये प्रदर्शीत झाला.यातील हम तुझसे मोहब्बत करके सनम (मुकेश), एक बेवफासे प्यार किया, अब रात गुजरनेवाली है, जबसे बलम घर आए (लता) ही सर्व विरह गीते हसरतची. बाकीची शैलेंद्रची. १९५३ मधील “आह” तील जाने ना नजर, आजारे अब मेरा दिल पुकारा….ही गाणी आजही मनात रूंजी घालतात. नतंर आला श्री ४२०. यातील – “ईचक दाना बिचक दाना’’, “ओ जानेवाले” आणि “शाम गयी रात आयी’’ ही तीन गाणी हसरतची.

उर्दूत एहसानमंद आणि गैरतमंद असे दोन शब्द आहेत. ज्याचा अर्थ आहे  उपकाराची जाण ठेवणारा व अत्यंत विनयशील. या दोन्ही गूणांचा एकत्रीत संगम म्हणजे हसरत जयपूरी. जयपूरच्या आपल्या बालपणीच्या मित्रांची व राज कपूर यांच्याशी त्यांनी कधीच प्रतारणा केली नाही. बालपणीच्या मित्रांनी हसरतला मुंबईस जाण्यासाठी हरप्रकारे मदत केली होती. अगदी चपलेपासून कपडे घेण्या पर्यंत. या उपकाराची जाण हसरतने योग्यवेळी या शब्दात मांडली आहे-

“यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया
सौ बार शुक्रिया अरे सौ बार शुक्रिया
बचपन तुम्हारे साथ गुज़ारा है दोस्तो
ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ‘’

सुनील दत्त या अभिनेत्यावर चित्रीत झालेले “गबन’’ या चित्रपटाचे हे गाणे आजही मित्रांचे ऋण स्मरण्यासाठी ओठी येते. हसरतच्या विनयशीलतेचा आणखी एक किस्सा म्हणजे राज कपूरनी आपल्या मृत्यूपूर्वी त्यांच्यासाठी निर्धारीत केलेले ५००० हजार रूपयांची प्रतीमाह वेतन त्यांनी नम्रपणे नाकारले.

चित्रपट गीत लिहण्यापूर्वीच्या हसरत यांच्या अनेक गजल आणि शायरी नंतर चित्रपटात वापरण्यात आल्या. शंकर जयकिशन इतर बॅनर्सच्या चित्रपटासाठी हसरत आणि शैलेंद्र यांच्यासाठी आग्रह करीत असत. त्यामुळे आरके बॅनर शिवायही त्यांची अनेक गीते प्रचंड लोकप्रिय झाली…..

तक़दीर का फसाना जाकर किसे सुनाएँ
इस दिल में जल रही हैं अरमान की चिताएँ ….ही गजल शांताराम बापूच्या “सेहरा” चित्रपटात सामावली गेली… रफी साहबने अप्रतिम गायले आहे. हसरत यांची राधा यातल्या प्रत्येक ओळीत स्पष्ट दिसते. शांताराम बापूचा आणख् एक सुपर हिट संगीतमय चित्रपट म्हणजे “झनक झनक पायल बाजे’’….. संपूर्णत: भारतीय शास्त्रीय नृत्य व संगीतावर आधारलेल्या या चित्रपटातील प्रासादिक गीते भरत व्यास यांनी लिहली असावीत असाच माझा समज होता पण ही गाणी हसरत यांनी लिहली आहेत.

उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गए ( “झुक गया आस्मान”), इस रंग बदलती दुनिया में, इंसान की नीयत ठीक नहीं (राजकुमार), इब्तिदा-ए-इश्क़ में हम सारी रात जागे,  अल्ला जाने क्या होगा आगे (मनोज कुमारचा हरीयाली और रास्ता), इक बुत बनाऊँगा तेरा और पूजा करूँगा (देवानंदचा  असली नकली), तेरे घर के सामने  इक घर बनाऊंगा ( तेरे घर के सामने),  तुमको हमारी उमर लग जाए, तुम कमसीन हो नादा हो,(आयी मिलन की बेला), आवाज देके हमे ना बुलाओ (प्रोफेसर), तेरी प्यारी प्यारी सुरत को (राजेंद्रकूमारचा ससूराल), तेरे खयालो मे हम (गीत गाया पत्थरोंने), ऐहसान तेरा होगा मुझा पर (जंगली), तुम मुझे यूँ भूला न पाओगे (पगला कही का), सायोनारा सायोनारा (लव्ह इन टोकियो), सून सायबा सून (राम तेरी गंगा मैली), उनके ख्याल आए तो (लाल पत्थर), मै रंगीला प्यार का राही (छोटी बहन)….. नजर बचा के चले गए वो (दिल तेरा दिवाना), मस्ती भरा है समा..(परवरीश), यातल्या प्रत्येक गाण्यात प्रेमाची विविध रूपं आहेत.

राज कपूरचे कोणतेही चित्रपट असोत ती एक प्रेम कहानीच असे. आपल्या प्रत्येक नायिकेच्या प्रेमात पडल्या शिवाय त्यात जीवंतपणा येणार नाही असेच त्यानां वाटत असे. त्यामुळे गाणी लिहून घेतानां ते गीतकारांच्या अतंरंगात खोलवर जाऊन तिथून शब्दांचे मोती भरून आणत. राज कपूरला १९४० च्या दरम्यान “घरोंदा” या नावाने दिलिपकुमार व नर्गीसला घेऊन करायचा होता. पण ते जमले नाही. मग १९६४ मध्ये हा चित्रपट “संगम” या नावाने प्रदर्शीत झाला. राजकपूरचा हा पहिला रंगीत चित्रपट. चित्रपटाची लांबीही भरपूर. दोन मध्यातंर असायचे. स्विझरलँड, युरोपात यातील बराच भाग चित्रीत झाला. यातील संगीत म्हणजे अफाट ग्रँजर..आजही ते ऐकताना आजही प्रत्यय येतो. हसरत यांची राधा राजकपूरनी आपल्या चित्रपटात आणली. नायिकेचे नावच राधा होते. हसरत यांनी आपल्या राधासाठी फक्त १० ओळीचं एक प्रेम पत्र लिहले होते…-

मेहरबां लिखूँ, हसीना लिखूँ या दिलरुबा लिखूँ

हैरान हूँ की आपको इस खत में क्या लिखूँ?

ये मेरा प्रेम पत्र पढ़कर के तुम नाराज़ ना होना

कि तुम मेरी ज़िन्दगी हो, की तुम मेरी बंदगी हो…

…..एकदम सुटसुटीत व सोपी शब्द रचना…जोडाक्षरही नाहीत. या सर्व ओळी आजच्या पिढीतही लोकप्रिय आहेत. हे गाणे संगीतकार शंकर जयकिशन यांनी आपली सर्व प्रतिभा पणाला लाऊन  तयार केले व राजकपूर यांनी ते तितकेच प्रत्ययकारीपणे चित्रीत केले. या गाण्यापूर्वीचा वाद्यमेळ म्हणजे वादकांचा एक अविस्मरणीय अविष्कार……हसरत यांनी या गाण्यात इतके साधे शब्द वापरले आहेत की ते आपण आजही दररोजच्या व्यवहारात वापरत असतो. १९६४ च्या बीनाका गीत मालेतील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची गाणी संगम या चित्रपटाची होती. पहिल्या क्रमासंकावर होते शैलेंद्रचे-“ मेरे मन की गंगा” व दुसऱ्या क्रमांकावर होते हसरतचे – “ये मेरा प्रेम पत्र पढकर”….राज कपूरनी आपल्या सोबतच्या अनेक सहकारी मित्रांचे ऋण असे वेगळ्या प्रकारे निर्देशीत केले. स्वत: शैलेंद्र यानी “तिसरी कसम”या स्वत:च्या चित्रपटासाठी हसरत यानां गाणी लिहण्यासाठी बोलावले.  यातील लता मंगेशकर यांचे  “मारे गए गुलफाम” आणि दुनिया बनानेवाले…(असे ऐकीवात आहे की या गाण्याचा मुखडा मजरूह सुलतानपुरी यानी लिहला व अंतरे हसरत यानी पूर्ण केले) ही गाणी हसरत यांनी लिहले.

हसरत जयपूरी आपले विशीतील प्रेम कधीच विसरू शकले नाही.  “ आए बहार बन के लुभा कर चले गए, क्या राज़ था जो दिल में छुपा कर चले गए…ही अप्रतिम गजल कशी विसरता येईल. तसेच ‘’चल मेरे साथ ही चल ऐ मेरी जान-ए-ग़ज़ल ‘’ आपल्या राधेला ते गजलच्या रूपाने सोबतच घेऊन् आले होते. ते आपल्या अनेक मुलाखतीत सांगत-

“It is not at all necessary that a Muslim boy must fall in love only with a Muslim girl. My love was silent, but I wrote a poem for her, ‘Yeh mera prem patra padh kar, ke tum naaraaz na hona.”  आपल्या पत्नीचा सुंदर चेहरा बघून त्यानां- “तेरी प्यारी प्यारी सुरत को”…हे गाणे सुचले तर ते एकदा पॅरीसला गेले असताना चमकणारी जरीची साडी परीधान केलेल्या एका सुंदर भारतीय स्त्रीला बघून “बदन पे सितारे लपेटते हुए….”सुचलं.

हसरत जयपूरी यांच्या शायरीत भलेही साहिर सारखी गहनता नसेल किंवा कैफ आझमी वा फैज सारखी खोली. शकील बदायुनी वा राजा मेंहदी अली खाँ सारखे नजाकत बोली पण मनाला आकर्षून घेणारे सहज सुंदर शब्दांचा टवटवीतपणा नक्कीच असे… “आजा सनम मधूर चांदनी हम ..” म्हणताना सोबत तू असली की वाळवंटातही चांदणे फुलू शकते, हा वच विचार मनात येतो. “अजी रूठ कर अब कहाँ जाईएगा….” ही भावना खरं तर अशा सर्वच नाते संबंधासाठी आहे जिथे प्रेमाचे झरे खोल पर्यंत पाझरलेले असतात….याच गीतात पूढे हसरत म्हणतात-

निगाहों से छुपकर दिखाओ तो जाने
ख़यालों में भी तुम ना आओ तो जाने
अजी लाख परदों में छुप जाइएगा
नज़र आईयेगा, नज़र आइएगा…………….जणू काही एक गुलाबी आव्हानच ते देतात. तर एका गीतात रूसण्यापूर्वीच इशारा देत म्हणतात-

देखो रूठा ना करो, बात नज़रों की सुनो
हम न बोलेंगे कभी, तुम सताया ना करो
देखो रूठा ना करो….. नूतन आणि देवानंद या जोडीवर चित्रीत झालेले हे गीत म्हणजे हलक्या हाताने रेशमी रूमालावर काढलेला कशीदाच आहे. यात  एका ठिकाणी नायिका म्हणते-

जान पर मेरी बनी, आपकी ठहरी हंसी
हाय मैं जान गई, प्यार की फितनागरी……यातील शेवटचा शब्द “फितनागरी”  मजेशीर आहे. “फितना” हा मूळ अरबी शब्द. याचा अर्थ अचानक होणारा उपद्रव किंवा दंगा….प्रेमात कधी काय होईल याची शाश्वतीच नाही हे किती सुंदर पद्धतीनं सांगितलयं……….मानवी हृदय म्हणजे रूंजी घालणारा भ्रमर… सतत फुलां भोवती सतत भूणभूणणारा….मग ते सहजपणे लिहून जातात- “दिल का भंवर करे पुकार,  प्यार का राग सुनो रे “  शायर वा कवींना स्त्रीच्या काळ्याभोर व लांब केसांचे जाम आकर्षण. त्यानां कधी काय सुचेल नाही सांगता येत. हसरत एका गीतात म्हणतात-

तेरी ज़ुल्फ़ों से जुदाई तो नहीं माँगी थी
क़ैद माँगी थी, रिहाई तो नहीं माँगी थी ………………

केशसंभार म्हणजे प्रचंड गुंतागुंतीचे धूंद करणारे जाळे. अशा जाळ्यातुन सुटका नाही तर कैद हवी अशी अजब ईच्छा आहे….तर एका ठिकाणी –

“सौ साल पहले, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा …”

असे ठणकावून सांगतात. मागच्या आणि पूढच्या जन्मी तूच आहेस म्हणून दादागिरी करतात. तर कधी “तूम रूठी रहो मै मनाता रहू” अशीही विनवनी करतात. आरजू चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय आहेत.  मात्र यातील प्रेमी जीवानां धूंद करणारे गीत म्हणजे-

छलके तेरी आँखों से शराब और ज़ियादा
खिलते रहें होंठों के गुलाब और ज़ियादा…………..

खूप कलाकुसर न करता शब्दातुन सहज भाव  प्रकट करणे ही त्यांची खासियतच होती. रूमानियत हा त्यांच्या स्वभावाचा एक गुण विशेष असल्यामुळे तारूण्य सुलभ प्रेमातील अवखळ रंग ते सहज भरू शकले. आता हेच बघा-

ये चांद खिला, ये तारे हंसे  ये रात अजब मतवाली है

समझनेवाले समझ गए है, ना समझे वो अनाडी है…………..राज कपूरचा निष्पाप बोलका चेहरा अन् नूतनचे सोज्वळ सात्वीक सौंदर्य या गाण्यात अप्रतिम खुलून येते.

विशिष्ट अशा कुठल्याच प्रवाहात अडकून न पडता वा वाहून न जाता हसरत शब्दानां एखाद्या कुंभारा सारखा घडवित असे व नवनवीन प्रयोगही करत असत. लोक कथेतील अनेक धागे पकडून ते सहजपणे “ईचकदाना बिचकदाना” किंवा “तितर तितर आगे तितर पिछे तितर” किंवा छुन छुन करती आयी चिडिया, तसेच चोरी चोरी मधील खालील गाणे-

ओ टिम का टिमा टिम्भा तारे करें अचम्भा
ओ टिम का टिमा टिम्भा

उस पार साजन इस पार धारे
ले चल ओ माँझी किनारे किनारे
ले चल ओ माँझी किनारे

ओ कोड़ीया कोड़ीया कवलानी कवलानी

अश्या रचना सहजपणे करत. गमंत म्हणजे काही शब्द जे सामान्यत: गाण्यात कधी ऐकलेच नाही तेही त्यांनी उत्कृष्टपणे आमच्या ओठावर रूजविले. त्यांच्या अनेक गाण्यापैकी मला आवडलेले रफीच्या मधाळ स्वरातील एक गाणे म्हणजे –

“ओ मेरे शाह-ए-खुबा, ओ मेरी जान-ए-जनाना

तुम मेरे पास होती हो, कोई दुसरा नही होता…………”

बहोतखुब वा जनाना हे शब्द माहित होते पण  यातील “शाह-ए-खुबा” आणि “जान-ए-जनाना” हे दोन्ही शब्द अपरिचितच. पण हे शब्द असे ओठावर रूळले की आजही ते तसूभरही तेथून हलायला तयार नाहीत. मोमिन खाँ मोमिन नावाचे एक ऊर्दू शायर जे गालिबचे समकालीन मानले जातात त्यांचा एक मिसरा आहे- “तुम मेरे साथ होते हो, गोया कोई दूसरा नहीं होता’ जो ऐकून मिर्जा गालिब याच्या बदल्यात आपला दिवान द्यायला तयार होते असा किस्सा आहे. हसरत यांनी या मिसऱ्याला “शाह-ए-खुबा” आणि “जान-ए-जनाना” याचा असा काही तडका दिला की ते गाणे अजरामर झाले.

हसरत गंभीर वा दर्दभरी गीतेही तितक्याच तन्मयतेने लिहीत असत. ‘आंसू भरी हैं ये जीवन की राहें…’, ‘जाऊं कहां बता ऐ दिल…’, ‘दीवाना मुझ को लोग कहें…’ ‘हम छोड़ चले हैं महफ़िल को..’ ‘ मै जींदगीमे हरदम रोताही रहा हूँ’ ….हम तुमसे मोहब्बत करके सनम, सुनो छोटीसी गुडीयाकी लंबी कहानी, रसिक बलमा, मुझे रात दिन ये खयाल है, हम तेरे प्यार मे सारा आलम, ये आंसू मेरे दिलकी जुबान है, बेदर्दी बालमा तुझको, राम करे कही नैना ना उलझे, रात और दिन दिया जले, दिल के झरोको मे तुझको बसा कर, वो खुशी मिली है मुझको, गम उठाने के लिए मै तो जीए जाऊंगा…सारखी शेकडो गाणी आजही रसिक विसरलेले नाहीत.

शैलेंद्र नतंर शिर्षक गीत लिहीण्यात पटाईत होते ते हसरत जयपुरी.  दीवाना मुझको लोग कहें (दीवाना), दिल एक मंदिर है (दिल एक मंदिर), रात और दिन दिया जले (रात और दिन), एक घर बनाऊंगा (तेरे घर के सामने), दो जासूस करें महसूस (दो जासूस), एन ईवनिंग इन पेरिस (एन इवनिंग इन पेरिस) अशी अनेक टायटल गाणी गाजली. १९६६ मध्ये प्रदर्शीत झालेला दक्षिणेतील टी. प्रकाशराव यांचा  निव्वळ मनोरजंन असलेला “सुरज” हा भरजरी वस्त्र ड्रामा चित्रपट गाजला तो गाण्यामुळेच. यातील “बहारो फूल बरसाओ… “ हे आजही लग्न वरातीतील बँडचे प्रमूख गाणे आहे….;या गाण्यासाठी हसरत यानां पहिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. यातील रागदारी सुरांवर आधारलेले “कैसे समझाऊं बडी नासमझ हो…” हे गाणेही हसरतचेच.

बरीच गाणी अशी असतात जी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंताशी जोडली जातात. अंदाज मधील “जिंदगी एक सफर है सुहाना….यहाँ कल क्या हो किसने जाना…” असे हसरत लिहून गेले( या गाण्याने हसरत यानां दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला)  आणि संगीतकार जयकिशन आपली शेवटची चाल बांधून निघून गेले. “जाने कहाँ गए वो दिन….’’ हे त्यांचे गाणे आजही अंगावर काटा उभे करते व राज कपूरचा प्रचंड केविलवाणा चेहरा डोळ्या समोर तरळू लागतो. “झनक झनक तोरी बाजे पायलिया” चे सूर कानी पडताच राजकुमारचा दु:खमग्न चेहरा आठवतो. या गाण्यासाठी हसरत यानां डॉ. आंबेडकर पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड युनिव्हरसिटी राऊंडने त्यानां डॉक्टरेट बहाल केली होती.

१९५० ते १९७० या काळात हसरत अखंड लिहीत राहिले व रसिकांच्या मनात खोलवर घर करत गेले. खरे तर दोन कवी किंवा दोन कथा लेखक एकाच म्यानात अधिक काळ राहू शकत नाहीत. पण शैलेंद्र आणि हसरत यांनी हा समज खोटा ठरविला. हे दोघेही प्रतिभावान व तितकेच संवेदनशील कवी. हसरत शैलेंद्र पेक्षा ५ वर्षानी मोठे होते पण वयाचा मोठेपणा प्रतिभेच्या आड कधीच आला नाही. राज कपूरच्या छत्रात तर ते एकत्र येतच असत पण अनेकदा या छपरा बाहेरही त्यांचा आमना सामना होत असे. उदा : ‘हरियाली और रास्ता मधील – ‘बोल मेरी तकदीर में क्या है… (हसरत),  तर इब्तिदाये इश्क में हम… (शैलेन्द्र) , ‘अराऊंड दि वर्ल्ड’ मधील – ‘दुनिया की सैर कर लो… (शैलेन्द्र),  तर ‘चले जाना जरा ठहरो…(हसरत),  ‘संगम’ मधील  – ‘हर दिल जो प्यार करेगा…(शैलेन्द्र), तर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर… (हसरत)’, ब्रहमचारी मधील “मै गाऊ तुम सो जाओ” (शैलेंद्र) तर “दिल के झरोकोमे” (हसरत), गुमनाम चित्रपटातील गुमनाम है कोई(हसरत) तर हमे काले है तो क्या हुवा….(शैलेंद्र), आ जा सनम मधूर चांदनीमे हम (हसरत) तर ये रात भिगी भिगी (शैलेंद्र)………………..अशी अनेक गाणी दोघांनी एकाच चित्रपटासाठी लिहली. त्यांच्यात काँटे की टक्कर होती पण प्रतिभेची.  जणूकाही दोघेही एकमेकानां उत्कृष्ट लिहण्याची स्फूर्ती देत असावेत.. हे अनोखे नाते खरे तर कोणत्याही क्षेत्रातील प्रतिस्पर्धीसाठी आदर्श नाते असावे.

७० चे दशक येई पर्यंत जयकिशन, शैलेंद्र कायमचे निघून गेले. राजकपूरची पूढची पिढी या क्षेत्रात आली. जयकिशनच्या अचानक जाण्याने हसरत मूक झाले. त्यात आरकेचा “मेरा नाम जोकर” बॉक्स ऑफिसवर सपशेल कोसळला. चारपाच वर्षांनी मुकेश यानीही एक्झिट घेतली. आरकेच्या ताफ्यात “बॉबी”च्या निमित्ताने लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी सह दाखल झाले तर नंतरच्या “राम तेरी गंगा मैली” मध्ये संगीतकार रविंद्र जैन आले. यातील शिर्षक गीत मात्र त्यांच्या वाट्याला आले नाही. ते अमीर क्वझलबाश यानी लिहले व बाकीची गाणी स्वत: रविंद्र जैन यानीच लिहली. यात फक्त एकच गाने हसरत यानां मिळाले.सून सायबा सून, प्यार की धून…..या चित्रपटा नंतर १० वर्षांनी त्यानां पुन्हा आरके कॅम्प मध्ये बोलावल्या गेले ते “हिना” या चित्रपटाच्या टायटल गीतासाठी. ते त्यांनी लिहले व गाजलेही.

७० च्या दशकातही ते लिहीते होते पण गती कमी झाली होती. या काळातील त्यांची …..उनके ख्याल आए तो…. (लाल पत्थर), आंखो आंखो मे बात होने दो..( आंखो आंखो मे), बोल मेरे साथीया….(ललकार), दो जासूस करे महसूस व दर्याचा राजा(दो जासूस), वगेरे वजा जाता त्यांची गाणी विरून गेली…नवीन संगीतकारा सोबत त्यांनी काम केले ज्यात सर्वाधिक संगीतकार अनू मलिक सोबत त्यांनी गाणी लिहली. अनू मलिक यांचे वडील सरदार मलिक हे देखिल एक चांगले संगीतकार होते. नेटवरील एका माहिती नुसार हसरत जयपूरी यांच्या बहिणीचे नाव कौसर जहान असे होते व सरदार मलिक यांच्या पत्नीचे नावही कौसर जहान असे होते. पण अन्नू मलिक, अब्बू मलिक व डब्बू मलिक या तिनही संगीतकार भावांच्या माहितीत आईचे नाव दिसत नाही.

खरं तर ८० चे दशक हे चित्रपटसृष्टीतील मोठ्या बदलाचे होते. चित्रपटकथेत गाणी असावीत या पलिकडे फारसा विचार होईनासा झाला. कथेला पूढे नेण्याचे काम पूर्वी गीतकार करीत ते होईनासे झाले. हसरत एक असे शायर होते जे रात्रीला एका सुंदर स्त्रीचे रूप देऊन तिच्या भोवती ताऱ्यांची चादर लपेटून देत. मग चांदण्यांनी बहरलेली ही भरजरी रात्र त्यांना नक्षत्रांचे देणे देई….कवीला लिहीताना आनंद यायला हवा…प्रसवकळा त्या शिवाय आनंदी कशा होतील? आपल्या ४० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ३५० चित्रपटातून २००० हजार गाणी लिहली. अर्थात प्रत्येकाची आपले एक युग असते. तसे ते हसरत यांचेही होते. त्यांनी आपले जन्मनाव टाकून नवीन नाव धारण केले सोबत आपल्या जन्म शहराचे जयपूर हे नावही अभिमानाने जोडले..जयपूरच्या रामगंज मध्ये “फिरदौस मंझिल” ही त्यांची हवेली होती. फिरदौस म्हणजे स्वर्ग. फिरदौसी हे त्यांच्या आईचे नाव होते आणि आईवर त्यांचे अफाट प्रेम होते. आईच्या देखभालीसाठी त्यांनी एक खास दाई ठेवली होती व लोक या दाईला बेगम आपा असे म्हणत असत. या हवेलीच्या समोरच त्यांची राधा राहात असे. सर्वप्रथम त्यांनी याच राधासाठी आपल्या चार ओळी लिहल्या होत्या आणि शायरीची सुरूवात केली-

तू झरोकोंसे झांके तो मै इतना पुछूं

मेरे मेहबूब तुझे प्यार करू या ना करू

या हवेलीतल्या गच्चीत बसून त्यांनी अनेक गाणी लिहली. या अवलियाने मुंबईच्या फूटपाथवर मातीची खेळणी पण विकली होती. बस कंडक्टर असतानां सुंदर मुली व स्त्रीयांकडून ते तिकीटाचे पैसे घेत नसत. कारण याच सौंदयामुळे आपल्याला गाणी सुचतात अशी त्यांची धारणा होती.

शेवटच्या दिवसात पत्नीच्या आग्रहामुळे त्यांनी रियल इस्टेट मध्ये आपली मिळकत लावली. यातुन मिळणाऱ्या उत्पन्नावर ते व त्यांची दोन मुले व एक मुलगी गुजराण करीत. जयपूर हे शहर गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. या शहराच्या गुलाबी छटांची त्यांनी आपल्या लेखणीने सर्वदूर पाखरण केली. १७ सप्टेंबर १९९९ या आपल्या अखेरच्या प्रवासापूर्वी अनेक वर्षे ते अज्ञातवासातच होते. आज त्यांचा स्मरण दिवस… त्यांच्या शब्दकळेस अभिवादन.

— दासू भगत

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..